१०. ऐतिहासिक काळ

१०.१ संस्कृती म्हणजे काय ?
१०.२ नट्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती
१०.३ विविध संस्कृती : मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा
१०.४ खेळ आणि मनोरंजन

आपण दुसऱ्या पाठात पाहिले आहे, की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखिते इत्यादींमधून लिखित पुरावा उपलब्ध होतो, त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. सर्व प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये विकसित लिपींच्या आधारे लेखन केले जात होते. म्हणजे नागरी संस्कृतींच्या उदयाबरोबर नवाश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झाला, असे स्पष्ट होते.

१०. १ संस्कृती म्हणजे काय ?

मानव आणि इतर प्राणी यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या भोवतालचा परिसर आणि निसर्ग यांच्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु त्या गरजा भागवताना इतर प्राणी त्यांचा परिसर आणि निसर्ग या दोहोंमध्ये विशेष बदल करत नाहीत. उदा., अस्वल गुहेत राहते. माकड झाडावर राहते. माणूस मात्र घर बांधतो. म्हणजे माणूस त्याच्या परिसराचे नैसर्गिक स्वरूप काही प्रमाणात बदलतो. निसर्गात मिळणारे अन्नपदार्थही तो इतर प्राण्यांप्रमाणे कच्चे खात नाही. तो ते अन्नपदार्थ भाजतो, शिजवतो. म्हणजेच कच्च्या अन्नपदार्थांवर तो संस्करण करतो. अशा पद्धतीने तो विविध पदार्थांवर संस्करण करत असतो. दगड, धातू इत्यादींवर संस्करण करून विविध हत्यारे आणि वस्तू बनवतो. मातीपासून भांडी, विटा आणि इतर अनेक वस्तू तयार करतो. कापसापासून सूत आणि सुतापासून कापड तयार करतो. थोडक्यात म्हणजे जे निसर्गातून मिळते, त्याचे स्वरूप तो स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. हे करण्यासाठी त्याला कौशल्यांची आवश्यकता असते. हवी ती वस्तू घडवण्याआधी त्याला विचार करावा लागतो.. ती वस्तू प्रत्यक्ष घडवण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात. विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले. त्यासाठी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून भाषाही समृद्ध होत गेली. विविध कलाकौशल्ये आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवनपद्धती म्हणजे ‘संस्कृती’ होय.

१०. २ नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी
संस्कृती नवाश्मयुगीन संस्कृती कृषिप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. शेतीचे चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणीपुरवठ्याची आवश्यकता असते. साहजिकच नवाश्मयुगीन मानवाने नदयांच्या काठांवर गावे वसवली. नदयांच्या खोऱ्यांमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतींचा विकास झाला.
विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनातील वाढ, चाकाचा उपयोग, व्यापारातील भरभराट, विकसित लिपींचा उपयोग इत्यादी गोष्टींमुळे नवाश्मयुगीन संस्कृतमधून नागरी संस्कृती उदयाला आल्या. जगातील चार प्रदेशांमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे ३००० वर्षांपूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे ते चार प्रदेश होत. नद्यांच्या काठांनी विकसित झाल्या, म्हणून या प्रदेशांतील प्राचीन नागरी संस्कृतींना ‘नदयांच्या खोल्यांमधील नागरी संस्कृती’ असे म्हणतात.

१०.३ विविध संस्कृती मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा

मेसोपोटेमिया: ‘मेसोपोटेमिया’ हे एखादया देशाचे नाव नसून एका प्रदेशाचे नाव आहे. ‘मेसोपोटेमिया’ याचा अर्थ दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआब प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे रायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांमधील प्रदेश, या दोन्ही नदया प्रामुख्याने तुर्कस्तान, सिरीया आणि इराक या देशांमधून वाहतात. मेसोपोटेमियामध्ये उर, उरूक, निप्पुर यांसारखी प्राचीन नगरे होती. या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती.

इजिप्त : आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली. ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती. नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नाईल तिच्या काठांवर जो गाळ आणून टाकते, त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे.

इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पुराचे पाणी साठवत असत. त्यातील गाळ खाली बसला, की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाई.

चीन: चीनमधील होयांग हो नदीच्या खोऱ्यात चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास झाला. चिनी परंपरेनुसार हुआंग दी या राजाने शेती, पशुपालन, चाकांची वाहने, नौका, वस्त्रे इत्यादींची सुरुवात केली. त्याच्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचे तंत्र शोधून काढले, असे चिनी लोक मानतात. चीनमधील लोयांग, बीजिंग आणि चांगान ही शहरे महत्त्वाची होती.

हडप्पा : संस्कृती भारतीय उपखंडातील सर्वांत प्राचीन संस्कृती ‘हडप्पा संस्कृती’ या नावाने ओळखली जाते. ती सिंधू नदीच्या खोल्यात विकसित झाली. या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आली. आता ती पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोबल आणि धोलावीरा, राजस्थानमधील कालीबंगन, ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे होत. या संस्कृतीच्या नगराची रचना आखीव

होती. एकमेकांना समांतर, काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्ये होती. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगराचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे.

मातीची पक्की भाजलेली खणखणीत वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिंपळपान, माशांचे खवले यांसारख्या आकृतींची सुबक नक्षी काढलेली असे. विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते. त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप मागणी होती. हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली, तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत, असे तिथे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि मुद्रा यांच्या आधारे मानले जाते.

१०.४ खेळ आणि मनोरंजन

प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये खेळ आणि मनोरंजनाचेही विविध प्रकार होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार होते. त्यांखेरीज पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जात.

प्राचीन इजिप्तमध्ये ‘सेनात’ नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला, सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. प्राचीन चीनमध्येही पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते. मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्येही पट आणि सोंगट्यांचे खेळ लोकप्रिय होते.

हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननांमध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणीही मिळालेली आहेत. त्या मातीच्या भिंगऱ्या, शिट्ट्या, खेळण्यांमध्ये खुळखुळे, बैलगाड्या, चाकावरचे प्रेरणी व पक्षी यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.

प्राचीन नागरी संस्कृतींमध्ये खेळांप्रमाणेच संगीत आणि नृत्य यांनाही खूप महत्त्व होते. कोणत्याही उत्सवप्रसंगी संगीत आणि नृत्य यांचे आयोजन आवश्यक असे. त्या काळी अनेक प्रकारची वादये वापरात होती. ‘बालाग’ नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात प्रचलित होते. सारंगी हेही एक प्राचीन तंतुवादध आहे. त्याखेरीज झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल, अशी अनेक प्रकारची वादये वाजवली जात असत. इजिप्तच्या राजांना ‘फॅरो’ असे म्हणत. विशेष संगीत रोया नृत्यामध्ये सहभागी होत असे. हा संस्कृनृत्या विशेष महत्त्व होते, असे अनुमान मोहेंजोदडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कांस्यमूर्तीच्या आधारे करता येते.

आपण आतापर्यंत अश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्यापर्यंत कशी येऊन पोचली, याचा आढावा घेतला. इयत्ता सहावीमध्ये आपण भारतीय उपखंडात विकसित झालेल्या हडप्पा संस्कृतीचा अधिक सविस्तर अभ्यास करणार आहोत. तसेच, भारताच्या प्राचीन इतिहासाचाही अभ्यास करणार आहोत.