१३. सण एक दिन !

शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली,
चढविल्या झूली ऐनेदार

राजा, परधान्या, रतन, दिवाण,
वजीर, पठाण, तुस्त मस्त.

वाजत्री वाजती, लेजीम खेळती,
मिरवीत नेती, बैलालागी.

दुलदुलतात कुणाची वशिंडे,
काही बांड खोंडे अवखळ,

कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे,
हिरवे, ताबडे शोभिवंत.

वाजती गळ्यांत घुंगरांच्या माळा,
सण बैलपोळा ऐसा चाले.

झुलींच्या खालती काय नसतील
आसूडाचे वळ उठलेले ?

आणि फुटतील उद्याही कडाइ
ऐसेच आसूड पाठीवर !

जरी मिरविती परि धन्याहाती
वेसणी असती घट्ट पाहा.

जरी झटकली जराशीही मान,
तरी हे वेसण खेचतील.

सण एक दिन बाकी वर्षभर
ओझे मरमर ओढायाचे!

– यशवंत