१२. गोधडी

गोधडी म्हणजेच

नसतो फक्त चिंध्यांचा बोचका

 गोधडी म्हणजेच गोधडी असते.

 मायेलाही मिळणारी ऊब असते.

 गोधडीला असते अस्तर

 बापाच्या फाटक्या धोतराचे

किंवा

 आईला बापाने घेतलेल्या

फाटक्या लुगड्याचे

 आत

गोधडीत

 अनेक चिंध्या असतात

 बसलेल्या दाटीवाटीनं

 आईनं दटावून बसवलेल्या.

 तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात

 त्यात असतो

 मामानं घेतलेला, भाच्याचा

 जीर्ण कुडता

माहेरातून आलेलं

 आईच्या लुगड्याचं पटकुर

आणि

पहिल्या संक्रांतीला

 बानं घेतलेलं-

 आईनं असंख्य ठिगळं लावलेलं

 तिचं लाडकं लुगडं

आणि

बाच्या कोपरीच्या बाह्या

आईनं ते सगळं

 स्मृतीच्या सुईनं

शिवलेलं असतं त्यात.

म्हणून गोधडी म्हणजे

 नसतो चिंध्यांचा बोचका

ऊब असते ऊब!