(शाळा सुटते. सुधीर घरी येतो; पण तो कुणाशीच बोलत नाही. विचारांत गुंतलेला असतो.)
आजोबा : अरे! सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा?
सुधीर : आजोबा, काव्यप्रतिभा वाढवा, म्हणजे काय हो?
आजोबा : कोणी सांगितलं रे तुला हे?
सुधीर : आज शाळेत बाईंनी आम्हांला ‘काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न’ हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय.
आजी : अरे, फार सोपं आहे ते! कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलनशक्ती वाढवणं, म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी.
सुधीर : पण मी हे कसं करू?
आजोबा : अरे, काळजी नकाे करूस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल.
आजी : तुम्ही हो काय प्रयत्न करणार?
आजोबा : अापण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल अन् त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आई : सुधीर हातपाय धू अन्दूध घे.
सुधीर : आजी मी कागद अन् वही घेतो. आताच आपण सुरुवात करू. (आजी दिवा लावते व मोठ्याने ‘शुभंकरोती’ म्हणते.)
आजी : घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात.
आजोबा : आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात.
आजी : कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो.
सुधीर : ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा : तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी!
आजी : बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. (सगळेजण खो-खो हसतात.) (बाबांची रात्रपाळी असते.)
बाबा : अगं आई, अगं आई, पटकन खायला दे ना गं काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही.
सुधीर : कसली घाई, कसली सही, आजीनं दिलं चपाती दही.
आई : काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आजी : आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. (बाबा ऑफिसला जातात.) (आजोबा फिरायला निघतात.)
आजोबा : मला द्या काठी नि चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल.
आजी : तुम्हांला तर समजतच नाही, ताेडून ठेवता काही ना काही.
आई : आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हेका.
आजी : म्हणे रागाचा सोडा हेका, कामाचा का मी घेतलाय ठेका ? शिवणकाम शिकलीस, पण बक्कल लावायला चुकलीस.
आई : चिडता का हो माझ्यावर ? माया करावी सर्वांवर.
सुधीर : तुम्ही अाता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. (सुधीर रुसतो. तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच खो-खो हसते; पण आनंदित होते व सहभागी हाेते.)
ताई : बरं का आजोबा अन् आजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी. आई, आहे का घरात पिठाची सोजी ?
आई : सोजी तुला हवी तरी कशाला ? लाडू खातेस अन् बशी ठेवतेस उशाला. सुधीर : चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. (सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात.)
आजी : रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. (सर्वजण झोपतात.) (सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो.)
आई : सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गार गार, अंघोळीचे पाणी केले गरम फार.
ताई : (सुधीरला) अंघोळ कर पटकन, नाष्टा कर चटकन. झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला.
आजी : आजोबांना द्या स्वेटर, मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. (सुधीर अंघोळ करून आवरून येताे.)
ताई : सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट.
(बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात. खुर्चीवर रेलून बसतात.) बाबा : कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. (आई कणीक मळत असते.) कणीक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा.
आई : तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा.
आजी : सुधीर अावर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपपणा दररोज शीक. सुधीर : आजी, आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण. तुमच्यावाचून हलेना पान. (आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात.)
बाबा : बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस !
(पुस्तके देत) हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. (सुधीर कवितांची पुस्तके वाचतो. त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते.)
सुधीर : बाबा, आई, ताई, आजोबा अन् आजी असंझालंय वाचू किती? कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन्किती? शांताबाईंची बाग अन् सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर अन् बालकवींची फुलराणी. चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी. (सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो.)