१५.बालसभा

पाळंदूर शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्गशिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा.

नीता : २८ नोव्हेंबर महात्मा जोतीराव फुले यांची पुण्यतिथी व ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता सहावीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे,

अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते.

तन्वी : यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता पाचवीच्या वर्गातील अन्वर आपले विचार मांडेल.

अन्वर : सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्‍मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले;पणतरीहीतेआपल्या विचारांपासून डगमगलेनाहीत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झालेआहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो. जयहिंद!

तन्वी : धन्यवाद अन्वर! यानंतरइयत्ता सहावीतील निलोफर आपलेविचार मांडेल.

निलोफर : आज मी डॉ. आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉ. बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते; म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचेबारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉ. बाबासाहेब यांचेसर्वांत जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकांत खूप रमायचे. वाचनामुळेच त्यांना मनन, चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्‌धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यांमुळे तेआपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जयहिंद !

तन्वी : धन्यवाद निलोफर! यानंतर मी इयत्ता सातवीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढेबोलवत आहे.

गुरुप्रीत : महात्मा जोतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाचीस्थापना केली. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालये काढली. सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली; वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली, पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मन:पूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो. जयहिंद !

तन्वी : धन्यवाद गुरुप्रीत! आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते, की त्यांनी आपलेविचार मांडावे.

कुणाल : मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचेविचार ऐकले. त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची, विचारांची माहिती मिळाली. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे- देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्यानेघेत जावे. घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचेहात घ्यावे. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्य

परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडूनत्यांना खरेअभिवादन ठरेल. एवढेबोलून मी थांबतो. जयहिंद!

तन्वी : धन्यवाद कुणाल! आता आभार प्रदर्शन चंदर करेल.

चंदर : आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्गशिक्षिका बाईंनी आम्हांला मोलाचेमार्गदर्शन केले, तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशींनी आम्हांलाकामात खूप मदतकेली,म्हणूनच आम्ही ह्या सभागृहाची सजावट,

मंचव्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले, मीनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशनेध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हांला महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगांचे चित्र रेखाटन दिसते आहे. कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिनप्पा यांनी ही प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली, तसेच आपल्या सर्वांचेमी इयत्ता सहावीच्या वतीनेआभार मानतो व कार्यक्रम संपलाअसेअध्यक्षांच्या वतीनेजाहीर करतो.

पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली. ऊर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनीदेखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली. त्यात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले. नाटिका सादर केल्या. त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले.