१६.सफर मेट्रोची

मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली. मेट्रो खरोखरच अजब आहे. प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने, टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे-बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डबे, झूम वेगात धावणारी ही गाडी. पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो. बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो. या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्‍न मनात आले.

रुपाली चव्हाण ह्यांच्याशी साधलेला हा संवाद. त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत.

प्रश्‍न ः मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले. कोणता अभ्यास केला?

रुपाली ः मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी. सिंधुदुर्गशिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले. मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते. ही चाचणी खूप अवघड असते.

प्रश्‍न ः फक्त परीक्षा पास झालात की तुम्हांला पायलट म्हणून मान्यता मिळते का?

रुपाली ः नाही, नाही. यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते. या सर्व चाचण्यांत पास झालात, की मग मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमध्येनिवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता.

प्रश्‍न ः रुपालीताई, पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हांला कसं वाटलं?

रुपाली ः मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मनात थोडी धाकधूक होती, की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही? एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली. बिनधास्तपणे, न घाबरता, आत्मविश्‍वासाने मी मेट्रो चालवली. आता तर मी रोजच मेट्रो चालवत असल्याने सवय झाली आहे.

प्रश्‍न ः मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता?

रुपाली ः रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे; पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती. या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही मला.

प्रश्‍न ः पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली?

रुपाली ः मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली.

प्रश्‍न ः मेट्रो कोणत्या इंधनावर चालते?

रुपाली ः मेट्रो विजेवर चालते.

प्रश्‍न ः एका मेट्रोत किती पायलट असतात?

रुपाली ः एका मेट्रोत एकच पायलट असतो.

 प्रश्‍न ः मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते का?

रुपाली ः लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूंस इंजिन असते. मेट्रो ट्रेन फक्त चार डब्यांची

असते. मेट्रोला स्वतःची कारशेडही असते. घाटकोपरहून वर्सोव्याला मेट्रो पोहाेचली, की ती कारशेडमध्ये जाते. तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो, मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो.

प्रश्‍न ः मेट्रोत एका वेळी साधारणतः किती प्रवासी प्रवास करू शकतात?

रुपाली ः मेट्रोत एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात.

प्रश्‍न ः मेट्रोचे वेगळेपण काय ?

रुपाली ः मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलने बनवलेले असतात. विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात. डब्यात व स्टेशनवर सी.सी. टीव्ही कॅमेरे लावलेले असतात. मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात. मात्र ते आपोआप बंद होत नाहीत, तर ते पायलटला बंद करावे लागतात. पायलटसाठी बंद केबिन असते. केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्णयंत्रणा बसवलेली असते. मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करायचं याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं.

प्रश्‍न ः मेट्रो दिवसरात्र धावते का?

रुपाली ः सकाळी ५.२० वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते.

 प्रश्‍न ः टोकन म्हणजे काय?

रुपाली ः मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते. टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट, तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. त

संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात. मेट्रोने प्रवास करतेवेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते. हे टोकन टाकल्यावर किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच ेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते. म्हणजे कुणी विना तिकीट प्रवास करूच शकत नाही. थोडक्यात आधुनिक सोईंनी परिपूर्णअशी ही मेट्रो आहे.

मेट्रोच्या या सोईमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत. प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो, असे रुपाली आवर्जून सांगते. मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे, हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते.