१७. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ (भाग – ४)

ऑलिंपिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्तेहोते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले, तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भलामोठा ध्वज फडफडत असलेला आम्हांला दिसला. ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू पाच मित्रच हातांत हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते! ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे- ‘सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस.’ म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रांतील सुमारे पाच ते सहाहजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री-खेळाडूंचीही संख्या दोन हजारांच्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे पंचवीस हजार लोकांनाहे सामने उभे राहून पाहता येतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी चार-पाच तलावही बांधलेले असतात.

खेळांचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपाहारगृहे-असे हे एक मोठे गावच असते! याला ‘ऑलिंपिक व्हिलेज’ असे म्हणतात. ‘ऑलिंपिक व्हिलेज’ वसवण्याची कल्पना इ. स. १९५६ मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. पहिले ‘ऑलिंपिक व्हिलेज’ तिथलेच. ऑलिंपिक . सामने दर चार वर्षांनी होतात. हे सामने पाच दिवस चालत. इ. स. पूर्व ७७६ मध्येहे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्या वेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा, ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून, गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यांतील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इ. स. पूर्व ३९४ मध्ये हे सामने बंद पडले.

मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिंपिक सामन्यांची त्यानंतर इ. स. १८९४ साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीरसंपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिंपिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले. १८९६ पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात.

या सामन्यांत निरनिराळ्या एकवीस खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिंपिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात.

क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू. १९३६ मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्याने चार अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे, तर त्या चारही बाबतींत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे, तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्या वेळी केवढा गौरव केला! केवढे कौतुक केले! ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्वविसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली.

एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू. १९५२ साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने ५,००० मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच; पण त्याबरोबर झेकोस्लोव्हाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला.

आफ्रिकेतील इथियोपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन-लांब पल्ल्याची शर्यत जिंकली! एवढे मोठे अंतर त्याने २ तास १५ मिनिटांत काटले. फॅनी बँकर्स या स्त्री- खेळाडूने तर १९४८ साली ऑलिंपिकचे मैदान दणाणून सोडले. १०० व २०० मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात, तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात; तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते.