‘‘तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत?’’
मला भेटावयास आलेल्या त्या गृहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे. कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो, की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेली जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात. जुन्या आठवणी निघतात. आता आपला तो हा कुठे असतो, अमका तो हा काय करतो, असल्या प्रश्नांची व उत्तरांची देवघेव होते. घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षांपूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात. त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. अशा गप्पा रंगात आल्या, की परस्परांच्या वयाचेही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो, ‘‘तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत?’’
त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी; पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते. मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असंही नाही. तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला म्हणायचं असतं. तुमचं हे बोलणे ऐकून मला आनंद झाला एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो. त्याचा हेतू साधलेला असतो. माझं कर्तव्य मी केलेलं असतं. मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते.
पण एकदा एक गृहस्थ माझ्या खनपटीलाच बसले. ते म्हणाले, ‘‘विषय नका बदलू. केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केलीत सांगा!’’ मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. माझ्या मनात आलं, केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा गृहस्थ मला केसभर विषयांतर करू देत नाही. हा काय चमत्कार? पण त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं. वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसांवर झाकण घालता येते; पण हलके पांढरं पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते, सारंच आभाळ फाटल्यासारखं होतं, कलपाची रंगपंचमी नित्यनेमाची होऊन बसते, माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली, की पैलवानांची पोटं जशी केविलवाणी होतात तशी त्यांच्या केसांची दुर्दशा होते. त्या केसांचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो, कलपाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो. केसांच्या रंगाची छटा हुबेहूब वठवणं निष्णात चित्रकारालादेखील अशक्य वाटेल. मी आपले केस काळे राखण्यासाठी काही तरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजूत माझ्या मित्रांनी का करून घेतली होती ते माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, ‘‘मी कोणतीही युक्ती केलेली नाही. केस काळे राहिले झालं!’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही खरं सांगत नाही. केस आपोआप काळे राहतात काय? बोला, खरं बोला. काय इलाज केलेत?’’ मग मला त्यांची थोडी चेष्टा करण्याची लहर आली व मी म्हटलं,
‘‘तुम्ही पिच्छाच पुरवताहात तेव्हा सांगणं भाग आहे-’’
‘‘आता कसं बोललात?’’ ते खुशीत येऊन म्हणाले, ‘‘सांगा काय केलंत?’’ मी म्हटलं, ‘‘असं पाहा, केस कशामुळे पांढरे होतात? फार विचार केल्यानं, नाही का?’’
हे कारण मान्य करण्यात ते स्वत: फार विचारी ठरत होते. त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले, ‘‘हो, असं तज्ज्ञांचं मत आहे खरं.’’
मी म्हटलं, ‘‘मग या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत? तोच उपाय मी केला!’’ ते म्हणाले, ‘‘लक्षात नाही आलं!’’
मी म्हटलं, ‘‘उगीच भ्रम आहे लोकांना!’’ असं म्हणून मी त्या गृहस्थांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला. ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं, तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन? तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जाताे. त्याप्रमाणेच मला जर एखाद्यानं विचारलं, तुमची विचार करायची वेळ कोणती, तर माझं उत्तर काय असेल?
माझी विचार करण्याची वेळ कोणती? विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा!
हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही. याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे!
या निश्चयानं मी स्वत:चं बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे. माझं उत्तर तयार आहे. उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे; पण ते तुम्हांला सांगायला हरकत नाही. मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला नका विचारू, कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्वकाळच मी विचार करत असतो. लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा. नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर त्याचं मन सतत विचार करतच असतं. त्याची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही तद्वत तो कोणत्याही उद्योगात कसला तरी विचार करत असतो. तेव्हा माझी विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू?
पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वांत आवडते, अगर कोणत्या वेळी सर्वांत जास्त विचार मला सुचतात असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येईल. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक? माझा अनुभव तेवढा मी सांगतो. तो असा, की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वांत आवडती वेळ आहे आणि त्या वेळी मला नवे नवे विचार सुचतातही!
मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो. डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो. त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो. तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच-सखल आडव्या-उभ्या रांगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते; पण बाकीच्या ऋतूंत सबंध देखावा उन्हानं झळकत असतो. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणांचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात. माझं लक्ष त्यांकडे नसतं. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषारांप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मौज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगाची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो. तो देखावा मला मुक्या शब्दांनी म्हणतो, ‘‘नमस्ते!’’ मी उलट म्हणतो, ‘‘नमस्ते!’’ मग मी, गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालांवर, हनुवटीवर, गळ्यावर साबणाच्या फेसाचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो!
आणि त्याच क्षणी नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंज्याच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात!… माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळी झालेला आहे. या वेळीच माझ्या विचारांना का भरती यावी ते मला सांगता येणार नाही. ते एक मला अजून न उकललेलं गूढ आहे. कदाचित असं असेल की दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं, असलेलं मला आवडतही नाही आणि या वेळी मिळणारा एकांत इतर सर्व वेळच्या एकांताहून निराळ्या स्वरूपाचा असतो. कदाचित हेही कारण असेल, की साबणाचा सुगंधी, शुभ्र, गुदगुल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्तऱ्याच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनात येतात, कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी आहे. तिची आराधना करण्यासाठी तिच्यापुढे गुडघे टेकले, की ती रुसून दूर होते. उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली, की ती मागे लागते. इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो. मला काही सुचत नाही. दाढी करायच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच नसतो. मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते. कल्पना सुचतात… पण हे सारे माझे तर्क आहेत! खरं म्हणजे दाढी करण्याच्या वेळेस कल्पना उचंबळून का यावी हे माझं मलाच सांगता येत नाही. माझा एक अनुभव तुम्हांला सांगितला. तो तुम्हांला पटला नाही तर सोडून द्या. मात्र पटावा म्हणून एवढंच सांगतो, की हा छोटासा लेखसुद्धा दाढी करता करताच मला सुचला व मी लेखनिकाला सांगितला.