१०. नागरीकरण

सुरेशच्या गावाजवळ कारखाना सुरू झाल्यामुळे गावातील लोकांच्या व्यवसायात बदल होऊ लागलेला तुमच्या लक्षात येईल. कामानिमित्त परगावांहून अनेक लोक गावात येऊन राहू लागतात. त्याबरोबर वाहतूक सुविधा, उपाहारगृह, खाणावळ, किरकोळ विक्रीची दुकाने, वैद्यकीय सेवा, शाळा इत्यादी सुविधांमुळे गावाच्या मूळ स्वरूपात बदल होत जातो.

आपल्या देशाचा विचार केल्यास शेती हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय आहे. शेती व शेतीला पूरक व्यवसाय ग्रामीण भागात पूर्वापार केले जातात; परंतु आता वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू होत आहेत. उदा., कारखाने, गिरण्या, ऊर्जाप्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प इत्यादी. यामुळे स्थानिक तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील लोक कामासाठी येऊ लागल्यामुळे गावाच्या लोकसंख्येत वाढ होते. या लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इतर सेवा व्यवसाय विकसित होतात. उदा., स्वास्थ्य, खानपान, रुग्णालय, मनोरंजन इत्यादी. परिणामतः गावाचा विस्तार वाढत जातो. गावाचे पूर्वीचे स्वरूप बदलत जाते.

गावामधील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायतीऐवजी नगरपरिषद किंवा नगरपालिका उदयास येतात. विविध मूलभूत सार्वजनिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम या व्यवस्थेला करावे लागते. उदा., पेयजल, रस्ते, वाहतूक व सांडपाणी व्यवस्था, रस्त्यावरील दिवे इत्यादी. यांशिवाय नगरनियोजन, करमणुकीची साधने, प्रेक्ष णीय स्थळे, उद्याने इत्यादी सुविधा १०. नागरीकरण भौगोलिक स्पष्टीकरण सांगा पाहू ! 76 देखील विकसित कराव्या लागतात. पर्यायाने गावाचे रूपांतर नगरात/शहरात होते.

भारतीय जनगणना कार्यालयाने नगरांच्या संदर्भाने १९६१ साली खालीलप्रमाणे निकष ठरवले आहेत.

  • ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी ७५% पुरुष बिगरशेती व्यवसायात असतील, अशा वस्तीस नागरी वस्ती समजावे.
  • वस्तीची लोकसंख्या ५००० पेक्षा जास्त असावी.
  • वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौकिमीला ४०० इतकी असावी.

भारतातील नागरीकरणाचा विचार करता सन १९६१ ते सन २०११ पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्या सातत्याने वाढलेली आहे. सन १९६१ ते सन १९८१ पर्यंत नागरी लोकसंख्येची वाढ साधारणतः ५.५५ टक्के होती; परंतु सन १९८१ ते सन २०११ पर्यंत ही वाढ १३.७३ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे आढळते. याचा अर्थ भारतातील नागरी लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. नागरीकरण अनेक कारणांमुळे होत असते. त्यांपैकी काही प्रमुख कारणे आपण अभ्यासूया.

औद्योगिकीकरण :

एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण हाेणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. एकोणिसाव्या शतकादरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली, कारण मंुबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापडगिरणी उद्योग सुरू झाला होता. त्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे व नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग झाली.

व्यापार :

एखाद्या प्रदेशातील ठिकाण, मालाची ने-आण, चढउतार व साठवणूक यांसाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. उदा., व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपाहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोईचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले.

यांत्रिकीकरण तंत्रज्ञान :

यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रांत पाहायला मिळतात. नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक साहाय्यभूत ठरतात

गेल्या काही दशकांत शेतीमध्येतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. ग्रामीण भागांतील शेतीही आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या साहाय्याने केली जाते, त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. हा कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाला. परिणामी नागरी लोकसंख्या वाढू लागली आहे.

