सात-आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे पाच-सात अगर जास्तीत जास्त दहा, क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, मैल, काही ठिकाणी दोन-तीन मैल अंतरावर वसलेला असतो. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे पाच-सहा मैलांचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत.
अशा एका ‘सालकर पाडा’ नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकटीची लाकडे व इतर चार-सहा वासे. काही खोपटांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी ठेंगणी असतात, की आत जायचे म्हटले, तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत-बाहेर करावे लागे. बहुतेक घरे एकदालनीच आहेत. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार! पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा, तर काहींवर पळसाची पाने घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या घरांत रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. खोपट्याच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ इंच उंचीचा, कडेला दगड लावून केलेला, सारवलेला ओटा असे. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यांत कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते.
आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल लागेना. कोणी दिसेना. आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हांला काय हवे होते, ते विचारायलासुद्धा कोणी येईना. पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला, तर सारा शुकशुकाट होता. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली एक-दोन मुले तेथेच शेजारी उभी होती. मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे मनुष्यवस्तीचा भास होत होता.
मी काही खोपट्यांत गेले. तेथे काय दृश्य दिसले? एका बाजूला तीन दगडांची चूल. चुलीत व बाहेर ढीगभर राख! सतत चुलीवर ठेवून राप बसलेले एखादे ॲल्युमिनिअमचे पातेले, एक-दोन मडकी, एक-दोन तवल्या (खापरांची खोलगट तव्यासारखी भांडी), एखाद्या मडक्यात तळाशी चार भाताचे दाणे, शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके, एका तवलीत एखादे हळकुंड, एक-दोन कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने, फूट-दीड फूट लांबीचा, एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता. त्यात तंबाक म्हणजे तंबाकूची पाने किंवा तंबाकू ठेवत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती.
आम्ही खोपट्यात गेलो. बाहेर आलो. आम्हांला कोणीही हटकले नाही, की तुम्ही कोण? येथे काय करता वगैरे काही विचारले नाही. ग्लानी येऊन निपचित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निपचित पडलेला होता. त्या खोपट्याची ती कळा, तेथे नांदणारे अठराविश्वे दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयाण, भकास वातावरण- हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच. हा भयाण, निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय, असे वाटू लागले. मन अगदी उदास झाले. एक प्रकारची हुरहुर वाटू लागली. मला वाटले, आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो? पुढे काय होणार? आपल्याला माघार घ्यावी लागणार काय?
आपल्याला हे झेपेल काय? आम्ही सुमारे तीन मैल चालत गेलो होतो. काहीच काम साधले नाही, तर उन्हातान्हातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती. मला चहाची फार सवय होती. पुन्हा संजाण स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहासुद्धा मिळणे शक्य नव्हते. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळेच मी स्वत:ला सावरून घेऊ शकले. कोणीतरी वयस्क माणूस केव्हातरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून, कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या, त्या चघळत एका ओट्यावर बसलो.
हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हांला बघण्यासाठी आमच्याभोवती जमा झाली. कोणी हातातल्या काठ्यांवर हनुवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली. घरातली मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले, की गावातली सारी जाणती माणसे, एकूण एक जमीनमालकांकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी एक-दोन समंजस वाटली. त्यांना आम्ही सांगितले, ‘‘मोठ्या माणसांना जाऊन सांगा, की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत. त्यांनी तुम्हांला बोलावलं आहे. त्यांना घेऊनच तुम्ही परत या.’’ त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबुज केली व ती मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोहोचवणार, की काय करणार आम्हांला काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्य मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदेतून सुटलो.
बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्हदिसेना. त्या भयाण जागेत एक-एक क्षण आम्हांला तासासारखा भासू लागला. ती मुले जी गेली ती कोठे गेली, कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना. मधेच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. चहाची तल्लफ जाणवू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातली कालवाकालव दडपून, जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून, कॉ. दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो.
