रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती,
पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती. ।।धृ।।
आकाशाला रंग निळा दया,
छटा रुपेरी वरति असू दया,
निळ्या अभाळी हिरवे राघू, किती पाखरे उडती. ||१||
अवतीभवती काढा डोंगर,
त्यावर तांबुस रंग काळसर,
डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती ॥२॥
चार नेमक्या काढा रेषा,
विटाविटांच्या भिंती सरशा,
लहान-मोठ्या चौकोनांची खिडक्यादारे होती. ||३||
लाल लाल कौलारू छप्पर,
अलगत ठेवा वरती नंतर,
गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती. ॥४॥
सजले आता तुमचे घरकुल,
पुढति त्याच्या पसरा हिरवळ,
पाऊलवाटेवरून तांबड्या सखेसोबती येती. ||५||
रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती,
आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती.
पदमिनी विनीवाले