हॉलीवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो. वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो. कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं, तर त्याला वाटेल, की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे.
मी ज्याचा शोध घेत होताे ते मला डाेंगरमाथ्यावर जवळ जवळ एका तासानं दिसलं. एखादं निकेलचं नाणं उडवावं अन् ते अर्धं मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं. मोठ्या अचूकतेनं बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळावर ते रंगगोपनामुळे दिसत नव्हतं.
मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं. दार उघडलं जाऊ नये, म्हणून कोळिणीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं. मी कोळीण म्हटलं आहे, कारण नर कोळी आकारानं लहान असतात. त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. हे घरटं कोळिणीचं होतं. जमिनीत जवळ जवळ एक फूट खोलीवर, न दिसणारं ते घरटं, त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्यानं घट्ट असं विणलं होतं.
मला आश्चर्यवाटलं, की कोळिणीनं चाकूचं टाेक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढावं. पातं चांगलंच वाकलेलं दिसलं. मी दार सोडून दिलं. अंधार पडल्यावरमला परत यायचं हाेतं. रात्रीच्या वेळी कोळीण ज्या वेळी कार्यरत असते, त्या वेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं. चाकूचं पातं बाजूला काढताक्षणीच दार घट्ट बंद झालं. घाबरलेली कोळीण ते दार आतून ओढत होती. बाटलीचं बूच बसावं तसं दार पक्कं झाकलं गेलं. ते इतकं पक्कं बसलं, की त्याच्यात फटदेखील दिसत नव्हती.
माझी साधनसामग्री घेऊन तिथं सायंकाळी पोहचलो. चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते. चंद्राच्या प्रकाशानं, तसंच शहरातील विजेच्या दिव्यांमुळे राशीचे ढग प्रकाशमान झाले होते. पावसाची लक्षणं दिसत होती. ज्या घरट्याजवळ खूण केली होती, तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधूक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो. झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली.
वसंतऋतूतील तो शेवटचा काळ, परंतु सायंकाळी हवा गार होती. गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडे वाहत हाेतं; परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जगात मी असा काही गुंग झालो होताे, की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला.
मी स्तब्ध बसलो. माझं सारं लक्ष कोळिणीच्या घराच्या बंद दाराकडे हाेतं. कसलीही हालचाल नव्हती. कसलंही चैतन्य नव्हतं. एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो. जरी दार बंद असलं, तरी आतल्या कोळिणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. मला वाटायचं, की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल; परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती.
थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची. पुन: शांत. पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला, त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली. पुन: शांत. त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारठलो.
मला वाटलं, की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो. पुन: ते हाललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिलत्या दाराजवळ कोळीण वाट पाहत होती. मला ते माहीत हाेतं. तिथं गूढ होतं.
त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता. कोळीण दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती. सापळा तयार होता. सावज जवळ येण्याची ती वाट पाहत होती. ते सारं चमत्कारिक होतं. कीटकाच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता. कोळीण दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट ऐकत रात्रभरही राहिली असावी. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोळिणीला वाट पाहावी लागते. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं; पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोळिणीनं आपलं बिळ सोडून दिलं असतं अन् दार तिच्या पाठीमागे लागलं असतं, तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं, म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं, तर ते असं काही घट्ट बसेल, की असहाय होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारध झाली असती. झेप घेऊन कोळिणीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं; परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यूच.
बिळापासून एक हातभर अंतरावर दंवारलेल्या गवतात काहीतरी हललं. पाती बाजूला लवली, तसं राखी पाठ असलेलं पावट्याएवढं सोबग दिसलं. ते वेडंवाकडं जमिनीवरून जात होतं. काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत हाेतं. पुन: मागे वळत होतं, अन् अडखळत कोळिणीच्या सापळ्याजवळ जात हाेतं. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती; परंतु काही साहाय्य करता येत नव्हतं. सावज पुढे पुढेच जात होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. अरेच्या ते वाचलं तर! पण पुन: चुकून मृत्यूच्या दाराकडेच ते जात होतं.
ते सोबग अटळपणे त्या सापळ्याकडेच जात होतं. कोळिणीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं. दार जसं किंचित किलकिलं झालं तशी एक काळी रेषा दिसली. जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबग तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती. क्षणभर कीटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला. त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखला होता. सोबग वेडंवाकडं चालत तिच्यापुढे जात होतं. दार हाललं. थोडं उघडलं गेलं. कोळीण आता अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं. कोळिणीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत हाेते.
निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती. सोबग वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होतं. सोबग माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं. एखाद्या दु:खी आणि विनोदी पात्रासारखं. त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती; परंतु मी तटस्थ राहिलो. साेबग जवळ गेलं. दार किंचित खाली पडलं.
दाराजवळ येणाऱ्या सोबगच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला, तशी कोळीण चुळबुळ करू लागली. कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. कोळिणीला सोबगच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा, तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं! परंतु मला जिकडेतिकडे विलक्षण शांत वाटत होतं. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारींच्या कर्ण्यांचे व आगगाड्यांचे आवाज ऐकू येत होते.
