१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)

इटली नावाच्या देशातलं उंचच उंच पर्वताच्या उतारावरचं व्हिंची नावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्याशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगराएवढे खडकच खडक… अशा सुंदर निसर्गरम्य गावात १५ एप्रिल, १४५२ या दिवशी पिअेरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा व्हिंची याचा जन्म झाला.

लहानपणी लिओनार्दो डोंगरदऱ्यांतून मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग यांबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. याच वयात त्याला चित्रं काढणं खूप आवडायला लागलं. त्याचे वडील ‘कशाला चित्रं काढतोस?’ असं म्हणून त्याला कधीही रागावले नाहीत. लिओनार्दोला चित्रं काढायला इतकं आवडू लागलं, की तो तहानभूक विसरून जात असे. आपली चित्रं खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा. तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचंनिरीक्षण करत बसायचा.

दहा ते बारा वर्षांचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला. त्या वेळेचं फ्लोरेन्स हे बुद्‌धिमंत, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्त्वज्ञ यांचं शहर होतं. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून ते सत्ताविसाव्या वर्षांपर्यंत लिओनार्दोनं व्हेरोशिओ या त्या वेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दोनं अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो त्याच्या वहीत ‘वर्गमुळांचा गुणाकार कसा करायचा हे ल्यूकाकडे जाऊन शिकून घे’ असं स्वत:च स्वत:ला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवत असे. त्याला गणित अणि तंत्रज्ञान हे विषयही खूप आवडत. विश्व कसंनिर्माण होतं, प्रलय का आणि कसा होतो?

 या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यानं खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता. ॲन्टोनिओ डेल पॉलिओलो हा शरीररचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहांचं विच्छेदन करणारा पहिलावहिला चित्रकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या स्टुडिओत जाऊन लिओनार्दो शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेत असे. चित्र काढताना प्रत्येक अवयवाचं प्रमाण आणि रचना यांच्या तो गणिती पद्धतीने नोंदी करून मगच त्यांची रेखाटनं करत असे. लिओनार्दो शिल्पकलेपेक्षा चित्रकलेला जास्त श्रेष्ठ दर्जाची कला मानत असे. ‘शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो;

पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो’, असं त्यानं लिहून ठेवलं होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे. कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असंही त्याला वाटे. १४७२ साली लिआेनार्दोनं ख्रिश्चन कथेवर आधारलेलं ‘ॲनन्‌सिएशन’ नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. लहानपणापासूनच लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत नसे. तो खूपच शांतताप्रिय होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असत, तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टींबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडे. त्याचा आवाजही सुरेल होता. त्यामुळे तो गायला लागला, की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं गाणं ऐकत. ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे.

 लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी, प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे ‘मोनालिसा’चं चित्र. १५०३ ते १५०५ अशी तीन वर्षं लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकतं. फ्रान्सेस्कोदी बार्टोलामिओ डेल गिओकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोना लिसा नावाच्या चोवीस वर्षांच्या बायकोचं हे चित्र होतं. हे चित्र ‘ला गिओकोंडा’ या नावानंही ओळखल जातं. हे चित्र काढताना लिओनार्दोनं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये, म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायक-वादकही ठेवले होते असं म्हणतात. आजही इतक्या वर्षांनंतर मोनालिसाच्या डोळ्यांतली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारं आहे.

 ‘मोनालिसा’ हे चित्र आज पॅरिसच्या ‘लुव्र’ संग्रहालयात आहे. लिओनार्दो दा व्हिंची कोण नव्हता? तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा कलावंत होता! लिओनार्दोनं काढलेल्या ‘मॅडोना ऑन दी रॉक्स’, ‘लास्ट सपर’ आणि ‘मोनालिसा’ यांसारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दोनं अनेक यंत्रंही तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आज आपण जी हेलिकॉप्टर्स बघतो, तशाच हेलिकॉप्टर्सची लिओनार्दोच्या नोंदवह्यांत अनेक रेखाटनं आणि गणितं बघायला मिळतात! सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी तीनशे वर्षे आधीच लिओनार्दोनं सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यांतली तंत्रं समजून घेण्याचे अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत.

आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयांवर टिपणं करून ठेवली होती. त्यात प्रकाशविज्ञान, आवाजविज्ञान, मेकॅनिक्स, हैड्रोलिक्स उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीरविज्ञान यांच्याविषयीचं संशोधन करून विचार आणि इतर माहितीही त्यानं टिपली होती. साडेतीन हजार पानं होतील अशा त्याच्या एकोणवीस वह्या आजही उपलब्ध आहेत. २ मे, १५१९ या दिवशी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी, कला आणि विज्ञान या दोन्हीही शाखांत संचार करणाऱ्या लिओनार्दोनं या जगाचा कायमचा निरोप घेतला. आपली चित्रं, शिल्पं, आपण बांधलेल्या इमारती, पूल, तसंच आपलं संशोधन हे सारं सारं जगासाठी तो आपल्यामागे ठेवून गेला.