१०. आप्पांचे पत्र

मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्षे राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाईकाका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ, कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा, कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हांला हमखास मिळेल, अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हां सर्वांना देत आहेत.

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

 तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं; पण राहून जायचं. घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई, आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता, की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी; पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात; पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या अाठ्या वाढतात, मार्क्सवाढत नाहीत. असो.

पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे, की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी; पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं, तरी ते असं करायचं, की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्सपण महत्त्वाची असते. तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे

सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात; पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे, की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं; पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं.

मला माहितेय तुम्हांला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय; पण कधी कधी मला वाटतं, की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूपजण; पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हांला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाश्यांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती; पण आता खिडकी उघडा. त्या मधमाश्या नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हांला कष्टाची किंमत आणि गंमतपण कळेल.

मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी. आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितेय? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशांतून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले.

असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने दहा झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच[1]सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाद्य असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत.

खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं; पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एकजण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल; पण तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात; पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे.

मी एवढं सगळं सांगितलं, कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय. तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय; पण मी तुम्हांला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत; पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे, की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता अाहात तसेच आनंदी रहा. जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हांला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, होस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं; पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. दहावीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार; पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा!

तुमचाच,
आप्पां.