१०.सुगंधी सृष्टी

मी लहान होतो तेव्हा आमचे बिऱ्हाड पुण्यास शनिवार पेठेत असे. तेथे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कोठूनतरी मिळवून लावले होते. हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली, तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज दहादा त्या कुंडीपाशी जाऊन येई. मुगाच्या दाण्याएवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली, तकतकीत पांढरी दिसू लागली; उत्कट आतुर भासू लागली. आई म्हणाली, ‘आज ती फुलणार हो बहुतकरून.’ संध्याकाळी सहाच्या सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली. अंमळशाने दुसरी पाकळी, मग तिसरी. सुगंधी पेटीचा एक एक खणच जणू उघडत चालला होता.

मी कुंडीशेजारी बसून राहिलो. निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो, तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता. कळीची सारी दले साफ उघडली होती. मोगरा फुलला होता! रात्रीच्या अंधारात पांढरेशुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर, मला जे काही वाटले त्याचे वर्णन मी कसे करू? मी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळीच.

मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचेही झाड लावायला सोपे. शिवाय ते दिसायलासुद्धा सुंदर. रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एकापाठोपाठ फुले फुलू लागली, की रोज रात्री नवा आनंद घ्यावा आणि निशिगंधाचे फूल असते तरी किती डौलदार! हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे, ते सहज लक्षात येते.

पण मोगरा काय किंवा निशिगंध काय, स्वभावाने लाजाळू नाहीत. आपला रंग, आपला गंध, आपला डौल ते लपवत नाहीत. निशिगंध तर आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब; पण ह्या स्वारीचा रुबाब काही औरच असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही, पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही नि अधिक झाले तरीही सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे, मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे, एवढे सगळे करावे तेव्हा हे राजेश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला, की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. नव्हे, त्याचे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी? किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध! त्यांना सीमा नाही. त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला! काळसर मखमलीसारख्यापाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजब चीज होती.

सायलीची वेल एकदा आळे करून लावली, की मग तिच्याकडे फारसे लक्ष नाही दिले तरी चालते. बाराही महिने ती फुललेली राहते.

पारिजातक तर कमालीचा निरिच्छ. तो कोठेही लावा. त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका. पावसाळी ढग आभाळात भरून आले आणि त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की ह्या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास कळे. त्याच्या पांढुरक्या गांठाळ अंगोपांगांतून हिरवे रोमांच फुटतात. अगदी बुंध्यापासून शेंड्यापर्यंत आणि मग त्याला सुगंधाची झुंबरे लटकतात. सकाळी पारिजातकाखालून जाणे म्हणजे पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखेच निदान मला तरी वाटते.

पाऊल टेकावे तरी कोठे? साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारता अंथरलेली असते ना? कसे ठेवायचे पाऊल? आपले अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहेत. ते एकदा म्हणाले, ‘द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे. तो मूठ पुरेपूर उघडून देतो. काही म्हटल्या काही मागे ठेवीत नाही. वा! ह्याला म्हणावे दान!’