१०. यंत्रांनी केलं बंड (भाग – २)

दीपक फार चौकस मुलगा खरं. त्याला खेळायला म्हणून आणलेलं, कुठलंही नवं खेळणं, तो पहिल्यांदा थोडा वेळ कुतूहलानं रंगून खेळायचा; पण दिवसाच्या शेवटी ते खेळणं मोडून ते कसं चालतं याचा शोध घेण्यात तो मग्न व्हायचा. त्याचा आनंद असे तो खेळण्याच्या आतली रचना समजावून घेण्यात. यांत्रिक हालत्याचालत्या खेळण्यांच्या बाबतीत तर त्याचा उत्साह विचारू नका. दीपकला त्याचे वडील नेहमी म्हणायचे देखील, ‘‘दीपक! यंत्राच्या वाटेला जाऊ नकोस. खेळण्याची मोडतोड करून त्यांना सतावू नकोस. एखाद्या दिवशी यंत्रं रागावली म्हणजे कळेल, मग पळता भुई थोडी होईल. तू मोडलेल्या खेळण्यांतली यंत्रं पहा कशी तुझ्याकडे चिडून पाहताहेत.’’

 दीपकला या बोलण्याचं हसू यायचं. त्याला वडिलांचं यंत्रांचं वेड आणि यंत्रांबद्दलचं प्रेम माहिती होतं. आपल्या कचेरीतला कारकुनांचा फड हळूहळू कमी करत, अधिकाऱ्यांना रजा देत, दीपकच्या वडिलांनी त्यांची कामं करायला यंत्रं आणली, हे दीपकला माहीत होतं आणि ती यंत्रं दीपकच्या वडिलांनी मुद्दाम त्यांनी नेमलेल्या संशोधकांकडून करवून घेतली होती, हेही त्यांनी मुद्दाम दीपकला सांगितलं होतं. त्यामुळेच ती यंत्रं दीपकचंही ऐकत असत, त्यानं सांगितलेलं काम करत असत. त्यामुळेच दीपकला त्यांच्याबद्दल जवळीकही फार वाटत असे.

 एक दिवस दीपक आपल्या यांत्रिक खेळण्यांची मोडतोड करून त्या खेळण्यांतली यंत्ररचना अभ्यासत होता. यंत्रात काय फरक केला म्हणजे ही खेळणी सजीव वाटतील, वागतील यांबद्दल तो विचार करत होता. वडिलांनी त्याला मुद्दाम दिलेला एक यंत्रमानव त्याच्या जवळ बसून त्याचा उपद्व्याप पाहत होता. तेवढ्यात दीपकला आपल्या गृहपाठाची आठवण झाली. त्यानं आपल्या यंत्रमानव मित्राला म्हटलं, ‘‘मित्रा! जरा माझा गृहपाठ करून देतोस का?’’ यंत्राची मोडतोड करता- करताच दीपक बोलत होता. त्याचं त्याच्या यंत्रमित्राकडे लक्ष नव्हतं.

 ‘‘नाही! मुळीच नाही! तुझा गुलाम नाही मी!’’ असे उद्धट उद्गार दीपकच्या कानी पडले आणि त्यानं चमकून वर पाहिलं. त्याचा यंत्रमित्र त्याच्याकडे आपल्या जळजळीत भासणाऱ्या भिंगडोळ्यांनी पाहत होता. दीपकच्या हातातल्या मोडक्या यंत्राकडे पाहत दु:खाची किंकाळी फोडून तो यंत्रमित्र चालता झाला.

