वीरांगना (स्थूलवाचन)

देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणे, हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वांत दु:खद क्षण; परंतु याचवेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वत:ला सिद्ध केलेल्या या वीरांगनेचा हा परिचय तुम्हांला निश्चितच प्रेरक ठरेल.

महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा, ‘भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना’ असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. शिवाजी विद्यापीठातून बी. एससी व एम. एस. डब्ल्यू अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री. संतोष महाडिक लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी बी.एड आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्येशिक्षिकेची नोकरी केली.

साडेबारा वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची दोन अपत्ये. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम

म्हणजे ‘भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी.’ याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्यदलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक… १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात ४९ राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले.

नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या चाळिशीच्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी, चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी अकरा महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि ९ सप्टेंबर २०१७ रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले. त्या वेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही सातवीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता दुसरीत शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्यदलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे, तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आईवडील, सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. ‘‘स्वाती लहानपणापासून धाडसी होती’’, असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षणक्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते; परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन, पतीचे ‘पहिले प्रेम’ जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या ‘दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार!’ हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे, जिद्दीचे मूर्त रूप आहे.

खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या २२-२३ वर्षांच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही. उलट त्यांच्या दु:खावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते, असे त्या म्हणतात.

मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते, कारण त्यांच्या मते, एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, ‘‘आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. ‘‘तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे.’’ निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

आपण जे काम करतो, मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते, असे त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात. पतिनिधनाचे असीम दु:ख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगनेला सादर प्रणाम.

शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणायदायी आहेत. समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगनेचा परिचय तुम्हांला निश्चितच प्रेरक ठरेल.

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमानबिंदू ठरल्या आहेत, कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम. ए. करून त्यांनी बी. एड. सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन २००८ मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक सबइन्स्पेक्टर रेखा मिश्र| (सबइन्स्पेक्टर) म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या अडीच वर्षांच्या सेवेतील एक वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले व पुढील अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या ४३४ अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य केले. विविध कारणांमुळे स्वत:चे घर सोडून निघून आलेल्या, मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो.

 पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या १४ वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा दाखवण्याएेवजी ‘मुझसे दोस्ती करोगे?’ म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून, स्वत:चे घर सोडून पळून आलेली मुले, मुंबई शहराचे व अनेकदा बॉलीवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाइकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळेच कुटुंबांपासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचूबागडू लागली. त्यांना जीवनानंद मिळाला. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या तीन तमिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग ४८ तास ड्युटीवर रहावे लागले. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत.

एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात, की फेसबुकवरील गप्पातील (चॅट) अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे तर फारच जिकिरीचे असते. कारण १४- १५ या वयोगटांतील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावे लागते. हे मोठे आव्हानच असते. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली, अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे, अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्रघडणीत त्याचा वाटाही माेलाचा असतो, म्हणूनच सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा!