वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाची असते. ‘‘फॅक्ट्स आर सेकेंड बट कॉमेंट्स आर फ्री’’ या पॉल स्कॉट यांच्या सुप्रसिद्ध वचनानुसार घटनेवरील भाष्याचे स्वातंत्र्य संपादकाला अग्रलेखात घेता येते, म्हणूनच वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडीवर केलेले परखड भाष्य होय. चालू घडामोडींचे ठळक वैशिष्ट्य हे रोजच्या अग्रलेखाचे विषय ठरतात. बहुश्रुतता, चिकित्सक विचार व निरीक्षणशक्तीचा कस लागतो. (१) चालू घडामोडीतील विशिष्ट घटना (२) राजकीय अग्रलेख (३) राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे (४) एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव (५) प्रसिद्ध व्यक्तीचे निधन अशा विषयांवर प्रसंगोचित अग्रलेख लिहिले जातात.
समाजमनावर ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सखोल ठसा उमटलेला असतो, अशा व्यक्तींच्या निधनानंतर समाजमनही हेलावते. अशा व्यक्तींच्याबाबत मृत्युलेख लिहून त्यांना, त्यांच्या समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाला संपादक अग्रलेखाच्या रूपाने मानवंदना देतात. त्या व्यक्तीच्या गौरवार्थ, सन्मानार्थ व मुख्यत: त्याच्या कर्तृत्वाचा, चरित्राचा, कार्याचा परिचय सामान्यांपर्यंत पोहोचवणे हा अग्रलेख लेखनाचा उद्देश असतो.
आदर्शवाद हे श्री. सुमंत मुळगावकर यांचे ध्येय होते आणि त्याबाबत ते तडजोड करत नसत. टेल्कोचा कारखाना आणि त्याचे उत्पादन हे याचे उत्तम उदाहरण. मुळगावकर यांच्या निधनाने या देशाच्या कारखानदारीच्या क्षेत्रातील एक सचोटीचा व अत्यंत कार्यक्षम असा सद्गृहस्थ हरपला. आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षमता हे सर्व आजच्या काळात व वातावरणात टिकवणे अत्यंत कठीण आहे; पण मुळगावकर यांनी हे साध्य करून दाखवले. शास्त्र विषयाची पदवी घेतल्यावर त्यांनी लंडन येथे स्थापत्य विषयाची पदवी घेतली. तेथे पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागत असे व मगच पदवी मिळे.
मुळगावकर पदवी मिळवून परत आले तेव्हा मंदीची लाट होती. काही ठिकाणी प्रयत्न केल्यावर, मध्यप्रदेशात कटणी येथे त्यांना सिमेंट कारखान्यात काम मिळाले; पण पहिले सहा महिने विनावेतन काम करावे लागले, नंतर अगदी अल्प वेतनावर त्यांनी काम केले. युद्ध आले आणि मग येथे सिमेंटचे अधिक कारखाने उभे करणे निकडीचे बनले. ही जबाबदारी मुळगावकरांवर आली. ए. सी. सी. ची स्थापना झाली होती आणि मुळगावकरांनी उभारलेले कारखाने सुरू झाले; पण युद्धकाळातच तेव्हाच्या सरकारने तंत्रज्ञांचे एक मंडळ युरोप, अमेरिकेस धाडले. श्री. जे. आर. डी. टाटा आणि मुळगावकर त्यात होते. विटा एकमेकांना जोडण्याचा ‘डिंक’ म्हणजे सिमेंट, किती दिवस तयार करत राहणार? असे टाटांनी मुळगावकर यांना विचारले आणि टाटा कंपनीत येण्याची सूचना केली. काही वर्षांनी मुळगावकर यांनी ती सूचना मानली आणि जमशेटपूर येथे त्यांनी कामाला सुरुवात केली. सुदैवाने मर्सिडिज-बेन्झ या नामवंत जर्मन कंपनीने तांत्रिक साहाय्य करण्याचे ठरवले आणि मग टेल्को मालमोटारी तयार करू लागली. थोड्याच दिवसांत देशी बनावटीची मालमोटार तयार व्हावयास हवी, ही सरकारची अट होती. ती पुरी करण्यात मुळगावकर यशस्वी झाले. जर्मनांना मालाच्या दर्जाबाबत कोणतीही कमतरता चालणार नव्हती. हे तर मुळगावकर यांनाही हवे होते. यामुळे टेल्कोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली. कोणताही कारखाना सुनियंत्रित ठेवायचा असेल, तर त्याचा व्याप किती असावा, याचे मुळगावकरांचे गणित होते. यामुळे जमशेटपूर येथील कारखाना अवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाणार नाही, यावर कटाक्ष ठेवण्यात आला आणि पुणे येथे टेल्कोचा कारखाना स्थापन करण्याचे ठरले.
आज टेल्कोचा पुण्यातील कारखाना हा उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी पहिल्या दर्जाचा आहे. त्याच्या श्रेयाचे मानकरी मुळगावकर आहेत. युद्धकाळात व नंतर मुळगावकर यांच्या अनुभवास हे आले होते, की पहिल्या प्रतीचे तंत्रज्ञ, सुटे भाग आणि उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग याची आपल्याकडे नेहमीच कमतरता असते आणि हेळसांडही होते, म्हणून पुण्यात जेव्हा मुळगावकर यांनी टेल्काेचा कारखाना उभारण्याचे ठरवले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम महत्त्व दिले, ते सर्व थरांतील तंत्रज्ञ कंपनीने शिकवून तयार करण्यास. त्याचप्रमाणे त्यांनी संशोधन विभाग स्थापन केला आणि सुटे भाग तयार करण्याची व्यवस्था केली. यामुळे असे दिसले, की पुण्याचा कारखाना १९६६ साली स्थापन झाल्यावर साधारणत: बारा वर्षेमालमोटारीचे उत्पादन करत नव्हता. कोणत्याही कंपनीच्या संचालकांना हे अवघड वाटणारे होते; पण जे. आर. डी. टाटा यांना याचे रहस्य माहीत होते. ते म्हणत, की मुळगावकरांना कारखाना उभा करायचा नसून एक उद्योग स्थापन करायचा आहे. कारखाना व उद्योग यांतील तफावत टाटा जाणत होते आणि म्हणून मुळगावकर यांना हा एक आदर्श उद्योग उभा करता आला. मुळगावकर हे अतिशय सौम्य प्रवृत्तीचे गृहस्थ. ते मोजके बोलणारे आणि जसे देखणे तसेच टापटिपीचे. टेल्कोसारखा स्वच्छ कारखाना पाहताना आपण कारखान्यात आहोत असे वाटत नाही. आपल्या सर्वदर्जांच्या व्यवस्थापकांनी रोज कारखान्यात फेरी मारलीच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता आणि टेल्कोत ही परंपराच पडली आहे. कारखान्याचे अध्यक्षच कामगारांत मिसळत असल्याने इतर अधिकारीही मिसळतात आणि विचारांची देवाण-घेवाण होते. मुळगावकर यांची आणखी एक सवय होती. ते दौऱ्यावर असताना टेल्कोची मालमोटार दिसल्यास ती थांबवून ते ड्रायव्हरशी बोलत आणि मोटार कशी चालते, अडचणी काय येतात इत्यादी चौकशी करत.
केवळ एक व्यवसाय म्हणून मुळगावकर आपल्या कामाचा विचार करत नव्हते. त्यावर त्यांची श्रद्धा होती. त्याचा त्यांना ध्यास होता आणि आपण जो माल काढतो तो अधिकाधिक सरस व्हावा, यावर कटाक्ष असल्याने त्यांनी संशोधन विभागावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी तंत्रज्ञ शिकवून तयार करणे, हे आपले कर्तव्य मानले होते. मोटारीच्या व्यवसायास त्यांनी दिलेली ही फार मोठी देणगी आहे. देशातल्या या व्यवसायात त्यांचे स्थान सल्लागार व मित्र असे होते. कारखाना आदर्शठेवायचा, तर काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. सौम्य प्रवृत्तीचे मुळगावकर तसा तो घेत, कारण आपल्या कारखान्याची प्रतिष्ठा कशात आहे, एवढाच विचार करून ते निर्णय घेत असत. यामुळे कठोर निर्णय घेणे सोपे जाते, असे ते म्हणत.
मुळगावकर यांना त्यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई यांची उत्तम साथ होती आणि लीलाबाईंच्या सामाजिक सेवेच्या कामात मुळगावकर सहभागी असत. कोयना भूकंप असो वा दुष्काळ, अशा वेळी लीलाबाई जीव तोडून काम करत, त्यास मुळगावकर यांची साथ होती. टेल्कोच्या कारखान्याच्या परिसरातील काही खेड्यांत शेतीसुधारणा, शिक्षण, आरोग्य या संबंधांत गाजावाजा न होता काही वर्षे काम चालू आहे. यामागे मुळगावकर यांची प्रेरणा होती. एक काळ शिकारी असलेल्या मुळगावकरांनी शिकार सोडली आणि कॅमेरा स्वीकारला. छायाचित्रण हा त्यांचा छंद होता आणि त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शनही होऊ शकते. त्यांचा दुसरा छंद झाडे लावण्याचा. पुण्यात कारखाना स्थापन करतानाच त्यांनी लाखएक झाडे लावली आणि यामुळे आज हा परिसर नयनमनोहर झाला आहे. एवढी झाडी असल्यामुळे असंख्य पक्षी येत असतात. टेल्कोने एक वृक्षपेढी स्थापन केली आहे. त्यामधून लाखांवर झाडे वाटली गेली. मुळगावकर यांची ही सामाजिक दृष्टी वाखाणण्यासारखी होती. एक चिनी म्हण अशी आहे, की तुम्हांला तीस वर्षांची योजना आखायची असेल, तर झाडे लावा आणि शंभर वर्षांची योजना करायची असेल, तर माणसे तयार करा. मुळगावकरांनी हे दोन्ही केले. मुळगावकरांचे जीवन समाधानी व कृतार्थ होते.