१५. आळाशी

बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो

 भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो…

नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया

 कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया

 भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो

भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो…

 हातापायाला चिखल बाप घामामधी ओला

पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला

बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो

 भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो…

बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो

 मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो

 दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो

 भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो…

 येता भरात जोंधळा बाप काढणी करतो

स्वत: राहून उपाशी पोट जगाचं भरतो

 जातो आळाशी होऊन तरी ‘आळा’ का तुटतो?

 भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो…