१३. थोडं ‘आ’ भारनियमन करूया (भाग – ३)

गोऱ्या साहेबाच्या आणि त्याच्या भाषेच्या प्रभावाखाली, दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर ‘गोऱ्यांचे शिष्टाचार’ या गोष्टीची अंमळ जास्तच मुद्रा उमटली. ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, ती माणसं कशी ‘थँक्यू /प्लीज’चा जप करतात, त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारांसारखे धसमुसळे नसतात. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात, यांसारखे गुण नेहमी गायले गेले. त्यामुळे थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे, असं काही काळ वाटून गेलं. ‘तू कसली ग माझी थँक्यू ? मीच तुझी थँक्यू.’ त्याला थँक्यूदिलेस का पण? ‘तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच.’ अशी वाक्य हौसेने बोलण्याचा तो काळ होता; पण ते कुणी, कुणाचे, कितीदा मानावेत याला काही सुमार? अति झाल्याने, अस्थानी झाल्याने, कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात, हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाही?

रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तरी माणसं अगदी क्षुल्लक कारणांसाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात. नुकतं बोलायला लागलेल्या मुलालाही सर्वांत पहिल्यांदा थँक्स-थँक्यू वगैरे म्हणायला शिकवतात. हातावर चाॅकलेट ठेवलं, थँक्यू. पापा घेतला, थँक्यू. उंचावरून – जिथे त्याचा हात पुरत नाही – तिथली वस्तू काढून दिली, थँक्यू.

तो आभार मानत होता, कारण त्याला लहानपणापासून तसं शिकवलेलं होतं. आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. सर्व नात्यांना, सर्व निमित्तांना लागू होतील अशी आभारकार्ड आताही मिळताहेत, पुढे ती आणखी वाढतील. जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. लवकरच तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको.

तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होतेच. विशेषतः आपल्या आवडत्या कार्यक्रमांमध्ये तर आभारांचा मारा होई. गाणं कळवलंत म्हणून आभार, हवं ते गाणं ऐकवलंत म्हणून आभार, पत्राची दखल घेतली म्हणून आभार, आभाराच्या पत्राला उत्तर म्हणून परत आभार, अशी चैन तेही करत. सध्याच्या चॅनलवाल्यांनी त्यांना चारीमुंड्या चीत केलेलं आढळतं. एकेकदा मनात येतं, की या सर्व चॅनेलवाल्यांनी एक मार्ग काढावा. रोज सकाळी प्रत्येक चॅनेलवरचे कार्यक्रम सुरू करताना आणि रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल घाऊक आभार मानून टाकावेत किंवा कोणताही कार्यक्रम गळत असला, तरी ठरावीक वेळानंतर एक आभाराची कॅप्शन.. तळटीप फिरवत राहावी. जसे-

  • आजच्या दिवसभरात किंवा अमुकअमुक सत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आमच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला त्यांचे आभार. त्यांनी तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद.
  • आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या त्या सगळ्या सूत्रसंचालकांचे आभार. त्यांना नटवणाऱ्यांचे आभार. नटल्यामुळे ते सुंदरच दिसत होते असं मानणाऱ्यांचे आभार.
  • आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर ज्यांनी ज्यांनी नृत्य केले, गाणी म्हटली, वाद्येवाजवली त्यांचे शतश: आभार.
  • आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी आपापल्या रिमोट कंट्रोलची बटणं फिरवली आणि किमान तीस सेकंद आमचा चॅनेल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम.
  • आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हुकमी ‘मागे वळून पाहिलं’ त्यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्या दुखऱ्या मानांचे शतश: आभार.
  • आज दिवसभर वीजपुरवठा नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोचवणाऱ्या वीजमंडळाचे आभार.
  • आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवरच्या विविध स्पर्धांमध्येभाग घेऊन पैठण्या, हिऱ्यांचे हार, घड्याळं, मिक्सर, सूटिंग, मोटारी, विमाने, सॅटेलाईट, ताजमहाल, कुतुबमिनार इत्यादी छोटीमोठी बक्षिसं जिंकणाऱ्या दर्शकांचे मन:पूर्वक आभार. ही बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार, हरणाऱ्यांचे आभार, बघून जळणाऱ्यांचे आभार इ. इ. इ.

