१४. वाहतूक

        मुलांनो, आपण एक प्रयोग करूया.
तुमच्या घरापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असणारे मित्राचे किंवा मैत्रिणीचे घर, बगिचा, दुकान, शाळा इत्यादींपैकी एक ठिकाण निवडा.
(१) निवडलेल्या ठिकाणापर्यंत पहिल्या दिवशी चालत जा.
(२) दुसऱ्या दिवशी सायकलवर जा.
(३) तिसऱ्या दिवशी स्वयंचलित वाहनाने जा.
हे करत असताना तुमचे शाळेचे दप्तर नेहमी सोबत ठेवा. तीनही प्रवासांसाठी एकच मार्ग वापरा. आता खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंदी करा.
१. तिन्ही दिवशी प्रवासास लागलेला वेळ.
२. कोणत्या प्रवासास सर्वांत जास्त व कोणत्या प्रवासास सर्वात कमी वेळ लागला

३. कोणत्या प्रवासात तुम्हांला स्वतः साहित्य वाहून
न्यावे लागले ?
४. कोणता प्रवास आरामदायी वाटला?
५. कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला ?
६. धूर, आवाज यांचा त्रास कोणत्या प्रवासात जास्त जाणवला ?

        वरील नोंदींद्वारे तुमच्या लक्षात आले असेल, की पायी चालत जाताना जास्त वेळ लागतो व साहित्य वाहून नेण्यासाठी श्रम करावे लागतात. वाहनाचा वापर केल्यामुळे वेळेची व श्रमांची बचत होते.
त्याचबरोबर हेही लक्षात आले असेल, की स्वयंचलित वाहनांसाठी इंधनाचा वापर करावा लागतो. या वाहतूक साधनांमुळे हवेचे व आवाजाचे प्रदूषण होते, म्हणजेच वाहतुकीचे चांगले व वाईट असे दोन्हीही परिणाम आहेत.आजच्या गतिमान युगात प्रवास व साहित्याची ने-आण करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते. वाहतुकीचे अनेक फायदे आहेत.
• कामे जलद गतीने होतात.
• वेळ व श्रमांची बचत होते.
• व्यापारवाढीस चालना मिळते.
• जगातील विविध प्रदेश वाहतुकीच्या सोईमुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत.
• जागतिक स्तरावरदेखील वस्तूंची वाहतूक सहजव सोपी झाली आहे.

• विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे
जीवनमान सुधारले आहे.

• पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत.
विविध प्रकारच्या वाहतुकींच्या सोईंमुळे जग जवळ आले आहे.

• चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची / मुट्ट्यांची उत्तरे वहीत लिहा.
१. चित्रातील मुले कोठे थांबली आहेत ?
२. तिथे ती कशासाठी थांबली असावीत ?
३. चित्रातील मुले काय करत आहेत?
४. त्यांना कशामुळे त्रास होत असावा ?
रस्त्याच्या कडेच्या व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींमधील फरक पुढील मुट्ट्यांच्या आधारे नोंदवा.
(अ) पानाचा तजेलदारपणा.
(आ) पानांचा रंग.
(इ) वनस्पतीचे स्वरूप.

     या निरीक्षणावरून तुमच्या लक्षात आले असेल, की वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची ये-जा सतत चालू असते. इंधनांच्या ज्वलनामुळे वाहनांतून सातत्याने धूर व काही विषारी वायू सोडले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड व सल्फर डायऑक्साइड हे वायू असतात. तसेच धुरावाटे कार्बन, शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात व हवेत मिसळतात. या घटकांचा अतिरेक झाल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते. यालाच आपण हवेचे प्रदूषण म्हणतो.
हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी व वनस्पतींवर पुढील परिणाम होतात.

• श्वासनलिका, डोळे व फुप्फुसांचे विकार होतात. उदा., डोळे जळजळणे.

• झाडांची पाने करपतात व गळतात. कोंब (अंकुर) जळतात. झाडांची वाढ व विकास खुंटतो.

• वनप्रदेशांतून वाहनांची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी व वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोहचते. या प्रदेशातील वन्य जीव स्थलांतरित होऊ लागतात.

• वाहनांच्या सततच्या आवाजाने मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो. त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड होणे, डोके दुखणे, लक्ष न लागणे, मनोविकार इत्यादी परिणाम होतात.वाहतुकीची कोंडी झाल्यास त्या परिसरात हवेचे व आवाजाचे प्रदूषण वाढते.वाहनांच्या अपघातांमुळे जखमी होणे, मृत्यू होणे व वाहनांचे नुकसान होणे हे प्रकार घडतात.