१२. सलाम-नमस्ते !

शेख महंमदचं एक छोटंसं दुकानहोतं. तो वह्यांची किरकाेळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्येवाटत असू. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख महंमद फार संकोची स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला, की आम्ही त्याला तसं कळवायचो. मग तो येऊन चेक घेऊन जायचा.

एकदा असाच तो आमच्या आॅफिसात आला होता. त्या वेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली; पण त्यानं ती खाल्ली नाही.

 ‘‘का रे शेख? तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का?’’ ‘‘नाही मॅडम. खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान मुलं आहेत. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त.’’

 ‘‘तुला किती मुलं आहेत?’’ मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही, कोणास ठाऊक!

 ‘‘मॅडम, मला एक मुलगी आहे. शिवाय माझी भाचीपण माझ्याकडेच असते.’’ ‘‘का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते?’’

‘‘माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते.’’ मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. ताे काही खूप कमवत नव्हता, त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली.

 ‘‘झुबेदा काय करते?’’ ‘‘ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहेरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. अाम्ही समाधानी आहोत.’’

त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात ‘समाधान’ हा शब्द तसा दुर्मीळच झाला आहे. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला, ‘‘मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का?’’ ‘‘का बरं शेख? काही खास कारण?’’ ‘‘होय मॅडम. झुबेदाला कॅन्सर झालाय. उद्या तिचं ऑपरेशन आहे.’’

 मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला; पण त्याच्याबद्दल मनात िचार येऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता, ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार; पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. अनुभवानं मला बरंच काही शिकवलंय. आपल्या स्वत:च्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत.

आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना, चांगल्या सधन कुटुंबातल्या आई-वडिलांना मी पाहिलंय. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हेही मी पाहिलंय. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही, तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हांला ज्या कुणाबद्दल वाटेल, त्यालाच फाउंडेशन मदत करेल, असा माझा नेहमी आग्रह असतो. मी शेखला फोन केला.

 ‘‘शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली अाहेस तू?’’

‘‘मॅडम, मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे.’’ ‘‘शेख, तू आम्हांला का नाही मदतीसाठी विचारलंस?’’

‘‘मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय; पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.’’ त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं.

जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्रं घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्रं घेऊन तो आॅफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्रं नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला पन्नास हजारांचा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य हाेतं. ‘‘मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात.’’

हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच; पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली, की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. असेच काही दिवस लाेटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं.

एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्याबरोबर चार वर्षांची छोटी मुलगीपण होती. तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता; पण झालरी, बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापूनचाेपून एक पोनीटेल बांधली होती. शेखचा चेहरा दु:खी दिसत होता. ‘‘काय शेख? कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय?’’ ‘‘सॉरी मॅडम, दोन आठवड्यांपूर्वीच झुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली; पण तिचं नशीबच खोटं. खरंतर तुम्हांला येऊन भेटायची, तुम्हांला सलाम करायची इच्छा हाेती हो तिची; पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही तबस्सुम.’’ मी तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस… ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं… बिचारी बावरली होती.

त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय, याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, ‘‘बेटी, मॅडमको सलाम करो!’’ त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला माझ्या तोंडून शब्द फुटेना. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकीट काढलं. ‘‘मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. झुबेदानं पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल साॅरी हं.’’

मी तो लिफाफा उघडला. आत तीन हजार रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. ‘‘मॅडम, तुम्ही पन्नास हजार दिले होते; पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषधपाण्यासाठी फक्त सत्तेचाळीस हजारच खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदाला समजलं, तेव्हा ती म्हणाली, ‘आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू. निदान दुसऱ्या कुणाच्यातरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल, त्याचा जीवतरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण.’

’’ माझ्या नकळत माझ्या डोळ्यांतलं पाणी गालावरून वाहू लागलं. मी झुबेदाला कधीच भेटले नव्हते; पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले.

इतक्या गरिबीत आणि यातना सहन करतानासुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. आपण स्वत: संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच! इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाकशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते.

मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, ‘‘हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहेरबानी असू दे. तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली, तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही चार पावलं पुढे जाऊ दे. आपली ही जी भूमी अाहे ना, ती श्रीमंत का आहे, माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत, म्हणून नव्हे. या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर्यवाढणार आहे.’’ तबस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं.