१८. निर्णय

न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हांला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. ‘हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, ‘‘राजाभाऊ, उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे?’’ सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त पाच मिनिटं.. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही; पण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. अामच्या रोबो वेटरबाबत खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हांला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो.’’

एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. मी आणि माझा बालमित्र सोमनाथ ऊर्फ सोमा दोघे मिळून गेली चार वर्षे हॉटेल चालवतो आहोत. शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे ‘हॉटेल हेरिटेज’ चांगले प्रशस्त आहे. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो; पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले; पण त्यांच्या कटकटी कायम होत्या. कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे, भांडणं करणे अशा तक्रारींमुळे आम्ही हैराण झालो होतो. ‘वाळवंटातील हिरवळ’ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून आहे. मन्यामध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्याला टिकवून धरलं आहे.

वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी आम्ही चार रोबो वेटर खरेदी केले. मी आणि मनोजने त्यांना रामू, शामू, दिपू व विजू अशा हाका मारण्यास सुरुवात केली. आमचे दिवस बघता बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत चारही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. सकाळी सहा वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्वीच सुरू केला, की ते ‘गुड मॉर्निंग, सर’ म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर दोन महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वत: हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्र व तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हांला दोन-तीन महिन्यांत जाणवू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली.

दुसरं वर्ष सुरू झालं. कंपनीने आम्हांला सांगितलं, ‘‘यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला अडीच ऐवजी पाच हजार रुपये पडतील.’’ सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हांला परवडण्यासारखी नव्हती. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही, असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं. एवढंच नव्हे, तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वत: केलं. विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं. त्यामुळे आपण वीस हजार रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता; पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही.

त्या दिवशी दुपारी एकची वेळ होती. लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काऊंटरवर बसवून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. शामूकडं बोट दाखवून दोघं-तिघं तावातावाने म्हणाले, ‘‘काय मालक? हे कासव कोठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा.’’ त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण शामूकडे बोट दाखवून म्हणाला, ‘‘पंधरा मिनिटाअगुदर बेणं माजलेल्या वळूगत हुंदडत हुतं, मला जेवणाचं ताट दिलं आन त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा.’’ त्यांचं बोलणं संपलं, की कोपऱ्यातील टेबलला बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडं बोट करून म्हणाली, ‘‘माझ्या तान्ह्या पोराला भूक लागली म्हणून त्याला एक कप दूध आणायला सांगितल हुतं…एक घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय…पोरगं झोपलंय…म्हणून बरं…नाहीतर एवढ्या येळात माझं पोरगं तीन वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलं असतं…’’ परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं, म्हणून त्याच्या पोटावरील ‘एनर्जी’ अशी अक्षरे असलेले बटण चार[1]पाच वेळेला दाबले…काय आश्चर्य! शामू पूर्वीसारखा काम करू लागला, हे पाहून माझा आनंद गगनात मावेना. लंच सेक्शनमध्ये शामू मनोजसोबत ठेवून मी काऊंटरला येऊन बसलो.

शामूला दुरुस्त केल्याचा माझा आनंद फार काळ टिकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला. ‘‘मालक…लवकर चला तिकडं… सगळ्यांनी गोंधळ घातलाय.’’ मी जाऊन पाहिलं, तर शामू भराभर ताटं उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित, अनाकलनीय प्रकारामुळे गिऱ्हाईक एकमेकांकडे तर कधी शामूकडे अचंबित… नजरेने पाहत आहेत असे दिसले.

असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलावून घेतलं. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरनी विनातक्रार तुमची सर्व कामे पंधरा-पंधरा तास अखंडपणे केली आहेत. एका वर्षानंतर केवळ पैशांचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतरच फजितीचे प्रसंग घडले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबो वेटर निकामी झाले आहेत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते एक महिना चालतील. नंतर मात्र तुम्हांला नवे वेटर घ्यावे लागतील. नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे. रिमोट कंट्रोल सिस्टिममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हांला काडीचाही त्रास होणार नाही, याची खात्री मी देतो. तुमचा निर्णय लवकर कळवा कारण रोबो वेटरची मागणी खूप वाढली आहे.’’

सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली. रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता; परंतु मी द्‌विधा मन:स्थितीत होतो. इंजिनियरचं बोलणं आठवलं, की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली, की रोबो वेटर नकोसे वाटायचे. अजून एक महिन्याचा अवधी हाताशी होता त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं.

आता सर्व सुरळीत चाललं होतं; परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हांला जाणवत होता. कारण हॉटेलमध्ये गिऱ्हाईक जेमतेम येत होतं. शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होती. साधारण पस्तिशीची एक स्त्री दोन मुलांसह कारमधून उतरून एसी रूममध्ये गेली. एसी रूमकडे रोबो रामूची ड्युटी होती. तो तत्परतेने आत गेला. एसी सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. पाच-दहा मिनिटांनी एसी रूममधून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला. काही वेळाने एकाऐवजी दोन रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले तेव्हा मी रामूला एसी रूममध्ये पाहून येण्यास सांगितले. सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहेत असं सांगून तो किचनमध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला एसी रूममध्ये पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हांला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम सुटला होता, तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितले. आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. एक-दीड तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हरवर तेथील जबाबदारी सोपवून मी हॉटेलकडे परतलो.

मी त्या बाईंची भेट घेतली. नंतर डॉक्टरांना भेटलो, त्या वेळी डॉक्टर म्हणाले, त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. आता त्यांना कसलाही धोका नाही. त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे.’’

रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला. दुपारी एसी रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असती, की आम्हांला हॉटेल बंद करावं लागलं असतं; पण आमचं दैव बलवत्तर, बाईंचा जीव वाचला.

रोबो वेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होत होती, ती म्हणजे रोबो-वेटरमुळं आम्हांला पैसा मिळाला; पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाट्याला आली होती. मनोजच्या एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला. दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला; पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून. मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हेच खरं. नवीन रोबो वेटर खरेदी करावे की करू नयेत याबद्दल बरेच दिवस मी द्‌विधा मन:स्थितीत होतो; परंतु आता माझी द्‌विधा मन:स्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपी गेलो, हे मलाही समजलं नाही.