१५. खोद आणखी थोडेस

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.
झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!