अन्नपदार्थांमध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्नघटक असतात. हे तुम्ही शिकला आहात. या अन्नघटकांविषयी अधिक माहिती घेऊया.
कर्बोदके
करून पहा.
साहित्य : टिंक्चर आयोडीन, ड्रॉपर, बटाट्याची फोड.
कृती : टिंक्चर आयोडीनमध्ये थोडे पाणी मिसळून पातळ करून घ्या. त्याचे चार-पाच थेंब ड्रॉपरने बटाट्याच्या फोडीवर टाका आणि निरीक्षण करा.
तुम्हांला काय आढळून आले ?
बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा होतो.
पिष्ट: पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला, की त्याचा रंग काळसर निळा होतो. याचा अर्थ असा की, बटाट्यात पिष्ट आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या
शर्करा : गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणार्थ, उसाच्या रसापासून
आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यात ‘सुक्रोज’ नावाची शर्करा असते. पिकलेला आंबा,
केळी, चिकू अशी फळे, तसेच मध, दूध यांतही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. त्यांच्यापासूनही शरीराला ऊर्जा मिळते.
स्निग्ध पदार्थ
तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो. कागद अर्धपारदर्शक होणे, ही अन्नपदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याची खूण आहे.
अन्नातील स्निग्ध पदार्थांपासूनही शरीराला ऊर्जा मिळते. पिष्टातून मिळते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा स्निग्ध पदार्थांपासून मिळते. परंतु आपल्या आहारात हे पदार्थ पिष्टमय पदार्थांपेक्षा कमी प्रमाणात असतात. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतींपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थांची उदाहरणे आहेत. याशिवाय मांस, अंड्यातील बलक यातही स्निग्ध पदार्थ असतात.
आहारात आलेल्या स्निग्ध पदार्थांपासून शरीरात चरबी तयार होते. काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते.चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो. चरबीच्या या थरामुळे शरीराला आकार मिळतो.तसेच शरीराची उष्णता राखण्यासाठी ब्लॅकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा आपल्याला उपयोग होतो.
प्रथिने
भिंत बांधण्यासाठी जसे दगड किंवा विटांची गरज पडते, तसेच आपल्या शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते.
शरीराची सतत झीज होत असते. एखादया वेळेस शरीराला छोटी-मोठी इजा होते. त्याची दुरुस्ती आपल्या नकळतच होऊन जाते. त्यासाठी प्रथिनांची गरज असते. शरीराची वाढ होत असताना तर प्रथिनांची भरपूर प्रमाणात गरज असते.
विविध कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा, पनीर यांसारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. प्रथिने मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी व कडधान्ये तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा.
कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने या अन्नघटकांची शरीराला मोठ्या प्रमाणावर गरज असते.
जीवनसत्त्वे व खनिजे
मुख्य अन्नघटकांशिवाय आपल्याला इतर काही अन्नघटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणात गरज पडते. हे अन्नघटक म्हणजे जीवनसत्त्वे व खनिजे आहेत.
जीवनसत्त्वे : या अन्नघटकाच्या विविध प्रकारांना इंग्रजी नावे दिली आहेत. उदाहरणार्थ, जीवनसत्त्व ए, बी, सी, डी, इ आणि के ही मुख्य जीवनसत्त्वे आहेत. या जीवनसत्वांची अल्प प्रमाणात आवश्यकता असली, तरी त्यांच्या अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार निर्माण होतात. उदाहरणार्थ, ‘ए’ जीवनसत्त्वाच्या सततच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तर ‘डी’ जीवनसत्त्वाच्या सततच्या अभावामुळे हाडे कमकुवत व ठिसूळ होतात. जीवनसत्त्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते.
खनिजे : लोह, कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणे आहेत. शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात असली, तरी अनेक अत्यावश्यक क्रियांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो.उदाहरणार्थ, रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी लोहाचा उपयोग होतो. रक्तात
लोहाचे प्रमाण कमी झाले, तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो. या विकाराला ‘ॲनिमिया’ – रक्तक्षय किंवा पांडुरोग म्हणतात. कॅल्शिअम या खनिजामुळे आपली हाडे मजबूत होतात.
विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये तसेच त्यांच्या साली आणि धान्याचा कोंडा हे जीवनसत्त्वे व खनिजांचे स्रोत आहेत. म्हणूनच शक्य ती फळे सालीसकट खावी. तसेच पिठातील कोंडा चाळून फेकू नये.
संतुलित आहार ‘माझी प्रकृती उत्तम आहे’ असे आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्याविषयी काय सांगत असतो? प्रकृती चांगली आहे, याचा अर्थ आपली सर्व कामे, अभ्यास, खेळ इत्यादी सहज करता येण्याइतपत आपल्यामध्ये शक्ती आहे व ती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो. आपल्या शरीराची वाढ योग्य रीतीने होत आहे. तसेच आपण वारंवार आजारीही पडत नाही.
प्रकृती चांगली आहे, याचा अर्थ आपली सर्व कामे, अभ्यास, खेळ इत्यादी सहज करता येण्याइतपत आपल्यामध्ये शक्ती आहे व ती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो. आपल्या शरीराची वाढ योग्य रीतीने होत आहे. तसेच आपण वारंवार आजारीही पडत नाही.
पोषण आणि कुपोषण
शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्नघटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. एखादया व्यक्तीच्या आहारात काही अन्नघटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही. ती व्यक्ती कुपोषित आहे असे आपण म्हणतो. कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
उदाहरणार्थ, कर्बोदके व प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळाली नाहीत तर शरीराची वाढ खुंटते. माणसाला सतत थकवा वाटतो. अभ्यासात तसेच खेळांत व इतर कामांत उत्साह वाटत नाही. एखादया जीवनसत्त्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे काही विशिष्ट आजार होऊ शकतात.
आहाराविषयी काही गैरसमजुतीही असतात. काहींना वाटते, दूध, तूप, सुकामेवा, गोडाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट, केक, बिस्किटे खूप खाऊन धष्टपुष्ट झालेले मूल सुदृढ असते; परंतु केवळ आवडेल तेच खाल्ले आणि सर्व अन्नघटक शरीराला मिळाले नाहीत, तर व्यक्ती कुपोषित राहते.