जंगलतोड
जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे सहाशे कोटींच्या घरात आहे. या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नांत माणूस नवनवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे. वापरत आहे. यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोत वापरत आहे.
शेती, वसाहती, उदयोगधंदे, तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड होते.
काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशांत किंवा खोलगट भूभागांत भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाते.
पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात. जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात. झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी असतात. अस्वल, हरीण, माकड, हत्ती, वाघ यांसारखे प्राणी जंगलामध्ये राहतात. म्हणजे घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो. जंगलातच त्यांच्या गरजांची पूर्तताही होते. जंगले कमी झाली, की तेथील जैवविविधतेचा -हास होतो.
प्रदूषण
सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करताच ते जलस्रोतांत सोडले तर जलस्रोतांचे प्रदूषण कसे होते हे तुम्ही पाहिले आहे.
कारखान्यांतूनही परिसरात सांडपाणी सोडले जाते. असे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले, तर ती जमीन नापीक होते.
शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात. ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नदयांमध्ये पोचतात.
अशा अनेक कारणांनी पाण्याचे व मातीचे प्रदूषण घडत राहते. यांमुळे तेथील प्राणी आणि वनस्पतींना धोका पोहोचतो. अशा सजीवांची संख्या कमी कमी होऊ लागते आणि सरतेशेवटी तेथील अनेक सजीव नामशेष होतात.
इंधनाचा घरगुती वापर होतोच. याशिवाय माणसाने मोठमोठे उदयोगधंदे आणि कारखाने उभे केले आहेत. या कारणांमुळेही इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.
एकीकडे इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइड प्रचंड प्रमाणावर हवेत मिसळतो तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलांचा -हास होत आहे. यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहेत. परिणामी हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सतत वाढत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले की तापमानही वाढते. अशी तापमान वाढ जगाच्या सर्व भागांत दिसून येते.
याशिवाय इंधनांच्या ज्वलनातून काही विषारी वायू तसेच मोठ्या प्रमाणावर धूरही निर्माण होतो. त्याचबरोबर उदयोगधंदयांतूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात. यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.
पर्यावरण संतुलन राखण्याची गरज
मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला, तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात म्हणजेच नामशेष होत असतात. सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे. त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका आहे.
आपल्या गरजा आणि पर्यावरण
अन्न, पाणी, वस्त्र या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत. त्यांची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो. याशिवाय अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासाठीही आपण अनेक साधनांचा वापर करतो. आपल्याला लागतील तेव्हा त्या उपलब्ध असाव्यात म्हणून त्यांपैकी अनेक गोष्टी आपण घरात साठवूनही ठेवतो. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात. जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने हास होत आहे.
मानव हा निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचा समतोल बिघडला, तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे, याची जाणीव आपण ठेवायला हवी.
पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे, याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा.
आपण सर्व निर्धार करूया !
आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी व जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया.
पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्यांविषयी
जाणीवजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही, यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत.
जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न
जैवविविधता उद्याने जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला ‘जैवविविधता उद्यान’ म्हणतात. यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो. जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता येतो. त्यामुळे निसर्गाविषयी आस्था वाढीस लागते.
राष्ट्रीय उद्याने : वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. उदाहरणार्थ, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान.
अभयारण्ये : विशिष्ट प्राण्यांचे, वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यांसाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. अशा राखीव क्षेत्राला ‘अभयारण्य’ म्हणतात. उदाहरणार्थ, राधानगरी अभयारण्य.
पृथ्वीतलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते. म्हणून जंगलातील वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन करणे जरुरीचे आहे. जंगलतोड थांबवून, वृक्षारोपण करून वनस्पतींचे रक्षण केल्यास त्यांवर अवलंबून असणाऱ्या वन्यजीवांचेही रक्षण होईल.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झाला आहे. उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. तिथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिले मोठी झाल्यावर ते पिलांसह परत जातात.
अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले होते, परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यावर ते पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. हे मोठे, वजनदार पक्षी त्यांच्या डौलदार चालीबद्दल प्रसिद्ध आहेत.
गवताळ प्रदेशातील माळरानावर अधिवास असणारे हे पक्षी कीटक खातात. मांसासाठी व अंड्यांसाठी त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे. महाराष्ट्र शासनाने नान्नजचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केले आहे. याच माळरानात हरणेदेखील आढळतात.
पुणे – अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेले मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे २५०० मोर आहेत. येथे पूर्वापार लावलेली चिंचेची झाडे असून झाडांची निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे. या गावात मोरांना अभय मिळाले आहे.
देवराई एक वरदान! –
भारतीय संस्कृतीमध्ये वनसंरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे याचे एक उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल, अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते. या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही. त्यामुळेच देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहेत.
महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत. मध्यप्रदेशात आढळणाऱ्या देवराया ‘शरणवने’ म्हणून ओळखल्या जातात. देवरायांमध्ये वनस्पतींनाच नव्हे, तर प्राण्यांनाही अभय मिळते. या देवराया प्राचीन काळातील अभयारण्येच म्हणावी लागतील.