 दीपक आश्चर्यानं पाहतच बसला. आपण यंत्राची मोडतोड चालवलेली पाहून आपला यंत्रमित्र रागावला, दु:खानं किंचाळला हे दीपकच्या लक्षात आलं. त्याला वाटलं, आज माझा यंत्रमित्र माझ्याशी उद्धटपणानं बोलला. ‘‘गुलाम नाही’’, असं म्हणाला. उद्या जर बाबांच्या कचेरीतल्या सगळ्या यंत्रांनी असंच चिडून असहकार पुकारला तर? तर… दीपकला या कल्पनेनं काही सुचेना. भालबा केळकर- भालचंद्र वामन केळकर (१९२०-१९८७) : विज्ञानलेखक, अनुवादक, नाट्यवाङ्मयाचे अभ्यासक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते. विज्ञानविषयक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून केलेल्या लिखाणाची पस्तीसहून अधिक पुस्तके प्रसिद्ध, त्याचबरोबर ‘शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा’, ‘बिचारा डायरेक्टर’, ‘शेक्सपीयरच्या नाट्यछटा’ इत्यादी लेखन प्रसिद्ध. यंत्रमानवाने मानवी जीवनावर अतिक्रमण केले, तर निर्माण होणाऱ्या गमती व धोके यांचे वर्णन रंजक पद्धतीने पाठात लेखकाने केले आहे. प्रस्तुत विज्ञानकथा ‘मराठीतील निवडक विज्ञानकथा’ (संपादन-निरंजन घाटे) या पुस्तकातून घेतली आहे. १०. यंत्रांनी केलं बंड 37 तो तसाच उठला आणि गृहपाठ करून, जेवून शाळेत गेला. त्याच्या डोक्यात सारखे यंत्राचेच विचार चालू होते. वर्गातले मित्र यंत्र झाले तर? शिक्षकच यंत्र झाले तर? त्याचं अंग शहारलं आणि उद्या साऱ्या यंत्रांनी आपल्याला यंत्रासारखं वागायला भाग पाडलं तर? या कल्पनेनं तो स्वत:च यंत्रासारख्या हालचाली करू लागला. शिक्षक आणि मुलं आश्चर्यानं पाहतच राहिली. शेवटी शिक्षक म्हणाले, ‘‘दीपक! काय चाललंय?’’ मुलं हसली. शिक्षकांनाही हसू आवरेना. मुलांचा हशा ऐकून दीपक भानावर आला. ‘हसू नका! हसू नका! यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही!’ असं बोलून गेला आणि आणखीनच मोठा हशा उसळला. दीपक लाजून चूर झाला आणि आपली पुस्तकं उचलून आपल्या घराकडे पळत सुटला. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा झाली म्हणून बरं. दीपकला मात्र पुन्हा पुन्हा भास होत होता, की आपले यंत्रमित्रच हसताहेत ‘घण! घण! घण!’

 दीपकचे वडील आपल्या शॉर्टहँड-टायपिस्टला पत्र लिहून घ्यायला सांगत होते. ‘‘हं! झालं? पुढं मग नेहमीचंच….आपला आभारी आहे, काम लवकर व्हावे ही इच्छा, आपला सदैव कृपाभिलाषी इत्यादी…जा! मिस अय्यंगार! लवकर टाइप करून आणा पत्र. आज गेलंच पाहिजे.’’ दीपकनं मिस अय्यंगारकडे पाहिलं आणि तो ओरडलाच, ‘‘मिस अय्यंगार! हे तुमचं असं कसं झालं? ही तोंडावर जाळी का धातूची? आणि पिपात का घातलंत आपलं शरीर? हातापायांत हे कुठले मोजे आणि बूट स्टेनलेसचे?’’ दीपकचे वडील मोठ्यांदा हसू लागले. त्या चमत्कारिक मिस अय्यंगारचाही ‘किण्किण्किण्किण्’ असा हसण्याचा आवाज आला. शेवटी हसू आवरून दीपककडे बघून वडील म्हणाले, ‘‘खरंच दीपक! मी तुला सांगायला विसरलोच. या माझ्या ऑफिसमधील नव्या स्टेनोटायपिस्ट. स्वयंचलित यंत्र महिला. नाव ठेवलंय मिस अय्यंगार, कारण सवय आहे ना मला त्या नावाची. ‘‘मिस अय्यंगार! तुम्ही जा कामाला, चल दीपक, मी तुला जरा कचेरीतल्या सुधारणा दाखवतो.’’ असं म्हणून ते दोघं निघणार तेवढ्यात त्या यांत्रिक मिस अय्यंगार आल्या आणि त्यांनी टाइप केलेल्या डझनभर पत्रांचा गठ्ठा दीपकच्या बाबांच्या हातात दिला. तो घेत दीपकचे वडील म्हणाले, ‘‘पहा दीपक! पाच सेकंदांत बारा पत्रं टाइप करून दिली यांनी.’’

 दीपक स्तंभित होऊन पाहतच राहिला.‘‘बघतोस काय दीपक? अरे ही केवळ सुरुवातच आहे,’’ वडील हसत म्हणाले आणि त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत गेले. ‘‘हा रोबो फोन! केवळ ध्वनिलहरींवर काम करतो.’’ वडील म्हणाले. ‘‘म्हणजे? मी जर नुसतं म्हटलं, की मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर लगेच हा काम करतो?’’ दीपकनं विचारलं. ‘‘बरोब्बर! माझ्याकडच्या फोनचा लाइट लागतो, दहा सेकंदांत माझ्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, तर बझर वाजू लागतो. मी तिथं नसलो, तर रोबो फोन जो काय निरोप असेल तो ध्वनिमुद्रित करतो आणि मी आलाे की मला तो निरोप देतो.’’ वडील म्हणाले.

रात्री जेवण झाल्यावर दीपक अंथरुणावर पडला तो याच विचारात. ‘छे:! चैन नाही पडत. या अमानुष यंत्रांनी अगदी अस्वस्थ केलं आहे. झोप काही नीट लागेल असं वाटत नाही!’ असं मनाशी म्हणत दीपक या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. कधी डोळा लागला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले, ‘सह्याजी, दीपकच्या वडिलांच्या नावानं मी लिहिलेल्या पत्रावर त्यांची सही कर. शाब्बास! सह्याजी! आता आपल्याला त्यांच्या साऱ्या इस्टेटीचा ताबा मिळालाच म्हणून समज!’ दीपक घाईघाईनं उठला आणि शेजारच्या खोलीत त्यानं डोकावून बघितलं. त्याला तिथे मनुष्यसदृश्य यंत्रं दिसली. यंत्रमानव वडिलांच्या खाजगी कचेरीत काम करत होते. त्यातील सह्याजी म्हणजे सह्यांची हुबेहूब नक्कल करणारं यंत्र, यंत्रमानव. दीपक तावातावानं आत गेला आणि म्हणाला, ‘‘काय चाललंय काय इथं? दुसऱ्याची, प्रत्यक्ष मालकाची सही करून पत्रं पाठवता! ही उघड उघड दरोडेखोरी झाली.’’ ‘‘माझा आता तुझ्या वडिलांच्या सर्व इस्टेटीवर ताबा आहे. तो मी मिळवला आहे.’’ तो यंत्रमानव उद्धटपणे म्हणाला. ‘‘तू या इस्टेटीचा मालक झाला आहेस हा तुझा भ्रम आहे.’’ दीपक चिडून म्हणाला. ‘‘तुझे बाबाच याला कारण आहेत. त्यांनी अगदी परिपूर्ण मनोव्यापार करणाऱ्या, विचार करू शकणाऱ्या अशा आम्हां यंत्रमानवांना तयार करवून घेतलं आहे, आता आम्ही बंड करून जगच ताब्यात घ्यायचं ठरवलं आहे.’’ तो सह्याजी, हुकूमत गाजवणारा यंत्रमानव म्हणाला .

‘‘यंत्रमानवांना, यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही. हा काय वाह्यातपणा मांडला आहे? तुम्हांला चांगलं वठणीवर आणतो.’’ असं म्हणून दीपक तिथून निघाला, जाता जाता त्याच्या कानावर यंत्रमानवाचे शब्द पडलेच, ‘‘दीपक! उगीच संतापू नकोस. तुझे बाबा या बाबतीत काहीच करू शकणार नाहीत, कारण ते आता आमचेच…’’ दीपकही ते ऐकून तडकून म्हणाला, ‘‘तुम्हां बंडखोरांचे गुलाम झाले आहेत ना? बघतो ना! त्यांच्यावर तुमचा अधिकार चालणार नाही.’’ दीपक असं म्हणत वडिलांच्या खाजगी खोलीत शिरला. बाबा पाठमोरे उभे होते. दीपक ओरडून म्हणाला, ‘‘बाबा! स्वस्थ काय उभे राहिलात? तुमच्या कचेरीत काम करणाऱ्या यंत्रांबद्दल मला तुमच्याकडे तक्रार करायची आहे.’’

‘‘नाही, तुम्ही माझे बाबा नाही. तुम्ही तसे दिसता; पण तुम्ही माझे बाबा नाही.’’ असं दीपक किंचाळत ओरडत होता; पण बाबांनी आपल्या लोखंडी पकडीत त्याचा हात धरला तो सोडला नाही. त्यांनी दीपकला टेबलाशी नेऊन त्याच्या खुर्चीत कोंबला आणि म्हटलं, ‘‘नीट ताठ बैस! न्याहारी कर झटपट. समोर ठेवलेलं सारं नीट पटापट चावून खा.’’ ‘‘मला भूक नाही. मी आता खेळायला जातो.’’ असे म्हणून दीपक खुर्चीवरून उठला. त्याच्या खांद्यावर लोखंडी गजाचे ठोके बसल्यासारखे ठोके बसले. त्याने पाहिले तर त्याचे बाबा त्याच्या मागे उभे. ते खणखणीत आवाजात म्हणाले, ‘‘दीपक! खेळायला जायचं नाही. मी तुझा गृहपाठ तपासला आहे. तू चूक केली आहेस. पुन्हा सगळा गृहपाठ कर….’’ ‘‘पुन्हा गृहपाठ? झालेली चूक दुरुस्त करतो की.’’ दीपक म्हणाला. ‘‘नाही. सगळा पुन्हा. नाहीतर मित्रांना भेटायला जाता येणार नाही. खेळणं बंद’’, बाबा म्हणाले. दीपक मुकाट्यानं गृहपाठ 39 करायला गेला. गृहपाठ केला आणि तो आपल्या वर्गातल्या मैत्रिणीकडे खेळायला गेला. तिथं त्याची मैत्रीण ज्यूली त्याला दिसेना, तो तिच्या बंगल्याभोवती हिंडला, बागेत तिला शोधत बसला, शेवटी हताश होऊन एका पायरीवर बसला, धापा टाकत. तेवढ्यात लांबून कुणीतरी खणखण करत येताना दिसलं, जवळ आल्यावर त्याच्या लक्षात आलं, की एक यंत्रमानव त्याच्या मैत्रिणीला-ज्यूलीला कडेवर घेऊन येत होता, ती ओरडत होती, ‘‘सोड मला! खाली उतरव मला! मला चालता येतंय! मी पळणार नाही!’’

दीपकजवळ तो यंत्रमानव तिला तसाच घेऊन आला, तेव्हा ती ओरडली, ‘‘दीपक, तू केव्हा आलास? किती उशिरा आलास खेळायला आणि हा लोखंडी राक्षस बघ मला खाली सोडतच नाही. सोड की मला! ठेव खाली!’’ ‘‘ज्यूली! उगाच धिंगामस्ती करू नकोस. काही उपयोग नाही. या लोखंडी राक्षसाशी धिंगामस्ती केलीस तर तुलाच खरचटेल, लागेल. मुकाट्यानं वागवतोय तसं वागवून घे. कारण, आता जगातल्या यंत्रांनी बंड करून जगाचा ताबा मिळवलाय. यंत्रं आता जगावर राज्य करतात.’’ असं म्हणून त्या यंत्रमानवानं तिला खाली सोडलं. ज्यूली म्हणाली, ‘‘दीपक! आपण सुटलो!’’ दीपक म्हणाला, ‘‘असं नाही म्हणता येणार. त्यांचा मेंदू गणिती यंत्राचा आहे. आपण कुठं आहोत हे त्याला कळू शकेल. तो आला बघ! थांब! त्याची पाठ आपल्याकडे आहे. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक बटण दिसतंय. हळूच जाऊन ते दाबतो. बघूया काय होतंय ते.’’ असं म्हणून दीपक हळूच त्या यंत्र रक्षकामागे गेला आणि त्यानं त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला असलेलं बटण दाबलं आणि एकदम घड्याळाच्या गजरासारखा गजर झाला. दीपक जागा होऊन ताडकन उठून बसला. त्यानं पाहिलं तर सकाळचा सातचा गजर झाला होता. दीपकनं आजूबाजूला पाहिलं आणि तो पुटपुटला, ‘‘भयानक स्वप्न!’’

दीपक एकदम काही आठवण झाल्यासारखा ओरडला, ‘‘अरे बापरे! बाबा!’’ आणि पळत सुटला. वाटेत त्याला त्यांचा स्वयंपाकी भेटला. तो त्याच्याकडेच चहा घेऊन निघाला होता. दीपकनं त्याला विचारलं, ‘‘बाबा कुठं आहेत?’’ तो म्हणाला, ‘‘आज लवकर न्याहारी करून कचेरीत गेले!’’ दीपक तिकडे धावला आणि बाबांच्या खोलीत जाऊन ओरडला, ‘‘बाबा! तुम्ही तुमच्या यंत्र अधिकाऱ्यांना काढून टाका. पूर्वीची माणसं कामावर घ्या नाहीतर…नाहीतर,’’आणि हुंदके देऊन तो रडू लागला.

वडिलांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं, ‘‘दीपक! अरे मलाही तसंच वाटायला लागलं होतं. एकटं एकटं आणि सुनं सुनं वाटायला लागलं होतं. उदास, शुष्क आणि निर्जीव वाटायला लागलं होतं. म्हणून मी कालच ठरवलं होतं, की आपली सगळी ऑफिसची माणसं परत बोलवायची. यंत्र-कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करायची, म्हणून त्या सर्वांना काल रात्री फोन केले, तारा केल्या आणि विमानानं इथं बोलावून घेतलं.’’ दीपकला घेऊन दीपकचे बाबा कचेरीत हिंडले. कचेरीत पुन्हा निर्माण झालेला जिवंतपणा, गजबज, हास्यविनोद, कामाची धावपळ पाहून दीपक सुखावला, आनंदानं हसू लागला. ते पाहून दीपकचे बाबा त्याला म्हणाले, ‘‘दीपक! काहीही झालं तरी माणसं ती माणसं. माणूस आहे तिथे जिव्हाळा आहे. माणुसकी आहे, प्रेम आहे. यंत्र कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाहीत.’’ आणि ते खरंच नव्हतं का?