११. वाहतूक व संदेशवहन

प्रवास किंवा मालाची वाहतूक करताना आपल्याला अनेक बाबींचा विचार करावा लागतो, हे तुमच्या लक्षात आले असेल. प्रवासासाठी विविध मार्ग व साधने उपलब्ध असल्यावर त्या पर्यायांचा विचार आपल्याला करता येतो. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाईमार्ग, नळमार्ग इत्यादी मार्गांद्वारे वाहतूक करता येते.

वाहतुकीचे मार्ग व साधनांची निवड करताना पुढील बाबी विचारात घ्याव्या लागतात.

वरील बाबी विचारात घेऊन प्रवास किंवा वाहतूक केल्यास आपला वेळ व खर्च वाचू शकतो. प्रवास आरामदायी होऊ शकतो. मालाचे नुकसान न होता वाहतूक करता येते. ग्राहकाला द्यावी लागणारी मालाची किंमत केवळ उत्पादन खर्चावर न ठरता, उत्पादन खर्च व वाहतूक खर्च यांवर ठरते. मालाची वाहतूक जलद, सुरक्षितपणे हाेणे आवश्यक असते. वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडल्याने मालाची किंमत कमी राखता येते.

वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते. वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलनक्षमता वाढते, तसेच उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो. आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होत जाते.

नकाशावाचन करताना आपल्याला वाहतुकीच्या मार्गांचे आकृतिबंध सहजपणे पाहता येतात. काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गांचे गडद जाळे, तर काही भागांत विरळ जाळे या स्वरूपात वितरण दिसते. काही भागांत तर वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नसल्याचे आढळते. एखादा प्रदेश वाहतुकीच्या मार्गांपासून कोणत्या कारणांमुळे वंचित राहतो? कोणत्या कारणांमुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. या प्रश्नांची उत्तरे शाेधण्यासाठी प्रदेशाच्या वाहतुकीच्या नकाशासोबत त्या प्रदेशाचा प्राकृतिक नकाशासुद्धा घ्यावा लागतो. या दोन्ही नकाशांचे एकत्रित वाचन केल्यावर या प्रश्नांची उत्तरे सापडतात.

सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना, प्रमुख रस्ते व लोहमार्ग नकाशा एकत्रित अभ्यासल्यास खालील बाबी सहज लक्षात येतील.

सातारा जिल्ह्याची पश्चिमेकडील बाजू सह्याद्री व त्याच्या उपशाखांनी म्हणजेच जास्त उंचीच्या भूप्रदेशाने व्याप्त आहे. तथे ील भूरचना चढ-उताराची आहे. याच परिसरात कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय पसरलेला आहे.

जिल्ह्याच्या मध्य व पूर्वेकडील भाग त्यामानाने कमी व मध्यम उंचीचा आहे.

प्राकृतिक रचनेचा विचार करता सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाहतुकीच्या मार्गांचे जाळे विरळ आहे. जि ल्ह्याच्या पूर्व भागात वाहतुकीच्या मार्गांची घनता मध्यम स्वरूपाची आहे, त्यामानाने जिल्ह्याच्या मध्यभागामध्ये त्यांची घनता जास्त आहे. तुमच्या असेही लक्षात येईल, की या भागातून एक राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग गेलेला आहे. या महामार्गाला जाेडणाऱ्या अनेक रस्त्यांचे जाळे दिसते. यावरून प्राकृतिक रचनेचा म्‍हणजेच डाेंगर, दऱ्या, नद्या इत्यादींचा परिणाम प्रदेशातील वाहतुकीच्या मार्गांच्या विकासावर होतो, हे तुमच्या लक्षात येईल.

वाहतुकीच्या मार्गांचा व प्राकृतिक रचनेचा सहसंबंध असतो. प्राकृतिक रचनेच्या अभ्यासामुळे प्रदेशाची सुगमता व दुर्गमता लक्षात यतेे. मैदानी सखल प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांच्या सोई चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात, त्यामानाने उंचसखल प्रदेशात त्यांच्या विकासावर मर्यादा यतेात.

वाहतुकीचे महत्त्व :

  • व्यापार विस्तार व जाळे.
  • जलद औद्योगिकीकरण.
  • रोजगार संधीची उपलब्धता.
  • क्षेत्रीय दुवा.
  • स्थल उपयोगिता.
  • दुर्मिळतेवर मात (कमतरता).
  • प्रादेशिक असमतोल घट.
  • पर्यटन विकास.

संदेशवहन ः वाहतुकीप्रमाणेच संदेशवहन हीदेखील एक पायाभूत सुविधा आहे. आधुनिक काळात संदेशवहन किंवा माहितीची देवाणघेवाण हीसुद्धा एक महत्त्वाची बाब मानली जाते.

आजच्या आधुनिक युगात कृत्रिम उपग्रह हे संदेशवहनाचे अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी साधन आहे. मोबाइलवर संदेशांचे आदानप्रदान होणे, दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रम दिसणे, हवामानासंदर्भात अद्ययावत माहिती मिळणे इत्यादी गोष्टी कृत्रिम उपग्रहांद्वारे एकाच वेळेस करणे शक्य झाले आहे. सुदूरसंवेदन तंत्राच्या साहाय्याने मिळवलेल्या उपग्रह प्रतिमांचा उपयोग भूपृष्ठावरील साधनसंपत्तीचा अभ्यास व प्रादेशिक नियोजन करण्यासाठी होतो.

आंतरजाल व सामाजिक माध्यमांच्या युगात सर्वांना या व्यवस्थेचा वापर करावा लागताे. भारत सरकार ऑनलाइन ट्रेडिंग, पेमेंट, मनी ट्रान्स्फर इत्यादींचा पुरस्कार करत आहे. त्यासाठी माेबाइलवर वापरता येतील अशी अनेक ॲप्ससुद्धा 86 विकसित करण्यात आली आहेत. उदा., भीम ॲप, एस.बी. आय. एनीवेअर इत्यादी. या संदेशवहनाच्या सुविधांद्वारे आपण अनेक प्रकारची देयके भरणे, खरेदी-विक्री असे अनेक व्यवहार करू शकतो.

संदेशवहनाची सुविधा आता मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. ही सुविधा फक्त दूरध्वनीवरून बोलणे किंवा संदेश पाठवण्यापुरती राहिली नसून आपण आता व्हिडिओ कॉलिंग देखील करू शकतो. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे एकाच वेळी अनेकांशी बोलू शकतो.

संदेशवहनाच्या अशा फायद्यांबरोबरच अनेक तोटेसुद्धा आहेत. आंतरजालाद्वारे अनेक गुन्हे होत असतात. उदा., ई-मेल/संकेतस्थळ हॅकिंग, फसवणूक, चोरी, सायबर हल्ले, युद्ध, आतंकवाद इत्यादी. यामध्ये माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक, महत्त्वाच्या संकेतस्थळांवर आक्रमण अशा प्रकारचे धोके संभवतात, त्यामुळे आंतरजालावर सामाजिक माध्यमांचा वापर करताना खूप काळजी घेणे अावश्यक असते. आपली माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही देऊ नये. स्वतःहून कोणतीही संवेदनशील किंवा व्यक्तिगत माहिती सामाजिक नेटवर्किंग साइट्स, ब्लॉग इत्यादींवर टाकू नये. आकृती ११.६ मध्ये सायबर हल्ल्यांची प्रतिमा दाखवली आहे. हे हल्लेविविध देशांदरम्यान होताना दिसत आहेत. यावरून तुम्हांला जागतिक आंतरजालावरील सायबर युद्धाचा अंदाज करता येईल.