१८. हसरे दु:ख (भाग – ४)

रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रेक्षागृह एकदम शांत झालं. वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. प्रेक्षागृहातली कुजबूज एकदम थांबली.

रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्ले एकतानतेनं गात उभी असलेली दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली आणि वाद्यवृंदाशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले तेव्हा सारे श्रोतेजिवाचा कान करून ऐकू लागले. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून गेलं.

लिली हार्लेचा पाच वर्षांचा धाकटा मुलगा चार्ली विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती. तिच्याकडे मोठ्या प्रेमानं बघत तो निश्चल उभा होता.

लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं. तिच्या गोड गळ्यातून तारसप्तकातले स्वर सहजतेनं बाहेर पडायला लागले. तिच्या कंठमाधुर्यानं श्रोते डोलू लागले. फुलून गेले. लिली हार्लेचा तारसप्तकातला तो मधुर स्वरविलास चालला असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला. काही केल्या कंठातून आवाज फुटेना. स्वर आतल्या अात विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदाची साथसंगत सोडून दिली. काही केल्या काही होईना. बसके स्वर कंठातून बाहेर येईनात.

आपल्या कंठातून स्वर प्रगट करण्याची तिची धडपड चालूच होती. विद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्ष्यानं आपले पंख फडफडून उंच अाकाशात झेप घेण्याची धडपड करावी, अशासारखं ते केविलवाणं दृश्य दिसत होतं.

त्या दिवशी कित्येक श्रोते प्रेक्षागृहात गर्दी करून बसले होते. लिली हार्लेचे ते फार चाहते हाेते. ‘काय झालं?… एकदम असं काय झालं?’ अशी त्यांची आपापसात कुजबूज सुरू झाली.

परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं, हेतिचं तिलाही कळत नव्हतं. मग श्रोत्यांना कुठून कळणार?

काही काळ त्या श्रोत्यांनी दम धरला; परंतु लिली हार्लेचा दम आता पुरता निघून गेला होता.

काही काळानंतर श्रोत्यांना दम धरवेना. काही तरी विपरीत घडलं होतं खास !

मग प्रेक्षागृहातील साऱ्या श्रोत्यांत कुजबूज सुरू झाली. श्रोते आरडाओरडा करू लागले. आरडाओरडा वाढू लागला. कित्येक श्रोत्यांना तिचं ते गाणं तोंडपाठ होतं. ते भसाड्या आवाजात तिचं गाणं म्हणू लागले. त्यांच्या त्या म्हणण्याला शिट्यांची आणि आरोळ्यांची साथ सहजच मिळाली.

विंगमध्ये उभ्या असलेल्या चार्लीला काहीच कळेना. कावऱ्याबावऱ्या मुद्रेनं तो गोंधळून आईकडे बघत उभा होता. स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज मॅनेजरलाही काही कल्पना नव्हती. त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता. यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नव्हता. नृत्य असो, संगीत असो किंवा नाट्य असो, लिली हार्लेकडे कधीच बघावं लागत नसे. प्रेक्षागृहात, म्युझिक हॉलमध्येकिंवा कँटिनमध्येलिली हार्ले एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणानं दुसरीकडे बघायला मोकळा होत असे. ती उभी राहीपर्यंत काय ती त्याला धावपळ करावी लागे. लिली नृत्य करण्यात जशी निष्णात होती तशी पियानो वाजवण्यातही वाकबगार होती. नृत्य करताना तिच्या पदन्यासात जशी जादू होती तशीच तिच्या हातांच्या बोटातही एक प्रकारची विलक्षण जादू होती. मध्यम उंचीच्या लिली हार्लेची लांबसडक बोटं पियानोच्या पांढऱ्याशुभ्र पट्ट्यांवर नाचायला लागली म्हणजे पियानोतून स्वरही बेहोशीनं नर्तन करायला लागत आणि ती गायला लागली, की तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोतील स्वरांमध्ये एकरूप होऊन जात. कित्येक विनोदी प्रहसनात ती काम करायची, तेव्हा प्रेक्षागृहात हास्यलहरी उठायच्या, त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायच्या. लिली हार्लेच्या स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष द्यावं लागायचं नाही.

त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षागृहातून आरडाओरडा आणि आरोळ्या यांचा आवाज स्टेज मॅनेजरच्या कानी पडला तेव्हा तो धावतपळत आला आणि विंगमध्ये चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला. गोंधळून जाऊन तो रंगमंचावरील लिली हार्लेकडे बघत होता.

लिली हार्लेची मुद्रा पांढरी पडली होती. आजवर तिच्या गोड चढ्या गळ्यानं तिला कधीही दगा दिला नव्हता. हुकमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती. ती अधिकाधिक नाव मिळवत चालली होती. चांगल्यापैकी पैका कमवत होती; परंतु विद्युल्लता चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकारात विलीन होऊन जावी, असा प्रकार घडलाहोता. आजपर्यंत तिची एवढी अवहेलना कधी झाली नव्हती. त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं तिला मुळीच शक्य नव्हतं.

