इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा, तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे; पण बाली मात्र ह्या कंठ्यातील कंठमणी. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्याएवढे आणि गोव्यासारखेच.
आपल्या नृत्य-गायन-शिल्प-चित्र अशा विविध ललितकलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे. ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे, हा ह्या बेटांचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा, असे हे बाली बेट अाहे. जकार्ताहून रात्री अकराच्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्टखाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे, हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, ‘‘तुम्हां उभयतांचे अधिक मन:पूर्वक स्वागत!’’
मध्यरात्रीची वेळ. किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती. भोवती माडांच्या राया. मधूनच झापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात ‘हौ वंडऽफुल्!’ म्हणायला सुरुवात केली होती. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास, दीडतास त्या किर्र झाडीतून वाट काढत अामची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगलीपुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचा दीड-दोनचा सुमार असेल; पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही, हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हां प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घाेरणे ऐकायला सुरुवात केली.
पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहातो तो दारात समुद्र! त्या अंधूक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटीपुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता, एरवी थेट गोवे. मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली— ‘प्रियेऽ पहा! रात्रीचा समय सरुनि येत उष:काल हाऽऽ!’ अण्णा किर्लोस्करांनी गुर्लहोसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच ते गाणे लिहिले असावे. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात; पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नाची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार?
इंडोनेशियावर डचांनी राज्य केले; पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाहीत. कुणी म्हणतात, डचांनी बालीचा म्यूझिअम पीस केला. ह्या बेटाचे प्रदर्शन मांडले. त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या. टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित; पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे; पण ‘आहे’ म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच.
हॉटेलातल्या त्या बगिचातून मी अाणि माझी पत्नी नाटकातल्या बगिचाच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ, इतका गर्द बगिचा क्वचित पाहायला मिळतो. माडापोफळींच्या राया असतात; पण माड आणि पोफळींखेरीज इतर इतकी झाडे होती, की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ‘ही कोण मंडळी आली आहेत’ म्हणून आमच्याकडे पाहताहेत की काय, असे मला वाटायला लागले. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी! एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने नि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे पाहून मिस्कीलपणाने डोळेही मिचकावले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंगधुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता. काही जागी, काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुलांमाणसांनी, लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणीव होती ती पहाटेचे मंगल पाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची! बाली बेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षिगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे! शापसंभ्रमातल्या पुंडरिकासारखा ‘मजवरि तरु कुसुमरेणु वरुनि ढाळिती-’ म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणीसमवेत मी त्या बागेतून हिंडलो. बाली बेटावरच्या त्या पहाटवाऱ्याने आम्हांला पुरते झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्नदोघांनाही एकदम पडले होते.