माझ्या आज्यानं पंज्यानं
रोज इनल्या येसणी,
तुझ्या मातले गोरपे
तवा करीती पेरणी.
माझ्या आज्यानं पंज्यानं
किती इनल्या गोफणी,
तवा नेमानं चालते
तुझ्या रानाची राखणी.
माझ्या आज्यानं पंज्यानं
रोज वळली चऱ्हाटं,
पाट भरून वाह्याची
तुझ्या रानातली मोटं.
माझ्या आज्यानं पंज्यानं
रोज इनल्या रं बाजा,
येतो दमून रेघाळ्या
पाठ टेकवितो राज्या.
माझ्या आज्यानं पंज्यानं
रोज वळल्यात काण्या,
तुझ्या दुभत्या म्हशीला
रोज बांधया दावण्या.
माझ्या आज्यानं पंज्यान
पोरं घातली साळंला,
कष्टकऱ्याच्या जिण्याला
दिस सोनियाचा आला.