भारत देश महान

चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान

 भारत देश महान, भारत देश महान ।।धृ.।।

हिमालयाची हिमशिखरे ती । भारतभूच्या शिरी डोलती ।

 गंगा, यमुना आणि गोमती । घालिती पवित्र स्नान ।।१।।

 इतिहास नवा हा बलिदानाचा । शौर्याचा अन् पराक्रमाचा ।

 समतेचा अन्विश्वशांतिचा । जागवी राष्ट्राभिमान ।।२।।

 शौर्याने जे वीरचि लढले । रणांगणी ते पावन झाले ।

 भारतभूचे स्वप्न रंगले । चढवूनि उंच निशाण ।।३।।