इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)

सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर जवळजवळ रोज पाऊस पडायचा आणि माझ्या ओळखीचे सर्व लंडनवासी पावसाला शिव्या देत असायचे. मला त्या पावसाची मोठी मौज वाटे. वाटेत चिखल नाही, मजेदार गारवा आणि चार-पाच मैल चालूनही थकवा नाही. कोणी म्हणाले, की तुम्ही कशा पावसाला कंटाळत नाही, तर मी उत्तर देई, की जगात कोठेतरी असा पाऊस पडतो व कायम हिरवेगार राहते याचे मला फार कौतुक वाटते.

नुसता पाऊसच नाही, लंडनची सर्वच सृष्टी इकडच्या उलटी. आपल्याकडे धुके म्हटले, की काहीतरी मजेदार संवेदना मनाला होते. पावसाने धुवून काढलेले प्रसन्न आकाश, सकाळची व संध्याकाळची पडू लागलेली थंडी व दहा मैल लांबचे दिसावे असे स्वच्छ वातावरण आणि त्यात काही थोडा वेळ मात्र राहणारा दृष्टीला चकवणारा धुक्याचा पडदा असे आपल्याकडचे धुके. सकाळी उठून पाहावे, तर महाबळेश्वरी किंवा सिंहगडावर खालील दरी धुक्याने भरलेली असते. तेवढ्यात सूर्य उगवावा, की त्या धुक्यावर इंद्रधनुष्ये उमटतात आणि थोडा वेळ इतस्तत: पळून, सूर्य वर आला, की धुके पार नाहीसे होऊन गवताच्या पातीपातींवर अनंत दवबिंदू कोटिसूर्य प्रतिबिंबित करतात. संध्याकाळी धुके पसरले तर तेही रात्र निवळली, की नाहीसे होते व रात्रीचे आकाश सर्व ताऱ्यांनिशी चमकत असते; पण लंडनचे धुके म्हणजे औरच असते. आधी वर्षाचे दहा दिवससुद्धा आकाश निरभ्र नसते. तिकडचे आकाश आपल्या आकाशाइतके उंच कधी वाटतच नाही. कधीही वरती पहा, काळसर पांढुरके छत जसे सर्व शहरावर घातलेले असते. कोळशावर चालणारे लंडनमधले हजारो लहान-मोठे कारखाने व कोळशावर चालणाऱ्या लंडनच्या घरांतील लक्षावधी चुली रात्रंदिवस वातावरणात धूर ओकत असतात. घरांतही जरी अनवाणी चालले तरी पाय काळे होतात. कुठल्याही झाडाला हात लावला तरी हात काळे होतात. या धुरकट वातावरणात धुके पसरले, म्हणजे एरवी डोळ्यांना न दिसणारे कोळशाचे कण जणू दृश्य होतात. काळोख डोळ्याला दिसतो व हातांत धरता येतो. असे धुके वर्षातून एक-दोनदा तरी लंडनवर पसरते. पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे व आपण त्या हवेच्या तळाशी आहोत या गोष्टी भूगोलाच्या पुस्तकात वाचल्या होत्या; पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव लंडनच्या धुक्यात आला. समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवांना काय वाटत असेल त्याची कल्पना येते. या धुक्याने हाहाकार होतो. ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी आपटतात. रस्त्यावर गाड्यांचे अपघात होतात. मुले रस्ता चुकतात.

हिवाळ्यातले कित्येक आठवडे येथला दिवस संधिप्रकाशाइतपत उजेडाचा असतो. या अर्धवट उजेडात प्रकाशाचा जसा अभाव तसाच छायेचाही. निरनिराळ्या उद्यानांतून केवढाले पर्णहीन वृक्ष उभे असायचे; पण एकाचीही सावली खालच्या हिरवळीवर पडायची नाही. आपल्याकडे रखरखीत ऊन असते व त्याबरोबरच अगदी त्याला चिकटून सावली असते. डांबरी रस्ता उन्हाने इतका चकाकतो की दृष्टी ठरत नाही; पण प्रत्येक चालणारे माणूस व धावणारे वाहन आपल्या सावलीनिशी चालत वा धावत असते. दिव्याच्या प्रत्येक खांबाची सावली त्याच्या शेजारी लांब पसरलेली असते. प्रत्येक वस्तूची एक बाजू पोळलेली आणि प्रकाशमय तर दुसरी बाजू छायेची व निवाऱ्याची, असा विरोध सतत दिसतो. आगगाडीतून प्रवास करताना बघावे, उन्हाच्या वेळी, टेलिग्राफच्या तारांवर बसताना पक्षी नेमके खांबाची सावली पडलेली असेल तेथेच खांबाला चिकटून बसलेले आढळतात. पायी चालणारी माणसे घरांची सावली ज्या बाजूला पडली असेल त्या रस्त्याच्या बाजूने चालतात. झाडाखाली दाट छायेच्या काळ्या चंद्रकळेवर लख्ख प्रकाशाचे गोल गोल कवडसे खडीसारखे चमकतात; पण येथे सावली पडेल इतका लख्ख प्रकाश महिनेच्या महिने पडत नाही.

एक दिवस मी या उद्यानातून त्या उद्यानात भटकत भटकत सेंट जेम्स बगिच्यात पोचले व तळ्यातील पोहणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होते. सगळीकडे मंद रुपेरी प्रकाश पडला होता. एकाएकी मला चमत्कारिक वाटले, की प्रकाश खालून वर फाकला आहे. मी परत नीट भोवताली व वर पाहिले. खरेच आकाश अभ्राच्छादित होते. अगदी काळे जरी नसले तरी सूर्याचा मागमूसही नव्हता. खाली तळ्याच्या पाण्यावर व मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता व त्यातून परावर्तन पावून प्रकाश सर्वत्र फाकला होता. यामुळे प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटला. या विशिष्ट प्रकाशात सर्वच रंग आंधळे वाटतात. कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश पडला व तोही वसंतऋतूत फुलांनी बहरलेल्या ताटव्यावरून व हिरव्या कुरणावरून पडला, म्हणजे रंगाने नटलेली सृष्टी डोळ्यांपुढे नाचते; पण तरीही येथल्या सृष्टीतले रंग व आपल्याकडच्या सृष्टीतील रंग यांत फरक आहे. येथे सर्वच रंग जरा मंद व सौम्य वाटतात. जशा दाट छाया; पण आपापल्या भडकपणाने उठून न दिसता एकमेकांना पूरक अशा भासतात.