१३.आपली सुरक्षा, आपले उपाय!

दीपा घाबरीघुबरी होऊन धावतपळतच घरात शिरली. तिने आईला घट्ट मिठी मारली अन् म्हणाली, ‘‘आई शेजारच्या गल्लीतल्या एका काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते. घरात नुसता जाळ दिसत होता. लोक पाण्याच्या बादल्या, मातीची घमेली नेत होते. एका काकांनी गाडी काढली अन् काकूंना दवाखान्यात नेले. आई, त्या काकू बऱ्या होतील ना गं?’’ एका दमात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले. हे सगळे पाहून ती खूप घाबरली होती.

आई तिला म्‍हणाली, ‘‘बाळ, त्या काकू नक्कीच बऱ्या होतील. त्यांना नेलंय ना दवाखान्यात. अगं, आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. नवनवीन औषधं, नवनव्या तंत्रज्ञानांचा वापर सुरू झाला आहे. तू घाबरून जाऊ नकोस.’’ तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते.

शिक्षक व पालक यांच्या मदतीने समजून घ्या.

१. घरात आग कशाकशामुळे लागू शकते?

२. आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा?

३. रेल्वेस्थानक, एस.टी. स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात. त्या कशासाठी असतात?

४. अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिले आहे? त्या ठिकाणी ते का बसवलेले असते?

५. गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे-खिडक्या उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा, असे का?

अंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटण बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडावे. वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला, तर वीजप्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व िवजेचा झटका बसू शकतो.

लग्न, कौटुंबिक समारंभ वा इतर सांस्‍कृतिक कार्यक्रमांमध्ये विजेची अनावश्यक रोशणाई टाळावी. रोशणाईसाठी लावलेल्या दिव्यातून वीजप्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते.

सतरंजी, कारपेट, गालिचा यांखालून विजेची वायर जाऊ देऊ नये, कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीजप्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते.

िवजेच्या एकाच बोर्डवर िवजेवर चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत. वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते.

रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेचे दिवे वा इतर उपकरणे बंद ठेवावीत. त्यामुळे विजेची बचत होते.

घरातील लॅम्‍पशेडवर वा बल्बवर एखादा रुमाल वाळत घातला, बल्ब खूप गरम झाला, तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो.

विद्युत मंडळाच्या डिपीतून अनेक घरांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित केलेला असतो. त्या डिपीमध्ये वायरींचे जाळे दिसते. या डिपीपासून दूर राहावे. त्या वायरींना हात लावू नये.

स्वयंपाकाची शेगडी, स्टोव्हजवळ जळाऊ वस्तू ठेवू नये. उदा., कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, कागद.

अग्निशमन सेवा

कोठेही आग लागली तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते. त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात. आग विझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात. आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते.

आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलास पाचारण करण्यासाठी १०१ या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात. अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण सहकार्यकेले पाहिजे. ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही असे आवर्जून पाहिले पाहिजे; कारण अग्निशमन दल आपले मित्र आहे.