विश्वकोश (स्थूलवाचन)

तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक ‘जाडमोठ्ठी पुस्तके’ असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. मराठीच्या विविध साहित्यसंपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा ‘मानबिंदू’! या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया.

मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्वविषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश! मराठी विश्वकोशामध्येमानव्यविद्या शाखेअंतर्गत धर्मव तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केला आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेअंतर्गत भौतिकी, रसायनशास्त्र, गणित-सांख्यिकी, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, कृषिविज्ञान, माहिती तंत्रज्ञान संगणकविज्ञान, वास्तुकला, भूविज्ञान आणि वैद्यक या विषयांचा समावेश केला आहे. कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली, तर तो विषय नीट समजून घेता येतो.

मुख्य विषय व त्याचे संलग्न विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो.

शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषासमृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी ‘भाषा’ सर्वार्थाने खुलू लागली. भाषा-भाषांमध्येआदानप्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढूलागल्या. अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. त्याचबरोबर सर्वविषयसंग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली.

उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार, मराठीमध्येनिर्माण झालेली संदर्भग्रंथाची तीव्र गरज आणि शासनव्यवहाराची भाषा म्हणून राज्यपातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्वविषयसंग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली.

मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्येपहिले संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. तसेच मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. तथापि त्यानंतरच्या काळात विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञानविकासाच्या क्षेत्राचा ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञानक्षेत्रांचा सर्वांगीण परिचय करून देणारा ‘मराठी विश्वकोश’ हा आश्वासक प्रयत्न आहे.