१३. ध्वनी

१. शाळेमध्ये मधल्या सुट्टीच्या वेळी कोणकोणते आवाज कानांवर पडतात ?

२. वर्गामध्ये शांतता असताना डोळे मिटून शांत बसा. आसपासचे कोणकोणते आवाज ऐकू येतात ?

या सर्व आवाजांची सामाईक यादी करून त्यावर चर्चा करा. आपल्याला ऐकू येणाऱ्या असंख्य आवाजांमध्ये खूप विविधता असते हे तुमच्या लक्षात येईल. या ध्वनींचे लहान-मोठे व आवडणारे – न आवडणारे अशा दोन पद्धतींनी वर्गीकरण करा.

ध्वनी कसे निर्माण होत असतील ?

आवाजाला शास्त्रीय भाषेत ध्वनी म्हणतात.

काही ध्वनी मोठे असल्याने सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूप लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. काही ध्वनी आपल्याला आवडतात, तर काही ध्वनींचा आपल्याला त्रास होतो.

१. घरातील रेडिओ अथवा टेपरेकॉर्डरवर गाणे वाजत असताना त्याच्या स्पीकरवर हात ठेवा काय जाणवते?

काही वेळानंतर रेडिओ अथवा टेपरेकॉर्डर बंद करा. आता काय जाणवते?

२. एक रबरखंड घ्या व चित्रात दाखवल्याप्रमाणे ताणून त्याची एक बाजू सोडून दया काय दिसले ? रबरखंडच्या हालचालीशिवाय इतर कोणती गोष्ट तुम्हाला जाणवली ?

 ३. एखादा तबला घेऊन त्याच्या पडदयावर थोडा भुसा/मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरा. पडदयावर बोटाने टिचकी मारा.

आवाज होत असेपर्यंत काय दिसते? आवाज बंद झाल्यावर काय दिसते ?

वरील कृतींच्या निरीक्षणांतून काय समजते ?

ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची, म्हणजेच स्पीकरचा पडदा, रबरबैंड, तबल्याचा पडदा यांची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते, म्हणजेच या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते. जलद गतीने आंदोलन होत असते म्हणजेच वस्तूचे कंपन होत असते.

ध्वनी निर्माण होण्यासाठी एखादया वस्तूचे ‘कंपन’ होणे गरजेचे असते. वस्तूचे कंपन होत असते, तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनीही बंद होतो.

ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो, तिला ध्वनी स्रोत म्हणतात.

 माहीत आहे का तुम्हांला ?

ध्वनीशास्त्र : ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम यांबद्दलचे विज्ञान म्हणजे ‘ध्वनीशास्त्र’. ध्वनीची तीव्रता डेसिबल (dB) मध्ये मोजतात.

आपल्या घशातील स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या ध्वनितंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनितंतूच्या ताठरपणावर अवलंबून असतो.

करून पाहूया.

एक पाण्याने भरलेले भांडे घ्या. त्याच्या कडेवर छोटासा आघात करा.

तुम्हांला काय दिसते?

भांड्यातील पाण्यावर लाटा निर्माण का झाल्या आहेत ?

ध्वनी कसा ऐकू येतो ?

ध्वनी स्रोताभोवती हवा असते. ध्वनी स्रोताचे कंपन होऊ लागले, की त्याच्यालगतचा हवेचा थरही कंप पावतो. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनांची लाट पसरत जाते. या लाटेलाच ‘ध्वनीलहर’ म्हणतात. या ध्वनीलहरी आपल्या कानांपर्यंत पोहचतात. कानांतील पोकळीत नाजूक पडदा असतो. तो कंपन पावतो. या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानांतील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो.

 करून पाहूया.

ध्वनीचे प्रसारण

१. दोन फुगे घ्या. एकामध्ये हवा भरा व दुसऱ्यात पाणी भरा. चित्रात दाखवल्याप्रमाणे हवा भरलेला फुगा कानावर दाबून धरा. फुग्यावर बोटाने घासा आणि आवाज ऐका.

हीच कृती पाणी भरलेल्या फुग्यावर करा.

कोणत्या फुग्यामधून आवाज अधिक स्पष्ट ऐकू आला ?

२. एका मोठ्या टेबलाच्या एका टोकाशी तुम्ही उभे रहा व दुसऱ्या टोकाशी मित्राला उभे करा. मित्राला हळूच टेबलावर टिचकी मारायला सांगा, तुम्हांला पुसटसे ऐकू येईल.

आता तुमचा कान टेबलाशी धरा आणि मित्राला तशीच टिचकी पुन्हा मारायला सांगा. काय जाणवते ?

हवा, पाणी किंवा एखादया स्थायूमधून ध्वनी लहरींच्या रूपाने प्रवास करून आपल्या कानांपर्यंत पोहचतो, परंतु हवेच्या तुलनेत द्रवातून ध्वनीचे प्रसारण अधिक स्पष्टपणे होते, तर स्थायूमधून तो सर्वाधिक स्पष्ट ऐकू येतो. असे का होते ?

ध्वनीलहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या वेगाने होते. ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून, तर द्रवापेक्षा स्थायूतून अधिक वेगाने होते.

 गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण

मोठा आवाज हा कर्कश्श वाटतो. आवाजांमुळे गोंगाट निर्माण होतो.

पृष्ठ क्रमांक ९४ वरील दोन प्रसंगात दिसणारी परिस्थिती सभोवताली असते. पैकी काही आवाज चांगले असतात तर काही आवाज ऐकायला फार त्रासदायक असतात. मोठ्या किंवा सततच्या आवाजाचे / गोंगाटाचे त्या ठिकाणच्या लोकांवर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. कानांची ऐकण्याची क्षमता कमी होऊन बहिरेपणा येऊ शकतो. मानसिक थकवा जाणवतो. चिडचिड होते. शांत वाटत नाही. नीट लक्ष देऊन काम करता येत नाही. सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या वाईट परिणामाला आपण ‘ध्वनी प्रदूषण’ म्हणतो.

ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय.

ध्वनी प्रदूषणावर उपाय

१. गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नयेत.

२. घरातील टीव्ही, रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावेत.

३. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी.

४. कारखाने, विमानतळे, रेल्वे व बसस्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत.