१२. पर्यटन

आपण विविध हेतूंनी जवळचा अथवा दूरचा प्रवास करताे उदा., सण, समारंभ, उत्सव, खेळ, भटकंती, मनोरंजन इत्यादी. कोणत्याही ठिकाणी जाताना पूर्वतयारी करावी लागते. जसे, त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडणे, वाहतुकीची साधने, आवश्यक दैनंदिन गरजेच्या वस्तू घेणे इत्यादी. इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर आपण तेथील प्रेक्षणीय आणि रमणीय स्थळांना भेटी देतो. काही वेळा तेथे वास्तव्य करतो. तेथील काही सेवासुविधांचा लाभ घेतो. त्या बदल्यात आपण मोबदलाही देतो.

आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनाेरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे, इत्यादी उद्देशांनी प्रवास केला जातो. असा प्रवास म्हणजे पर्यटन होय.

नकाशात दिलेली ठिकाणे वेगवेगळ्या कारणांमुळे नावारूपाला आली आहेत. ठिकाणांच्या प्रसिद्‌धीसाठी विशिष्ट गोष्टी कारणीभूत असतात. उदा., निसर्गसौंदर्य, आल्हाददायी हवामान, रमणीय दृश्ये, गरम पाण्याचे झरे, सागरकिनारे, ऐतिहासिक वास्तू, शिल्पकला, धार्मिक स्थळे, अभयारण्ये, इत्यादी. हेच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.

राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटनाचे पुढील दोन प्रकार पडतात.

स्वदेशी पर्यटन : देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून संबोधले जाते. उदा., महाराष्ट्रातील पर्यटकांनी तमिळनाडू राज्यात कन्याकुमारी येथे पर्यटनासाठी जाणे. नागपूरच्या पर्यटकांनी औरंगाबाद येथील वेरूळ व अजिंठ्याची लेणी पाहण्याकरिता जाणे.

परदेशी पर्यटन ः आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. उदा., भारतातील पर्यटकांनी स्वित्झर्लंडला पर्यटनासाठी जाणे. अमेरिकेतील पर्यटकांनी भारतात पर्यटनासाठी येणे.

पर्यटनाचा हेतू आणि पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये यांच्या आधारे पर्यटनाचे अनेक प्रकार पडतात. त्यांपैकी काही प्रकार सोबतच्या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहेत.

पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. या व्यवसायातून प्रदेशाच्या नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थितीची ओळख जगाला होते. देशी पर्यटकांप्रमाणेच अनेक परदेशी पर्यटक प्रदेशातील विविध ठिकाणांना भेटी देतात, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची भर पडते. या फायद्यांशिवाय पर्यटन स्थळांचा विकास होणे, तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होणे इत्यादी चांगल्या गोष्टीही घडतात.

पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक रहिवासी प्रदेशातील निसर्गाचे, संस्कृतीचे जतन करण्याबाबत सजग बनतात. पर्यटनाच्या विकासासाठी विविध माध्यमांतून जाहिरात केल्यास पर्यटन व्यवसायाची वाढ होण्यास मदत होते.

पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचे विविध प्रकार उदयास येत आहेत. त्यांपैकी एक म्हणजे पर्यावरणस्नेही पर्यटन होय. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे लक्षात आल्यानंतर ‘पर्यावरणस्नेही पर्यटन’ ही संकल्पना पुढे आली. पर्यटनाचा हा एक पर्यावरणपूरक प्रकार आहे. पर्यटन करताना पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेतली जाते. असे पर्यटन पर्यावरणस्नेही असते. या पर्यटनाद्वारे पर्यटन स्थळी कचरा न टाकणे, ध्वनिप्रदूषण टाळणे, वृक्ष व वन्य पशुपक्ष्यांना इजा न पोहोचवणे इत्यादी दक्षता घेतली जाते.

याचबरोबर अलीकडील काळात कृषिपर्यटन ही संकल्पना उदयास आली आहे. शहरापासून दूर, प्रदूषणमुक्त अशा ठिकाणी शेतीसंबंधित क्रियांची सांगड घालून कृषिजीवनाचे दर्शन घडवले जाते. ते पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित केले जाते. त्यास कृषिपर्यटन म्हणतात. शहरी जीवनशैलीत बदल म्हणून लोकांनी शेतात जाऊन राहणे, शेतकऱ्यांकडून सशुल्क पाहुणचार स्वीकारणे यांचा कृषिपर्यटनात समावेश होतो. महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात कृषिपर्यटनासाठी उत्तम पर्यटन स्थळे विकसित झाली आहेत.

चित्रपट पर्यटन हा पर्यटनाचा एक नवीन प्रकार आहे. ज्या ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते, तेथे येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता चित्रपट पर्यटन संकल्पना पुढे आली आहे. त्याकरिता चित्रीकरणाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सेवा व सुविधा पुरवण्यात येतात. उदा., मुंबई चित्रनगरी, रामोजी फिल्मसिटी इत्यादी.

कोकणातील तारकर्ली हे ठिकाण समुद्रतळ व तेथील जीवसृष्टी पाहण्यासाठी प्रसिद्ध अाहे. या ठिकाणी पर्यटकांना ‘स्नॉर्कलिंग’ व ‘स्कूबा डायव्हिंग’ करण्याची सोय आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने तारकर्ली (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कूबा डायव्हिंग’ प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

भारतातील पर्यटन विकासाचे महत्त्व :

भारत देश निसर्गदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. येथे पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव आहे. भारतातील निसर्गसमृद्धता, आकर्षक भूदृश्ये, हिमालयासारखे उत्तुंग पर्वत, रमणीय सागरकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. याचबरोबर भारतीय संस्कृतीतील विविधता, सण, उत्सव, परंपरा, पोशाख, भारतीय मसाल्यांपासून बनवलेले वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ व भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य यांमुळे पर्यटनासाठी भारतात खूप संधी आहे.

पर्यटन आर्थिक विकास : पर्यटन विकासातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. पर्यटनातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगारनिर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो. पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते; म्हणून पर्यटन हा अदृश्य व्यापार आहे असे म्हणतात.

पर्यटन पर्यावरणीय विकास : पर्यावरणीय विकासासाठी पर्यटन उपयुक्त ठरते. पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. निवासस्थाने, रिसॉर्ट्‌स, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते.

पर्यटन आरोग्य : भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येतात. येथील पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबरच भारतीय आयुर्वेद, योगशास्त्र, प्राणायाम यांतून शारीरिक सुदृढता व मनःशांती मिळावी, हा यामागील हेतू असतो.

भारतामधील रुग्णालयांत मिळणारे उपचार, केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या तुलनेने कमी खर्चात होत असल्यामुळे देखील जगातील अनेक देशांतून रुग्ण भारतात येतात. अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवासुविधांपासून वैद्यकीय पर्यटन विकसित होते.

पर्यटन आणि सामाजिक विकास : पर्यटनाच्या माध्यमातून काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रकल्पांचा विकास होऊ शकतो. ग्रामीण संस्कृती, आदिवासी जीवन व संस्कृती यांसारख्या घटकांचा पर्यटनात समावेश केल्यास पर्यटनाला सामाजिक दिशा मिळते व समाजातील उपेक्षित घटकांचा विकास करता येतो. महाराष्ट्रातील मेळघाटमधील आदिवासी जीवन, समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प; राळेगणसिद्धी, हिवरे बाजार यांसारख्या आदर्श गावांना भेट देणे इत्यादींसारख्या पर्यटनातून सामाजिक जाणीव निर्माण होते व तेथील विकासाला चालना मिळते.

भारतात अशा प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव असून भविष्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरू शकेल.