१८.बहुमोल जीवन

मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?
फुले निखळुनी पडती, तरिही झाड सारखे झडते का?

भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला
गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला
काटे देते म्हणुनी लतिका मातीवरती चिडते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?

वसंत येतो, निघुनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला
पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला
देह जळाला म्हणुनी धरणी एकसारखी रडते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?

रोज नभाचे रंग बदलती, घन दाटुनि येतात तरी
निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी
अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?

सुखदुःखाची ऊनसावली येते, जाते, राग नको
संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको
बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?