साक्षात पु. ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलंय, की आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते. अादर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो. आभाराबाबतही त्यांचे हे निरीक्षण बव्हंशी लागू पडतं. मुळामध्येआपले संस्कार आणि संस्कृती ही दिखाऊगिरीच्या पक्षातली नाही. भावना दडवून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात, त्या मुखर करण्याची गरज नाही, शब्दबंबाळपणा-प्रदर्शन अजिबात नको, असं ऐकत-शिकत आपण लहानाचे मोठे होतो. आईच्या आजारपणात आपल्या मित्रमैत्रिणींनी मदत केली आणि आपण चुकून आभार मानायला गेलो, तर प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सणसणीत धपका मिळतो. ‘जादा आगाऊपणा केलास तर याद राख’ अशी धमकीही मिळते. तेव्हाच उभयपक्षी जीव शांत होतात. नाहीतर मनामध्येखूप वेळ आभाराच्या संवादाची उजळणी केली, तरी वास्तवात उलटंच होत असतं. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानताना उभयपक्षी अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उणावून नसती औपचारिकता आल्यासारखी वाटते. ‘यात नव्याने काय सांगायचं?’, ‘हे सांगायला विशिष्ट दिवसच हवा का?’ किंवा ‘हे तर सर्वथा माझ्या मनामध्ये असतंच की’ असं वाटून शब्दांतली ताकद निघून जाते. मग एखादा स्पर्श, एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पानभर भाषणाचं काम क्षणात करून टाकतो. ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो, परीक्षेत भलामोठा पराक्रम गाजवून आलेला गुणवंत विद्यार्थी गुरूंच्या पाया पडतो, तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरत्या हाताने क्षणभर थोपटल्यासारखं करतात. तेव्हा त्या कृतीत आभारच सुचवले जातात. फरक एवढाच की ते रूढ ‘आभारप्रदर्शन’ नसतं. ह्या मनाने त्या मनाला दिलेली पोचपावती असते.

आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात. लेखक आणि प्रकाशक, गायकवादक, कलाकार-रसिक, दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडीजोडीनेच कामं करत असतात, करणार असतात. व्यापाराचं, अर्थकारणाचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्कं असेल, तर हा व्यवहाराचा भाग झाला. अंतिम उत्पादन, कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल, तर प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजवावी लागते. तो अलिखित नियम असतो. सहभागी झालेली मंडळी प्रौढ, समंजस असतील तर त्यांना याची स्पष्ट कल्पना असते. ‘आमचा’ सिनेमा, ‘आपलं’ पुस्तक, ‘आमचं’ नाटक असे शब्दप्रयोगही ते सर्रास करत असतात. तेव्हा चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशकानं लेखकाच आभार मानणं याची फारशी गरज नाही. लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटली, तर तो पुढचं, याहून चांगलं हस्तलिखित त्याच प्रकाशकाला देऊ करेल. आपली निष्ठा कृतीनं सिद्ध करेल. दोघंही एकमेकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करतील.

पण हे सगळं कधी? पुढचं काम करायचं असलं तर! आभार मानणं, उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांनी ती चैन का करू नये? तशा चैनीचे दोन-तीन आविष्कारही मला बघायला मिळालेले आहेत. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणतात तशी या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांची अलीकडे फार फरफट झालेली दिसते आणि कित्येक माणसं ते वापरताना गल्लत करतात. गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकायचं एवढं खरं. एका लग्नाच्या स्वागतसमारंभाला गेले होते, तर स्टेजवरच्या नवरदेवाला खालून येणारा मित्र गदागदा हलवून म्हणाला, ‘थँक्स फॉर मॅरिंग हं. लग्न केल्याबद्दल मन:पूर्वक आभार?’