सोबग छिद्रापासून एक इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं. त्यानं माझं लक्ष वेधलं. साेबग एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोळिणीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेनं जात होतं. ते तिथं पोहचलं. छिद्रासमोर आलं. दार हाललं नाही. सावज जवळ आल्याची जाणीव कोळिणीला निश्चितपणे झाली होती. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. सोबगची आता सुटका होईल, असं मला वाटलं. माझ्या अस्तित्वामुळे कोळीण अस्वस्थ झाली असावी. कदाचित नकळत मी सोबगचा जीव वाचवला असेल. मला थोडंसं बरं वाटलं. काळ्या फटीत काहीही हालचाल नव्हती. कोणत्याही जिवाचा मागमूस नव्हता. धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबग गेलं होतं. काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं. इतक्यात काळी राक्षसीण जमिनीतून वर आली. दार सताड उघडलं गेलं. केसाळ हात एखाद्या दांडक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं अन् लगेच दृष्टिआड झाली. परत जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जगात गेली. एका क्षणात कोळीण दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली. पार जमिनीच्या पडद्याआड. तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. मला इथे बसल्या बसल्या ताे आवाज ऐकू आला होता.
मला या घटनेची अपेक्षा होती; परंतु कोळिणीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. हे सारंपाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. गवताळ डोंगरावरच्या त्या वीतभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं.
गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. नंतर कोळिणीची घरटी असलेल्या जमिनीची एक डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोत टाकला. अंधाराचा पडदा सोडून कोळिणीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्मनं चित्रण करता आलं नसतं.
अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्ती- व्यक्तीनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झालो. बुद्िधशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळिणीच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. डझनभर कोळिणींपैकी कित्येकींनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं. त्यांनी अक्षरश: स्वत:ला कोंडून घेतलं. आपली दारं आतून जाळी विणून बंद केली. ही ताटी त्यांनी पुन्हा कधीही उघडली नाही. जणूकाही त्यांनी समाधीच घेतली.
काहीजणी जगण्याइतपत क्वचितच खात. सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेऱ्यानं कधीच करता आलं नाही. एका कोळिणीनं आपल्या घरट्याचा त्याग केला. कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी. चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं. नंतर काही आठवड्यांनी नि:सत्त्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली. फिल्मच्या दोन डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतूनं आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला होता.
त्या डझनभर कोळिणींपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणं स्वत:ला जमवून घेतलं. माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली. मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावताच मोठ्या चमत्कारिकरीत्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी. प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी.
सोबगला ती अगदी सहज पकडे. माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी. फाशाच्या दारावरच्या कोळिणीशी एका काळ्या कोळिणीनं अजिबात संघर्ष केला नाही. सोबग जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती नाहीशी होई. पहिल्यांदा ज्या वेळी काळ्या कोळिणीला तिनं छिद्रात खेचलं, तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं वाटलं. माझी थोडीफार अपेक्षा होती, की दार ढकलून धुळीचे हात झाडत, माझ्या तारकेला झोडपून ती बाहेर येईल; परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुरकुतलेलं काळं कलेवरच मला पाहायला मिळालं. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं.
मला हवं होतं की माझ्या कोळीण तारकेला सावज सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेऱ्यानं तिची चांगली दृश्यं टिपायची होती. ज्या वेळी सावज पकडायचं त्याच वेळी ती जमिनीवर येई, तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळे. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होई.
कोळिणीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली, तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं वाटलं; परंतु कोळीण अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाई; परंतु दार उघडले जात नसे. माझा तर्क असा, की मोठा कीटक जोरानं आवाज करत असावा. कोळिणीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता. तिला हवं होतं रोजचं खाणं. बागेतील दगडाखाली कोळिणीचं भक्ष्य शोधताना मला एकदा लहान शतपाद मिळाला. सोबगचा जसा ती निकाल लावत असे, त्याप्रमाणे शतपादाची विल्हेवाटतिनं लावली. मी शतपाद मिळवण्याचा शोध सुरू केला. मी आठ पाय असलेले कीटक जमा केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यांमधून सर्व आकाराचे शतपाद भरून ठेवले. जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करायला हवी. कॅमेऱ्यानं क्षणैक दृश्यंटिपत होतो, तसंच बागेत दगडांची उलथापालथ करण्यात अनेक तास जात.
वालनट जसे लहान, मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात, तसे मी शतपाद लावले. त्यात अति- लहान, मध्यम लहान, लहान, मध्यम मोठे-लहान, लहान-मध्यम अशी प्रतवारी तयार केली. मी रोज कोळिणीला शतपाद खाऊ घालायचा. गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपाद प्रत्येक आठवड्यात द्यायचा. माझ्या कोळिणीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्यानं पढवत होतो. प्रत्येक आठवड्यात ती मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी. असं करत लोभ आणि अधीरतेनं तिनं भल्यामोठ्या शतपादावर झडप मारली. शतपादाला शंभर पाय असले तरी त्यांतील पन्नास जमिनीला खिळून राहायचे. राहिलेले पन्नास पाय धडपडत आणि वळवळत स्वत:चं संरक्षण करण्याकरिता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत. कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेऱ्यानं टिपत असे. एकदा तर शतपादानं लढाई जिंकली होती. दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता. असा समय आला होता, की त्यानं माझ्या कोळिणीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं. दार किंचित उघडं होतं. त्यातून तिचे पाय दिसायचे.
त्याच्याशी झटापट करत असता ती कलंडली अन् आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं. कुठेतरी ढिलाई झाली. शतपाद तिच्याभोवती वेटोळं घालण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणांतच त्याचे शंभर पाय हवेत वळवळत होते. त्या क्षणी संधी साधून कोळिणीनं शतपादाला विळखा घातला अन् त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली. काळं छिद्र झाकलं गेलं, अन् मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला.