१६. विश्वाचे अंतरंग

सर्वसाधारणपणे निरभ्र व काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा तुम्हाला दिसेल. हीच आपली आकाशगंगा होय. तिला ‘मंदाकिनी’ नावाने ओळखले जाते.

असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला ‘स्थानिक दीर्घिका समूह’ म्हणतात. विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत.

आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायुचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका ‘देवयानी’ या नावाने ओळखली जाते.

असंख्य दीर्घिका, त्यांमधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वात होतो.

एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले. नासा या अमेरिकन संस्थेने १९९० मध्ये ‘हबल’ ही दुर्बिण पृथ्वीच्या कक्षेत सोडली. ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाशचित्रे घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले आहे.

तारे

रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणारे हजारो तारे आपल्या आकाशगंगेचेच घटक आहेत. आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यापैकी काही तारे तेजस्वी असतात, तर काही तारे अंधूक असतात. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगांचे तारे आकाशात पाहायला मिळतात. तसेच स्वतःचे तेज बदलणारे तारेही आकाशात आहेत. प्रामुख्याने धूलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे. सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ३५००°C ते ५०००० °C या मर्यादेत असते. तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंगही बदलतो.

 ताऱ्यांचे काही प्रकार

सूर्यसदृश तारे : या ताऱ्यांचा आकार सूर्यापेक्षा थोडा कमी-अधिक असू शकतो. प्रामुख्याने त्यांच्या तापमानात बराच फरक असतो. हे तारे तांबूस, निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ, मित्र, व्याध इत्यादी तारे.

तांबडे राक्षसी तारे : यांचे तापमान ३००० ते ४०००”C या मर्यादित असते, परंतु त्यांची तेजस्विता सूर्याच्या १०० पट असू शकते. या ताऱ्यांचा व्यास सूर्याच्या १० ते १०० पट या दरम्यान व रंग तांबडा असतो.

महाराक्षसी तारे : हे तांबड्या राक्षसी ताऱ्यांपेक्षाही मोठे व तेजस्वी असतात. तापमान ३०००°C ते ४००० °C या मर्यादितच असते, परंतु त्यांचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट जास्त असतो.

जोड तारे : आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोडतारे आहेत. याचा अर्थ दोन तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात. काही वेळा तीन किंवा चार तारेही परस्परांभोवती भ्रमण करताना आढळतात.

रूपविकारी तारे : या ताऱ्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही. त्यांचे सतत आकुंचन-प्रसरण होत असते. तारा प्रसरण पावला, की तो कमी ऊर्जा उत्सर्जित करतो. तेव्हा ताऱ्याचे तेज कमी होते. याउलट ताऱ्याचे आकुंचन झाले, की त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो. त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसतो. उदाहरणार्थ, ध्रुव तारा.

 सांगा पाहू !

१. सूर्यमालेतील विविध घटक कोणते ?

२. तारे व ग्रह यांमध्ये काय फरक आहे ? ३. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत ?

४. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान काय आहे?

सूर्यमाला

सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतु, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात.

सूर्य

सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ६००० °C इतके आहे. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे, की त्यामध्ये पृथ्वीएवढे १३ लाख ग्रह सहज सामावू शकतील. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्याभोवती फिरतात. सूर्याचा व्यास साधारणतः १३,९२,००० किमी. एवढा आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवतीसुद्धा सूर्यमालेसह फिरतो.

बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत, तर गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत. बहिर्ग्रहांभोवती कडी आहेत. सर्व अंतर्ग्रहांचे कवच कठीण असते, तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते.

 धूमकेतु

धूमकेतु म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अशनी गोल होय. धूमकेतु हे धूळ व बर्फ यांपासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे. धूमकेतुने पृथ्वीजवळ येणे ही घटना फार पूर्वीपासून अशुभ मानली जात होती. सूर्यापासून दूर असताना ते बिंदूप्रमाणे दिसतात, मात्र सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे व कमी अंतरामुळे ते डोळ्यांना सहज दिसू शकतात…

धूमकेतु गोठलेल्या द्रव्यांनी व धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतुतील द्रव्याचे वायूंत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतु लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतु सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात.

 धूमकेतुंचे वर्गीकरण दोन मुख्य प्रकारांमध्ये करण्यात येते.

दीर्घ मुदतीचे धूमकेतु : या धूमकेतुंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

अल्प मुदतीचे धूमकेतु : या धूमकेतुंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा कमी कालावधी लागतो.

 माहीत आहे का तुम्हांला ?

हॅलेच्या धूमकेतुचे १९१०, १९८६ साली | पुनरागमन झाले होते. हॅलेच्या धूमकेतुचा केंद्रभाग १६ किमी लांब व ७.५ किमी रुंद आढळून आला होता. हॅलेच्या धूमकेतुला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ७६ वर्षे लागतात.

असे होऊन गेले.

फ्रेड व्हिपल या खगोल निरीक्षकाने धूमकेतुची रचना विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली असावी, असे प्रतिपादन केले. १९५० पर्यंत त्यांनी ६ धूमकेतु शोधून काढले होते. या माहितीवर आधारित धूमकेतुचे ‘डर्टी ‘स्नोबॉल’ असे नामकरण झाले.

 उल्का

आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला उल्कापात म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना उल्का म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अशनी असेही म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अशनी आघाताने तयार झाले आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अशनीपात होतात.