अशा वेळी फार वाटतं. भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं. आता थोडं (आ) भारनियमन करायला लागूया. त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत. अति ताणल्याने मनं शुष्क व्हायला नकोत. सगळं घाईनं संपवायला नको.

नाही म्हणायला, त्यातल्या त्यात आभाराची काटकसर आपण कुठे करतो? तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा. कारण का? तर आपण वट्ट पैसे मोजलेले असतात. मग वरती आभार मानायची गरज काय? डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट्‌स हे आपल्या मते दाबून फिया घेतात. तेव्हा त्यांनी काम केलं तर विशेष काय झालं, असं आपल्याला वाटत असतं. आजच्या काळात हे कमालीचं गैर आहे. मोबदला घेणारा मनुष्य तरी इमानानं काम करेल याची आज काय हमी आहे? शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच (म्हणजे, खरा तर, नको तो) अवयव कापून काढला आणि वर चाकू-सुरी-कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याचे आठवणीने आभार मानायला नकोत? प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही, तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको? इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले, तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको? बँकेमध्ये आपल्याच कष्टाच्या पैशातलं शंभर नोटांचं बंडल आपल्यासमोर मोजून, बरोब्बर शंभर नोटा पुरवणाऱ्या कारकुनांचे तर कृतज्ञतापूर्वक चौकाचौकांत पुतळे उभारावेत असं मला वाटतं. नाहीतर आपण ती नोटांची गड्डी मोजायला जाणार… त्रासणार… नेमके आपण सत्त्याऐंशी-अठ्ठ्याऐंशी किंवा एक्याण्णवब्याण्णववर आलो की आपल्या हातावर माशी बसणार…नाहीतर कानात खाज सुटणार… शेवटी आपल्या नव्याण्णव किंवा एकशे एक नोटा हातात आल्याचं मानून पुन्हा ‘एकी एक… दुर्की दोन’ सुरू करणार. एवढे पैसे मोजण्याचे कष्ट वाचवणाऱ्या त्या अश्राप जिवाला साधी आभाराचीही पावती नसावी अं? खऱ्याची दुनिया नाही हेच खरं!

कोणे एके काळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती. अपत्य छोटं, शस्त्रक्रिया छोटी; पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असूच शकत नाही, तसंच माझं झालं होतं. पंधरा मिनिटांच्या शस्त्रक्रियेवर पंधरा दिवस आइस्क्रीमचा उतारा होता. आल्यागेल्या सर्वांना आइस्क्रीम! बिचाऱ्या डॉक्टरांचे निदान आभार तरी मानूया असा उदात्त विचार केला आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून, खुशाली कळवायला फोन केला. ते दवाखान्यात नव्हते. मी निरोप ठेवला. रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला. ‘‘फोन का केला? सगळं ठीक आहे ना? तापबीप नाही ना आला पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवंय का?’’

ते बोलताना थांबेचनात. जरा श्वास घ्यायला थांबले, तेव्हा मी भसकन संवादात घुसत म्हटलं, ‘‘तसं काही नाहीये हो डॉक्टर… उलट आम्ही सगळे इतक्या एन्जॉय करतोय ना त्याच्या टॉन्सिल्स… सो वी थॉट, तुम्हांला थँक्स द्यावेत.’’

‘‘ओह्नो… एवढ्यासाठी फोन कशाला करायचा? मी केवढा हादरलो होतो… पुन्हा असे फोन करत जाऊ नका हो. आम्हांला सवय नसते… नसतं टेन्शन येतं…’’ ते खूप खरं बोलत होते, म्हणून मला त्यांचा राग आला नाही, दया आली. अशी ना तशी, आभाराच्या बाबतीत ‘परी तू जागा चुकलासी’ हीच आपली गत आहे म्हणायची.

आता थोडं (आ) भारनियमन करून काही सुधारणा करता आली तर बघू.