१६. वनवासी (भाग – ४)

आम्ही डोंगरराजाची
पोऱ्हं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची.
घेऊ हातावं भाकर
वर भाजीला भोकर
खाऊ खडकावं बसून
देऊ खुशीत ढेकर.
खेळू टेकडी भवती
पळू वाऱ्याच्या संगती
वर पांघरू आभाळ
लोळू पृथ्वीवरती.
आम्ही वाघाच्या लवणाचे
आम्ही वांदार नळीचे
गाव वहाळापल्याड
आम्ही उंबर माळीचे.

 

बसू सूर्याचं रुसून

पहू चंद्राकं हसून
बोलू वाज तिंकिड्याशी
नाचू घोंगडी नेसून.
डोई आभाळ पेलीत
चालू शिंव्हाच्या चालीत
हिंडू झाडा-कड्यांवरी
बोलू पक्ष्यांच्या बोलीत.
आम्ही सस्याच्या वेगानं
जाऊ डोंगर यंगून
हात लाऊन गंगना
येऊ चांदण्या घेऊन.