११. गोष्ट अरुणिमाची

दोस्तांनो, मी.. अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू्? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही…नव्हते.. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला… लखनऊपासून २०० किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते.

११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. ‘बस…एवढे कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.’ अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातला प्रत्येकजण ‘अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे’, अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. ‘अरुणिमा, रेल्वेयेतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे’, हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायांवरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, तब्बल ४९ रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या…एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता; पण दुसऱ्या पायाचीही दुरवस्था झालेली.

त्या रात्री तब्बल सात तास, रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता…सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार.

 बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला, ‘डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल.’ डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:चे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्यादेखतच माझा पाय कापला गेला.

 इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते; पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. ‘फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली’ ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये (AIIMS) हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या…पण…पण शल्य एकच होतं, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. ‘अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली’ इथपासून ते ‘अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला’, इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल चार महिने ‘एम्स’मध्ये (AIIMS) राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. मी नि माझं ढालीप्रमाणं रक्षण करणारं कुटुंब-आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो; पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस.

त्याच दिवशी, हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला, ‘जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोटे दाखवत आहेत त्यांना बोलू दे; पण एक दिवस नक्की माझा असेल, जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल!’ विश्वास ठेवा- कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं; पण माझं मन थोडंच अपंग होतं? गगनभरारी घ्यायचं वेड रक्तातच असावं लागतं…जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवताे तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू? आपला सर्वांत मोठा मोटिव्हेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वत:च असताे. आता उठता-बसता, खाता-पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते.

 माझ्या, एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. ‘शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसताेय.’ अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरी नेलं; पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला ‘शक्य आहे’ असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता.

पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’मधून डिस्चार्जमिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास…तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला…!’’

 ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणाने लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना, माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडाज्या वेळी मी जमिनीत रुतवत असे त्या वेळी ते सतत गोल फिरत त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या ‘अशा’ अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेरपा यायला तयारच होईना. साहजिक आहे, जिथे अव्यंग, धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत तिथे माझी काय कथा? पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेरपाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी ५२ दिवसांची एक रोमांचकारी लढाई!’

 प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी चार बेसकॅम्प्स करावे लागतात. एकदा का तुम्ही ‘कॅम्प चार’ला पोहोचलात, की तिथून शिखर ३५०० फुटांवर आहे; पण जास्तीत जास्त मृत्यूयाच टप्प्यात होतात म्हणून याला ‘डेथ झोन’ म्हटले जाते. मला तुम्हांला सांगावंसं वाटतं, की चौथ्या बेसकॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्पसमध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे, की लोक विचारत, ‘मॅडम, हर बार आप हमसे आगे रहते हो! आखिर खाते क्या हो भई?’ मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला…कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं…

‘डेथ झोन’ची चढाई सुरू झाली…जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला…पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. ‘तुला मरायचं नाहीये, अरुणिमा’, अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. २१ मे, २०१३ ला चढाईचा अगदी शेवटला टप्पा आला. ‘अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय, आत्ताच मागे फिर…एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!’ शेरपा कळकळीने बजावत होता; पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की Now or never! आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही, तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेरपाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला..मी अशी नि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेरपाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेरपाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला…अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला.

आता मी उतरू लागले होते. जेमतेम ४०-५० पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला…एक सांगू? लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण Fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे…जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलिंडर आम्हांला दिसला. माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या ‘डेथ झोन’मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे…आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. ‘माझा दिवस’ अखेर आला होता…गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर ‘एव्हरेस्ट’ मी सर केले होते!

गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच; पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागताे यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहाेत की नाहीत हे ठरतं. तुम्हां कुमार वयोगटांतल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं, की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं, तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं.