१९. धोंडा

राजू चौकस बुद्धीचा, जिज्ञासू मुलगा. सतत काहीना काही उद्योग करणारा. खूप प्रश्न विचारणारा. एक भागिले एक म्हणजे किती? शून्य भागिले एक म्हणजे किती? यात फरक काय? सूर्याचं तापमान किती? असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा हा राजू रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे.

आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. संधिप्रकाश अंधूक होऊ लागला होता. राजू एक एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता.

अचानक एक गुळगुळीत दिसणारा; पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला. त्यानं तो नेहमीप्रमाणे फेकला; पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. गाडीला ब्रेक लागावा तसा. राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? त्यानंदुसरा धोंडा उचलला. खूप जोर लावून त्यानं तो फेकला; पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोहोचलेला पाहून, राजू थोडा धास्तावला. त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल, म्हणून त्यानं तो धोंडा पुन्हा फेकण्याचं ठरवलं.

या वेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्यानं उचलून, पूर्वीपेक्षा खूपच कमी बलानं फेकला आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत पळतात, तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. राजूला या नवीन धोंड्याची थोडी गंमत वाटली. एक नवीन खेळणंच आपल्या हाती लागल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली. शाळा सुटून बराच वेळ झाला होता. अंधार दाटून आल्यानं हा खेळ राजूला थांबवावा लागला. तो विलक्षण धोंडा त्यानं उचलला. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्यानं गोळा केले होते. राजू घरी आला. घरी नेहमीप्रमाणेच त्याचं ‘स्वागत’ होणार होतं.

राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि करारीही. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी पडला.

‘‘राजूऽऽ कुठे होता इतक्या वेळपर्यंत?’’

‘‘शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो.’’

 ‘‘काय खेळत होतास? दगडधोंडे?’’ बाबांचा वैतागलेला स्वर ‘‘होऽऽ!’’

राजूचा हुंकार बाबांनी राजूच्या खिशातील सर्वदगडधोंडे काढून बाहेर भिरकावले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत राहिला. रात्र बरीच झाली होती; पण राजूला झोपच येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडाच त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला. बाहेर किट्ट अंधार होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? तरीदेखील बाबांनी जिथे ते सर्व दगडधोंडे भिरकावले होते, ती जागा त्याने शोधून काढली; पण ताे धोंडा काही सापडेना. राजू कष्टान उठला. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपांमध्ये शोधण्याचा निर्णय त्यानं घेतला. तिकडे जात असतानाच, गर्द झुडपात राजूला काहीशी अंधूकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला.

 ‘म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो तर?’ कुठलीही भीती न बाळगता, राजूनंझुडपात हात घालून तो धोंडा काढला. दबक्या पावलानं घरात येऊन टेबलाचा ड्रॉवर हळूच उघडून, त्यानं सगळे दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवले.

सकाळी उठल्यावर राजूनं टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर तीन-चार दगड त्याला सापडले नाहीत. राजूनं धोंड्याकडे निरखून पाहिलं. तो आकारानं त्याला काहीसा फुगीर भासला. उचलताच पूर्वीपेक्षा जडही जाणवला. हा आपल्याला भास होताेय की काय! राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचारशृंखलेतून बाहेर आला. शाळेत जाताना राजूनं सर्वांची नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला.

 त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं होतं. रात्री कुणालाही न दाखवता राजूनं तो धोंडा पुन्हा आधीच्याच ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवला व फारसा कुणाशी न बोलताच झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा तो गडबडून उठला. आई शेजारीच झोपली होती. त्यानं तिला हलवलं; पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं. टाचणी पडल्याचा आवाज होताच उठणारी आई… एवढी गाढ कशी झोपली, याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाकडे गेलं व तो चकित झाला. जिथे धोंडा ठेवला होता, त्या बंद ड्रॉवरच्या फटीमधून प्रखर प्रकाशकिरणं बाहेर येताना त्याला दिसली. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू टेबलाकडे ओढला गेला.

नकळत त्यानं ड्रॉवर उघडला. उघडताच ती खोली प्रकाशानंझळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यापासूनच विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला. कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत, असा तर्क त्यानं केला.

धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरींशी जुळल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं; पण राजू स्वत: त्याचवेळेस स्वप्नसृष्टीत असल्यानं, धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या, म्हणूनच या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता.

हे सर्व राजूच्या आकलनापलीकडंचं होतं. प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. क्षणानंतर डोळे उघडून त्यानं लख्ख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला. धोंडा वेडावाकडा होऊ लागला. त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला.

दगडापासून दगड? त्याला काहीच सुचत नव्हतं. नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीतिमिश्रित गंमत वाटली. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला; पण तो त्याने टाळला. दोन प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते. धोंड्यांचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला, तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.

 सकाळी उठताच, रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला. तसाच वेगानं तो टेबलाकडे धावला. आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं. रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली. दोन्ही धोंडे त्यानं खिशात टाकले. राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजूनं शिक्षकांना, मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं. तो निराश झाला. कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला.

त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री. अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टीसंबंधीची कथा सांगितली. राजूनं त्यांची कथा बारकाईनं ऐकली. त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. त्यातच त्यानं एक ठाम निश्चय केला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. राजूच्या शाळेतील पाटीलसरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डाॅ. अनिल घोटे यांच्याकडे नेले. त्यानंतर काही दिवसांनी डॉ. अनिल घोटे यांच्या समवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डाॅ. कसबे व डॉ. पंडित हे राजूच्या शाळेत आले. पाटीलसरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली. श्री. घोटे बोलू लागले, ‘‘राजू अतिशय चलाख, चाणाक्ष व हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्यांविषयी सांगण्यासाठी राजू सहा दिवसांपूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली; पण पुढे धोंड्याविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला. त्यानं मी शहारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डाॅ. कसबे व डाॅ. पंडितांकडे गेलो.’’ डॉ. घोटेंनी डॉक्टरद्वयींकडे कटाक्ष टाकला. ‘पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा,’ असा निर्देश करत डॉ. घोटे थांबले.

डॉ. कसबे सांगू लागले, ‘‘राजूनं सांगितलेल्या अनुभवानं आम्हीही चरकलो. आमच्या समोरच ते दोन धोंडे त्यानं ठेवले होते. त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता. त्या धोंड्यांतून आम्हांला धक्कादायक माहिती मिळाली. हे धोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते, आपल्यापेक्षा कित्येक पटीने बुद्‌धिमान असे. असेच धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. या धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूही गिळंकृत करण्याची क्षमता होती. अगदी दगडंसुद्धा. त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. पर्यायानं प्रजननक्षमता वाढून त्याच्यापासून दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती. राजूनं हे शोधलं नसतं, तर काही वर्षांतच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. त्यासाठीच धोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही यशस्वीही झालो. या सर्वांचं श्रेय राजूलाच आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे.’’