झुळझुळत्या वाऱ्यानं मुळा-मुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. उन्हं डोक्यावर स्थिर झालेली. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत, झुलत राहणारं. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. ही नौका मी संगमावर आणलेली. नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली.
मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. सहा-सात वर्षांचं वय त्याचं. शिडाचा दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. बसताना उत्साह होता; पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर दिला, की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. शेवटी न राहवून रागवून त्याला ‘भित्रट’ म्हणत मी नाव काठाकडं वळवली.
त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, ‘‘खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात. काही हरकत नाही. मी भितो आहे तो या घाण पाण्यात पडायला.’’
मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं, की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायलं जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही?
आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती. एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलं होतं.
आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही; पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल, तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. या जाणिवेनं खांद्यावर भार पडला.
नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्याही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचंच काम हाती घ्यायचं ठरवलं; पण एवढं मोठं कार्य! कशी सुरुवात करावी?
नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्य भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत अनुभवांवरून सूचना करू लागला. मग काही दिवसांत लक्षात आलं, की आमच्या चर्चाच जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. तात्काळ चापट बसून जाग आली. आता मात्र स्वत: जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. तो काढावा असं ठरवलं.
मनात ‘काहीतरी केलं पाहिजे’ या उत्साहाचं वादळ होतं; पण प्रत्यक्ष एक पानही हलत नव्हतं.
काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले, ‘‘हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हातांनी काम करवून घेण्याऐवजी स्वत:चेच हात वापर की कचरा काढायला.’’ मग मी उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लॅस्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून आठदहा दिवस हललं नव्हतं ते आठ-दहा मिनिटांत पार पडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं.
नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैलापाणी, रसायनं, तरंगत-बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत. ‘वापरा आणि फेका’ या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर दिसत होतं या नदीपात्रात. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती.
दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. दिवसभर उन्हात राबून, वल्हवून, वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते; पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले.
मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यांसमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचराविरहित पात्र; पण काठावर येऊन बघतोय तर नदीपात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता. कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला.
रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला, ‘वाडी, गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. ते पाणी झाडांसाठी खतपाणी झालं असतं. झाडीही फोफावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिश: व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं!’
दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. काही वेळेसच यश मिळायचं; पण नदीच स्वच्छ रूप हे ध्येय आहे, हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यांतून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचे ठरले. नदीमार्गेप्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली.
नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणांवरून पुढे आला. ‘नदीतून पंढरपूर’ प्रवाशांचं एक कुटुंब तयार होऊ लागलं. जवळ जवळ सगळी तयारी झाली; पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं.
‘‘पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखीसोहळा होतो. बरोबर दिंड्या चालू लागतात. आपलीही दिंडीच. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार मग नाव ठेवूया जलदिंडी’’. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं, ‘‘सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी, सर्वांची दिंडी.’’ ही जलदिंडी तपाहून अधिक काळ सुरू आहे.