वाहतूक संदेशवहन :

रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतुकीच्या सोईंचा ज्या भागात विकास होतो, त्या भागातील छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते. उदा., कोकण रेल्वेविकसित झाल्यावर या मार्गाच्या सान्निध्यात असलेल्या सावर्डे (जिल्हा रत्नागिरी) सारख्या अनेक गावांचे नागरीकरण होऊ लागले आहे. महत्त्वाचे लोहमार्ग एकत्र आल्यामुळे भुसावळचा (जिल्हा जळगाव) विकास झपाट्याने झाला.

स्थलांतर :

स्थलांतर हा नागरीकरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. हे स्थलांतर अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा कायम स्वरूपाचे असते. स्थलांतर हे प्रामुख्याने एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाकडून शहराकडे होत असते. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागली आहे. उदा., भारताच्या विविध भागांतून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारे स्थलांतर.

नागरीकरणाचे परिणाम :

नागरीकरणामुळे प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते. भूमी उपयोजनामध्ये हा बदल विशेषतः जाणवतो. जसे, पूर्वी शेतीखाली असलेली जमीन कारखानदारी व निवासी प्रदेशात रूपांतरित होते. नागरीकरणामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात, त्याचप्रमाणे समस्याही निर्माण होतात.

नागरीकरणाचे फायदे :

सामाजिक एकोपा : नागरीकरणामुळे द्‌वितीय, तृतीय व चतुर्थश्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. या प्रदेशांचा विकास झपाट्याने होताे. वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो.

आधुनिकीकरण : विविध प्रदेशांतून लोकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्याजवळील ज्ञान, कौशल्य व माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होते. अद्ययावत माहिती, तसेच साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशांना होत असतो. उद्योगधंदे व व्यवसायांसंदर्भात अनेक नवीन प्रकल्प या प्रदेशात विकसित होताना दिसतात. नागरी वस्तीला नवनवीन कल्पना, अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानयुक्त सोईसुविधांचा फायदा प्रथम मिळतो, त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो.

सोईसुविधा : नागरी वस्तीमध्ये अनेक सोईसुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोई अत्यंत महत्त्वाच्या असतात.

चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोईंमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होताना दिसतो.

शिक्षणाच्या सेवादेखील नागरी भागांमध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सोईंमुळे इतर ठिकाणांहून अनेक विद्यार्थी नागरी भागांत येतात. उदा., पुणे शहर.

वैद्यकीय सोईदेखील नागरी भागांत चांगल्या विकसित झालेल्या असतात. या सोईंचा लाभ घेण्यासाठी इतर भागांतून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक नगरांमध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात.

नागरीकरणाच्या समस्या :  

झोपडपट्टी :नागरीकरणामुळे शहरांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्येनिवासव्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाहीत. स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारानिमित्त शहरात येतात; परंतु सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असे नाही, त्यामुळे अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते. असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. आकृती १०.२ पहा. ही घरे बहुधा अनधिकृत असतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोईसुविधा मिळत नाहीत. येथे घरांची घनता खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात. मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे वाढत असतात, त्‍यामुळे सामाजिक, आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

वाहतुकीची कोंडी शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरांत लोक निवास करतात. शहराच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादींसाठी रोज उपनगरांतून लोकांची ये-जा सुरू असते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खासगी वाहनांची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो. आकृती १०.३ पहा.

प्रदूषण प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यात वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण पाहायला मिळते. शहरांचा वाढता विकास, सोईसुविधांचा तुटवडा,  तसेच नियमांचे उल्लंघन यांमुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते. शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणातदेखील वाढ होते.

गुन्हेगारी ः स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे अवैध मार्गांचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यातून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. पोलीस व न्याययंत्रणेवरील ताण वाढतो.

वर उल्लेखलेल्या समस्यांव्यतिरिक्त जागांच्या किमतीत झालेली भरमसाट वाढ, गटांमधील संघर्ष यांमुळे शहरातील ताणतणाव वाढतात. परिणामी शहराचे सामाजिक ऐक्य बिघडू शकते.