कंटाळून नाइलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग दोन-तीन वारली येताना दिसले. त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जिवात जीव आला. त्यांना लवकर येता आले नाही, कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईनात. ‘टिटवाळा परिषदेतले लोक’ आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार दिसत होते. आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून, तो नाकापर्यंत उभा धरून, नमस्कार केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत, म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हांला घेऊन गेले. ते आमच्याशी काही बोलले नाहीत. आम्ही उभेच होतो. एकाने खोली झाडली, तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली. मी अगदी थकले होते. कुडाला टेकून हातरीवर बसले. इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली. मी झोपडीबाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले. गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले; पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते. सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते. त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. जे दहा-पंधरा जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते. आमच्याशी काय बोलावे त त्यांना सुचेना. सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्यापुढेही प्रश्नच होता. कॉ. दळवी व मी आपसात बोलत होतो. थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा, म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला, ‘‘दादू, थोडा चहा मिळेल का? सोय होईल का?’’ चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. एकजण म्हणाला, ‘‘बाई, जेवण करणार का?’’ जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले आम्हांला चालेल, वगैरे आम्ही त्यांना सांगितले. ‘‘बाई, आम्ही गरीब माणसं. या जंगलात काय मिळणार?’’ एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले. मला वाटले, चहा काही मिळणार नाही, जेवण मिळणार; पण त्यांनी जेवण व चहा दोन्हींच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्यापुढे प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती. त्यांना जरूर लागत नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती. गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण! ते आपसात बोलू लागले.
पहिला वारली : चहा कसा करायचा, काय रं?
दुसरा वारली : च्या होय, सोय तर होल; पण साखर कुठं गवसंल?
तिसरा वारली : आपल्यापायी नाही; पण पाटलाकडे थोडी खांड होवि. दु
सरा वारली : पाटलाकडे गोड (गूळ) मिळेल. पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू!
पहिला वारली : बाई, तुला गोडाचा चहा चालत आहे का? एकाने एका पोराला बोलावून गूळ आणायला सांगितला. चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय, याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले. मी विचारले, ‘‘दुकान कितीसं लांब आहे?’’ ते म्हणाले, ‘‘जवळच आहे. पोर दोन टांगांत परत येईल.’’ मागाहून आमच्या लक्षात आले, की सुमारे तीन मैलांच्या परिसरात दुकान नव्हते. मी विचार केला, यांचा दोन टांगांचा अंदाज तीन मैलांचा आहे तर! चहा-साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते. ते चहा घेतलाच तर बिगरदुधाचा घेत. दूध पिणे त्यांना माहीत नव्हते. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे. उलटी होई. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नातसुद्धा आले नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती, की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. आम्हांला बिगरदुधाचा चहा चालेल, असे मी त्यांना सांगितले. गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. ‘बकरी गवसावयाचे’ या शब्दांत, एखादी बकरी शोधून पकडून, दूध काढून आणायचे, हा सारा अर्थसामावलेला होता. ‘बकरी गवस’ एवढ्या शब्दांत त्या पोराला सारे समजले व ताे त्या कामासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती.
सारी जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार, हे ओळखून मी शाळेच्या बाहेर, झाडाखाली, बाजेवर जाऊन पडले. कॉ. दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले. आम्ही दोघे अतिशय थकलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हांला ताबडतोब झोप लागली. एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या भुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके, एक स्वच्छ घासलेला टोप, तीन दगड ठेवून पेटवलेली चूल, अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हांला उठवले. त्यांना वाटले, त्यांनी केलेला चहा आम्हांला आवडणार नाही किंवा चालणार नाही. त्यांनी केलेलाच चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. काही वारली त्याच्याभोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गूळ व चहाची भुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्य पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरगट, पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत, खळखळा उकळले. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यांत चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले. तेव्हा प्रत्येकाने एक-एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले. चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोट घोट चहा ओतला. अशा प्रकारे आम्हां दहा-पंधरा माणसांची चहा-पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली.