माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं! खडकातून पाणी काढण्याचं! काय म्हणतेस आई? नळाचं पाणी जाईल? अंघोळ करून घेऊ? अगं पण… काय? खडकातून पाणी नंतर काढू? बरं बाई! म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात.
मला शास्त्रज्ञ व्हायचंय. संशोधन करायचंय. शोध लावायचेत; पण आईला मला अंघोळीला पाठवायची घाई लागलीय! आता सांगा, न्यूटनला जर अशी घाई कुणी केली असती, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं, तेव्हा त्याच्या मनात आलं, की हे सफरचंद खालीच का पडलं? वर का गेलं नाही? काय म्हणतेय ताई? मला वर फेकलं तर मीदेखील खालीच पडेन धाडकन? बरं बरं! तर काय सांगत होताे, न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या ताईनं, आईनं, आजीनं त्रास दिला असता, तर त्याला शोध लावता आला असता का? नाही ना! आता मीदेखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे. मायक्रोस्कोप, टेस्टट्यूब्ज, काचेची पात्रं. सगळं सगळं आणून ठेवलंय! पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय! आता पुस्तकं उघडून वाचायचं तेवढं काम आहे.
टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत. शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात. काय म्हणतेस आई? आत्ताच्या आता अंघोळीला उठू, नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यांतल्या शाईनं अंघोळ करावी लागेल? उद्या मी मोठ्ठा शास्त्रज झालो की हीच ताई, हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस-समारंभात! काय ग ताई? चिडतेस कशाला? शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपंनाही काय? असूदे! माझा निश्चय दांडगा आहे. मी शास्त्रज्ञ होणारच; पण आता कुठला शोध लावूबरं? या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळेच शोध लावलेत, माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवलंय असं वाटत नाही. लसीकरण, अणू, परमाणू, विद्युतशक्ती… आता मी कसला बरं शोध लावू? काय म्हणतेस आई? माझी निळी पँट शोधू? कपड्यांच्या बोळ्यांतसुद्धा तू शोधलीस? काय? निळी पँट शोधली, तर हाच मोठा शोध लावला मी! असं म्हणतेस? आईवर खूप उपकार होतील! आता कळतं, की शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास, मनस्ताप सहन करावा लागला ते !