बरेच दिवसांत कोणाची खुशाली कळली नसली, की ‘बोटभर चिठ्ठीसुद्धा का नाही पाठवली!’ असे म्हणतात. आमच्या वाड्यातल्या एक बाई, ‘भावजयीनं ‘मला बोटभर चिंधीसुद्धा नाही दिली हो’, अशी तक्रार करायच्या. आता दहा हात साडीही नीट न पुरणाऱ्या बाई, बोटभर चिंधीचं काय करणार होत्या? असं आम्हांला वाटे.
सांगायचा मथितार्थ असा, की ‘बोटभर’ हा शब् अगदी छोटंसं, क्षुल्लक अशा अर्थी वापरला जातो; पण माझ्या ‘बोटभर’ दुखण्यानं मला कसं हैराण केलं, त्याची ही ‘हातभर’ कहाणी आहे.
कुठलातरी कडक गूळ बत्त्यानं ठेचताना (आणि त्याबरोबर इकडच्या-तिकडच्या गप्पा करताना) एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वर्मी बसला. तो घाव ‘वर्मी’ बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं; पण ‘तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं?’ म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. नंतर बोटावर तीन महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यांमुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली.
सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली, ‘मलम मलिए, काम पे चलिए’. मी बोटावर मलम लावले; पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार, त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताठलं. आता या बेट्या बोटाचा ‘ताठा’ कमी करावा, म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. अहो, म्हणजे गरम पाण्यानं शेकून पाहिलंहोतं! पण छे! मोडेन पण वाकणार नाही, असा मराठी बाणा दाखवला त्यानं! शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलं. अन्हेऽऽ टम्म झालं बोट! त्याही स्थितीत जरा मस्का मारून पाहावा म्हणून तेलमालीश केलं; पण ‘वो टस से मस नहीं हुआ ।’
शेवटी ‘हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड’ असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. ‘तपासल्याशिवाय कसं कळेल?’ त्यांनी प्रश्न केला. मग दवाखाना गाठला. तिथे ही ऽऽ गर्दी. कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात (म्हणजे स्वत:चे हात स्वत:च्या गळ्यात) असल्या अलौकिक अवस्थेतले एकेक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. इथून पळ काढावा असं वाटत होतं. आमच्या त्या ‘बाणेदार’ बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. हाडबिड तुटलं नसेल ना? अशी भीती वाटत होतीच.
मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी. क्ष किरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं, ‘काही नाही. घाबरू नका. प्लास्टरसुद्धा नकोय. नुसतं स्ट्रॅपिंग करायचंय.’ डॉक्टरांच्या मिठ्ठास, बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं. मनावरचा ताण उतरला; पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय आजूबाजूची दोन बोटंही ताणून बांधून, वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं आणि पर्सहलकी झाल्यामुळे जड अंत:करणानं घरी परतले. आता शब्दश: हात बांधलेल्या अवस्थेत. त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले. आपण उगाच ‘डावउजवं’ काही मानायला नको, असा सुज्ञ विचार करून डाव्याहातानं कामं सुरू केली; पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावाच निघाला. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. दिवसभरात पाच-सहा प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं? अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे; पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून (कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं) गोळ्या गिळंकृत केल्या.
बोटं नुसती घट्ट गुंडाळली होती, तरी ‘रॅपिंग’ असा सोपा शब्द सोडून ‘स्ट्रॅपिंग’ असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं नाहीच. आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. ‘बच्चों का खेल’, असं वाटून मी दुर्लक्ष केलं, तर पुढच्या भेटीत बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं. मग काय? चेंडू वळणं, कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम सुरू. रजा संपून कामावर गेले; पण बोटामुळं कामाचा बट्ट्याबोळच!
हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरंहोऊ लागलं; पण अजूनही मी (कोणाच्याही नावानं) बोटं मोडू शकत नाही. राग आला तरी त्वेषानं घट्ट मूठ वळवू शकत नाही. बोट आपला हात दाखवत राहतंच. आपल्याकडे ‘प्रभाते करदर्शनम्’ करण्याची प्रथा का पडली असावी, हे समजून चुकलं आहे आणि आता बोटांचं महत्त्वही समजलं आहे.