हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)

आपण दररोज कार्टून्स पाहतो, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत, की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं, की आपण थबकतो. शिवाय, आपण सहसा जी पाहत असतो, ती असतात ‘स्ट्रीप कार्टून्स’ (म्हणजे चित्रमालिका). ‘चिंटू’ हे त्याचे सर्वांत महत्त्वाचे असे उदाहरण. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं, मग त्याच्या दुसऱ्या- तिसऱ्या भागांत त्या सांगण्या-बोलण्यातून उलगडणारी गंमत असते! कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं; पण हास्यचित्र म्हणजे काय, असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल?

कुणी सांगेल, वेडंवाकडं चित्र काढलं, की ते झालं कार्टून! कुणी म्हणेल, त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल, त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं, वगैरे… हे सगळं सांगणं-बोलणं बाजूला ठेवून, आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल – ‘सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र, म्हणजे हास्यचित्र’. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं, की आपल्याला हसू येतं! व्यंगचित्र म्हणजे, हास्यचित्राचा पुढला टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं; पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे आपल्या लक्षात येतं.

मुलांची हास्यचित्रं काढणं ही सर्वांत अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे, केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात, ती मुलं काढणं फार अवघड असतं, का ? तुम्ही काढून पाहा, तेव्हा लक्षात येईल. कारण, लहान मुलाचं चित्र-आकारानं लहान काढलं, तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार! एखादा उंच माणूस काढला, तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का, छे! मग… दाढीमिश्या नसल्या, की होईल का चित्रातलं पोरगं-नाही बुवा! तसंही होणार नाही. त्याला शर्ट-चड्डी घातली, की होईल का ते पोरगं… चित्र काढायचा प्रयत्न केला, की आपल्या या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल! आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं; पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वांत कठीण!

आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी, आपापल्या व्यंगचित्रांत-हास्यचित्रांत लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे, ते पाहूया. हास्यचित्र म्हटलं, की आधी आठवण येते, ती शि.द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. शाळेतल्या चौथी-पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्रे होती, ती पाहताना गणिताचा ‘बाऊ’ कमी झाला होता मुलांचा!

त्यांचं हे हास्यचित्र पाहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात, असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे, तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने-दुधाच्या बाटलीने! श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट-नाजूक आणि लवचीक अशी! त्यांच्या या हास्यचित्रांत पाहा.

अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते, नाही का! शिवाय देवाला ‘फूल’ देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा! हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या-बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते.

डेव्हीड लँग्डन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्रं पाहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे, हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात.

तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं; त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं?… चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं, ते काळ्या रंगाकडे-मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं, की लहान मुलं उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही; पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते, ती सेफ्टी पिन… आणि विचार येतो, अरे! ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही ‘कारण’ असतं! इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत, पाहा.

लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात? त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल, तर ज्या व्यंगचित्रात -हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत, अशी चित्रं पाहावीत. हे आहे, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे, मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. इथे पाहा, तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा, कंटाळलेला, वैतागलेला मुलगा… तेच हात-पाय, तेच नाक-डोळे; पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल, लहान मूल वाटतं? आकाराने लहान-मोठेपण आहेच; पण त्याशिवाय अधिक काय आहे?

ही चिंटूची चित्रमालिका पाहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय, पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा ‘अर्थ’ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का!

आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते, ही दोन वेगवेगळी  चित्रं आहेत- एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस; पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते, की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना ‘मोठ्या’ वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल-सूक्ष्म असा होत जातो, बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे.

आता हे हास्यचित्र. चित्रकलेवर हुकूमत मिळवली, की हास्यचित्रात काय जादू करता येते, त्याचं उदाहरण. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स – बूट पाहून लक्षात येतं, की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तूअगदी तयार असतात. इथे, त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे अन् ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पाहा ना, कसा वेडावाकडा झालेला आहे, शिवाय त्याचा चेहरा…आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र.

आता आपल्या लक्षात आलं असेल, की लहान मुलाचं चित्र काढताना, त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे, हाता-पायांची बोटं, ती लहान काढली, की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळतं, की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी-मिश्या नसतात, हे तुम्हांला सांगायची गरज नाही! यापुढे व्यंगचित्रं-हास्यचित्रं पाहताना आणि काढताना, अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल.