मी प्रवासात होतो. प्रकृती बरी नव्हती. आगगाडीने निघालाे होतो.
दिवस पावसाळ्याचे होते. सृष्टीचे स्वरूप सुजल, सुफल, सस्यश्यामल असे दिसत होते. नदी-नाल्यांतून आणि भातशेतांतून पाणी तुडुंब भरून वाहत होते. थोडी वर आलेली पिके वाऱ्यावर डुलत होती. सृष्टी जणू आनंदाने नाचत असल्यासारखी दिसत होती; परंतु माझ्याच मनावर मळभ आल्याने मी तिच्याशी समरस होऊ शकत नव्हतो. शरीराच्या अस्वास्थ्यामुळे मनाला एक प्रकारची मरगळ आली होती. यामुळे मला सर्व गोष्टी त्या वेळेपुरत्या तरी निरर्थक, क्षणिक वाटत होत्या. नाचरे ओढे आणि हरिततृणांचे गालिचे, माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते. एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वत:शीच नाराज होऊन बसले होते. निसर्गातील सुंदर दृश्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.
असे सुमारे तासभर चालले, एका मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली. चांगली पंधरा मिनिटे थांबली. माझा डबा जवळ जवळ शेवटचा असल्याने त्यात उतारूंची ये-जा झाली नाही. त्यामुळे स्टेशनवरील एका सुंदर दृश्याकडे माझे मन वेधले गेले. स्टेशनच्या आवारात एक सुंदर बाग होती आणि तिच्यात विविध रंगांची झेनियाची फुले उमलली होती. लाल, पिवळी, केशरी, किरमिजी, पांढरी, जांभळी अशी फुले जागच्या जागी वाऱ्याने डुलत होती. राठ दांड्याच्या व रुक्ष पानांच्या झेनियाला इतकी सुंदर फुले कशी येतात याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. पारिजातकाचेही तसेच नाही का? पारिजातकाचा बुंधा, पाने, डिक्शा ही सर्व एकंदरीत खडबडीत, खरखरीत, रुक्षच; पण पारिजातकाचे फूल? नाजूकपणा, सौंदर्य नि सुगंध यांचा नमुनाच पाहून घ्यावा. तसेच झेनियाचे मानता येईल. तसल्या त्या सुंदर, बहुरंगी व बहुढंगी फुलांवर तितकीच सुंदर, बहुरंगी व बहुढंगी फुलपाखरे उडत होती. मकरंदास्वाद घेत होती. त्या नाचणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिल्यावर फुलपाखरे कोणती अन्फुले कोणती असा भ्रम मला तरी क्षणभर झाला. उडताहेत ती फुले, की डोलताहेत ती फुले, अशी शंका वाटण्याइतके रंगांचे सादृश्य झेनियाच्या फुलांत नि त्या फुलपाखरांत होते. जीवन जर कोठे फुलत असेल, डुलत असेल, नाचत असेल, गात असेल तर ते इथे, असे त्या दृश्याकडे पाहून मला वाटले. जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजीच येथे थुई-थुई उडत होती. तसेच ते अप्रतिम जीवननृत्य पाहून माझ्या मनावरील मळभ नाहीसे झाले, ते आनंदले. तेवढ्यात गाडी सुरू झाल्याने त्या सुंदर दृश्याचा मला नाइलाजाने निरोप घ्यावा लागला; परंतु माझे विचारचक्र गाडीच्या चक्रांबरोबरच सुरू झाले.
त्या फुलांनी आणि फुलपाखरांनी माझ्या मनाला उत्साह आणि स्फूर्ती दिली. फुलांचे नि फुलपाखरांचे आयुष्य ते किती आणि त्या मानाने त्यांनी त्या आयुष्याकरिता दाखवलेली आस्था किती? फुलांचे आयुष्य, अगदी झेनियाचे फूल झाले, तरी काही दिवसांचे. फुलपाखरांचेही तसेच. मनुष्याचे आयुष्य या दृष्टीने पाहिले असता अनेक पटींनी मोठे मानावे लागेल. एवढे मोठे आयुष्य लाभलेल्या मनुष्याने कितीतरी समाधानी व आनंदी असावयास हवे. अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे त्याला काय कारण आहे? अडचणी, रोग, संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणाने, खिलाडू वृत्तीने आपणांस का पाहता येऊ नये?
अडचणी, संकटे, रोग यांचे जेव्हा आपणांवर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपणांस समजत नाही. आपण घाबरलो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालू असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.
मला वाटते आपण फार विचार करून किंवा अविचार करून आपले मूळचे आनंदी स्वरूप, आनंदी जीवन विसरून बसलो आहोत. फुलपाखरांना जर आनंदाने जगता येते तर आपणांस का येऊ नये? त्यांना जर जीवनातील रसास्वाद घेता येतो, तर तो आपणांस का घेता येऊ नये? आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत, असे आपण का वागावे? मला वाटते मनुष्याखेरीज जीवनासंबंधी फाजील विचार दुसरे कोणीही करत नसेल. मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून हेच जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे. ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये.