१७. अन्नजाल

कडीस जोडोनि दुज्या कडीला

 मनुष्य बनवीतसे साखळीला

 जरी तोडिले त्यात मधल्या कडीला

 तरी भंगुनी जाइ संपूर्ण माला! ।।१।।

पाहा कसे कोळि विणतात जाळे

 धाग्यास एका बहू जोडलेले

 बहुतांस त्या जोडलेलेकित्येक

 बिघडते न जरिही तुटले अनेक ।।२।।

 एकीस खायी दुजी प्राणिजात

 दुजीस तीजी अशी साखळीत

 जर का दुजी जात मेली समस्त

 उभी साखळी होउनी जाय नष्ट! ।।३।।

 निसर्गनारायणें देखिले हे

 अन् वीणिले अन्नजालासि पाहे!

 जरी प्राणिजाती किती लोपल्या रे

 तरिही टिकोनी महाजाल राहे! ।।४।।

तगले असे की महाजाल रेते

 तरीहि जाणा ते क्षीण होते!

 मारीत जाता बहू प्राणिजाती

 तुटोनि संपेल ते जाल पुढती! ।।५।।