ती मुकाट्यानं विंगमध्ये परतली.

स्टेज मॅनेजर चार्लीबरोबर तिथेच उभा होता. त्याला काय बोलावं हे समजेना आणि नेमकं काय झालं आहे, हे चार्लीला समजेना.

रडवेल्या स्वरात लिली हार्लेच म्हणाली, ‘‘माफ करा… माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही. मी तरी काय करणार? मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला. पूर्वी असं कधी झालं नव्हतं.’’

मॅनेजरला ते माहीत का नव्हतं?

त्यानं ‘पिनॅफोर अँड अयोलान्ध’ आणि ‘मिकाडो’ या नाटकातल्या तिच्या भूमिका बघितल्याहोत्या. सलव्हन कंपनीतले ऑपेरा बघितले होते. तिनं गायलेलं शास्त्रीय संगीतही ऐकलं होतं.

मग आताच तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं ते मॅनेजरलाही कळलं नाही; परंतु त्याला काहीतरी निर्णय घेणं भागच होतं.

तो म्हणाला, ‘‘ठीक आहे. तुम्ही थोडी विश्रांती घ्या.’’

थोडा विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला, ‘‘पण मॅडम, आपला कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालूच राहायला हवा! नाहीतर आपली नाचक्की होईल.’’

लिलीनं मॅनेजरकडे उदासवाण्या दृष्टीनं बघितलं. तिचे नीलवर्ण बाेलके नेत्र पाणावले होते. तिच्या पाणीदार नेत्रात आता कारुण्याची छटा दिसत होती. हातात तिनं आपला कोट धरून ठेवला होता. जणू आपला तो नाटकातला कोट तिनं कायमचा आपल्या अंगावरून उतरवून हातात पकडून ठेवला हाेता.

आपल्या हातांच्या मुठी जुळवून ती मॅनेजरकडे बघत केविलवाण्या मुद्रेनं त्याला म्हणाली, ‘‘मी हा कार्यक्रम कसा काय पुढे चालू ठेवणार? मला तर ते आता स्टेजवरही येऊ देणार नाहीत !’’

मॅनेजर एकदम म्हणाला, ‘‘छे, छे! तुम्ही आता स्टेजवर जायची गरज नाही; परंतु तुमचं ते अपुरं राहिलेलं गाणं कुणीतरी स्टेजवर जाऊन म्हणायला हवं! या तुमच्या छोट्या चार्लीला तुमचं ते गाणं येतं. त्याला ते गाणं म्हणताना मी ऐकलंय. तुमची हरकत नसेल तर मी याला स्टेजवर घेऊन जातो.’’

यावर लिली काहीच बोलली नाही. तिनं चार्लीकडे एकदा निरखून बघितलं. त्याला जवळ घेतलं. त्याच्या काळ्याभोर कुरळ्या राठ केसांतून हात फिरवला.

चार्लीला घेऊन स्टेज मॅनेजर केव्हा स्टेजवर गेला हेही तिला कळलं नाही.

प्रेक्षकांना उद्देशून मॅनेजर म्हणाला, ‘हा चार्ली… लिली हार्लेचा मुलगा. याच्या अाईची प्रकृती एकदम बिघडली…तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं आता हां पुरं करील! आपण ते शांतपणानं ऐकून घ्यावं…धन्यवाद!’

मग चार्लीकडे बघून मॅनेजर म्हणाला, ‘‘हं…चार्ली…आता प्रेक्षकांना तू जॅक जोन्स म्हणून दाखव.’’

एवढं बोलून मॅनेजरनं चार्लीची पाठ थोपटली आणि ताे विंगमध्येनिघून गेला.

चार्ली स्टेजवर सहजपणानं उभा होता. त्याला प्रेक्षकांची यत्किंचितही भीती वाटली नाही. तशी भीती वाटण्याचं त्याचं वयही नव्हतं. त्याच्या तोंडावर फुटलाईट्सचा झगमगीत प्रकाश पडला होता. त्यामुळे समोरचा प्रेक्षकवर्ग त्याला धूसर दिसत होता.

चार्लीनं गाणं म्हणायला सुरुवात केली- ‘Round about the market, don’t you see.’

त्याच्या त्या गाण्याबरोबर वाद्यवृंदही साथ देऊ लागला. सारं थिएटर त्या स्वरांनी भरून गेलं. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झाले आणि चार्लीचं ते गाणं काैतुकानं ऐकायला लागले. त्याचं गाणं ऐकताना ते इतके भारावले, की त्यांनी स्टेजवर पैशांची उधळण सुरू केली.

पैशांची ती बरसात पाहून चार्लीनं आपलं गाणं मधेच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, ‘मी आधी हे पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो.’

असं म्हणून तो स्टेजवरचे पैसे भराभर गोळा करायला लागला.

त्याच्या त्या धिटाईच्या बोलण्यानं प्रेक्षकांत मोठा हशा पिकला. ते त्याला आणखी प्रोत्साहन देऊ लागले.

एवढ्यात स्टेज मॅनेजर चार्लीजवळ आला आणि आपल्या जवळचा हातरुमाल बाहेर काढून त्यात तो पैसे गोळा करू लागला. तो स्वत:साठीच पैसे गोळा करतो आहे, असं चार्लीला वाटलं. चार्ली लगेच त्याच्याजवळ गेला. एव्हाना मॅनेजर पैसे गोळा करून विंगच्या दिशेनं निघूनही गेलाहाेता. चार्लीनं ताबडतोब त्याचा पाठलाग केला.

ते दृश्य बघून प्रेक्षकांमध्येहास्यकल्लोळाची लाट उसळली.

त्याच वेळी मॅनेजरनं ते सारे पैसे चार्लीच्या आईजवळ दिले, तेव्हा कुठे चार्लीच्या जिवात जीव आला. चार्ली पुन्हा स्टेजवर आला आणि उरलेलं गाणं म्हणायला लागला- ‘Since Jack Jones has come into a little bit of cash Well, ‘e don’t know where’e are…’

गाणं संपलं तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरश: थिएटर डोक्यावर घेतलं. प्रेक्षकांशी त्याचं आता चांगलं नातं जुळलं होतं. त्यांच्यावर त्यानं चांगलीच छाप टाकली होती.

गाणं संपल्यावर चार्लीनं प्रेक्षकांना नाचूनही दाखवलं. नकलाही करून दाखवल्या.

त्याची आई ‘आयरिश मार्च-साँग’ चांगलं म्हणायची. आपल्या आईचं ते रणगीत चार्लीनं हुबेहूब म्हणून दाखवलं. ते म्हणताना त्यानं अगदी आपल्या आईसारखा आवाज काढला. श्रोत्यांनीही त्याच्या आवाजात आवाज मिळवला. तेही त्याच्याबरोबर गाऊ लागले.

ते गाणं गाताना त्याच्या आईचा आवाज क्वचित प्रसंगी मधूनच चिरकायचा. ते गाणं गाताना चार्लीनंही तसाच चिरकलेला आवाज काढला. त्या हुबेहूब नकलेमुळे सारे प्रेक्षक स्तिमित झाले आणि मग पुन्हा जोरदार हशा पिकला. प्रेक्षकांनी ओरडून त्याला शाबासकी दिली. पुन्हा एकदा स्टेजवर पैशांचा पाऊस पडला.

लिली हे सारं दृश्य विंगमधून डोळे भरून बघत होती. तिच्या पाच वर्षांच्या लाडक्या पोरानं सारा कार्यक्रम निभावून नेला हाेता. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्यानं सावरला होता. तिला आपल्या या लहानग्याचं अपरंपार कौतुक वाटलं.

आपले डोळे पुसून तिनं समोर बघितलं. चार्ली पैसे गोळा करण्याच्या उद्योगात मग्न होता.

लिली स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला निघाली. तिला बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला.

काही वेळानं झगमगीत दिवे विझले. थिएटर हळूहळू रितं झालं. त्या रात्रीच्या कार्यक्रमावर पडदा पडला; परंतु लिलीच्या मनावरचा पडदा काही केल्या दूर होत नव्हता. आज हे असं काय झालं, असा प्रश्न ती आपल्या मनाला पुन: पुन्हा विचारत होती; पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला देता येत नव्हतं. तो प्रश्नतिच्या विचारांच्या आवर्तात गरगर फिरत होता; पण तिला उत्तर मिळत नव्हतं.

मात्र तिच्या हुकमी सुरेल आवाजानं उलटवलेला हा डाव तिच्या मानी मनाला मुळीच सहन होत नव्हता. आपल्या त्या आवाजाच्या बळावर ती आजवर स्टेजवर पाय रोवून उभी होती; परंतु त्या दिवशी तिचा तो खंबीर पाय लटपटत होता. तिच्या त्या लटपटणाऱ्या पायाला हात देऊन स्थिर करायला त्या दिवशीचे प्रेक्षक मुळीच तयार नव्हते. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसाला मानत नाहीत. ते मानतात फक्त त्याच्या कलेला ! हे त्रिकालाबाधित सत्य लिली हार्लेला त्या दिवशी समजलं. त्या वेळी रंगमंचावरील लिली हार्ले लुप्त झाली. मागे उरली ती हॅना चॅप्लिन! सर्वसामान्य स्त्री !

त्या रात्री चार्लीनं रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं ते कायमचं आणि त्या रंगमंचावरून त्याच्या आईचा पाय निघाला तोही कायमचाच!