१९. प्रीतम (भाग – ४)

दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत प्रीतम लुथरा हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले.

‘हजर.’ एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दीनवाणे भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता.

त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्गशिक्षिका म्हणून शिकवत होते. ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले अन्उमजत गेले, की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही. कसाबसा काठावरती पास होतो. वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहतो.

एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या, की मी त्याला थांबवून घेतले अन्म्हटले, ‘‘नीट मराठीही लिहिता येत नाही तुला. तुझ्या आईवडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस. तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. साधे शब्दलिहिता येत नाहीत.’’ घाबरत, अडखळत एकेक शब्द उच्चारत धीर एकवटून बोलल्यासारखा प्रीतम म्हणाला, ‘‘बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. चार वर्षांपूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर एक वर्ष बंगालात होतो. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो. याच वर्षी मी इथे मामा- मामींकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत.’’

‘‘तुला आणखी कुणी नातेवाईक नाहीत?’’ माझा आवाज आता एकदम खाली आला होता.

‘‘नाही बाई.’’

 ‘‘मग तुझ्या मामांनाच मला भेटायला सांग.’’

‘‘नको. नको. माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो, तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे.’’ त्याचे बोलके डोळे आता भीतीने भरले होते. माझ्याकडे याचना करत होते.

‘‘आधीच मामीची तीन लहान मुले तिला खूप त्रास देतात. त्यात माझा त्रास नको.’’

एरव्ही शब्दही न बोलणारा प्रीतम आजूबाजूला मुले नाहीत म्हणून भडाभडा बोलत सुटला होता. त्याच्या विचित्र आडनावाचा, अबोलपणाचा, काही कळत नसल्याचा खुलासा कळला तसे माझ्या काळजात काहीतरी लक्कन हलले. मी चटकन त्याला जवळ घेतले. क्षणभर त्याने अंग चोरून घेतलेले मला कळले. सात-आठ वर्षांच्या मानाने त्याचा देह खूपच किरकोळ, सुकल्यासारखा होता. मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले, ‘‘प्रीतम, मला यातले काही ठाऊक नव्हते. असं कर, उद्यापासून दुपारच्या सुटीत लवकर डबा खा अन्खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन अन्मग बाकी विषयही तुला सहज समजतील.’’

मी त्याला शिकवू लागले तसे तो मन लावून शिकू लागला. सुटीच्या दिवशी तो घरी यायचा. मी आणि आई दोघीच राहत होतो. मलाही वडील नव्हते. त्यामुळे पोरकेपणाचे काही समान धागे मला प्रीतमजवळ खेचत होते. त्याची भाषा सुधारली तसे इतरही विषय त्याला समजू लागले. त्याचा परीक्षेतला नंबर दहाच्या आसपास येऊ लागला. तसे त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामामामी त्याला खायला घालत; पण आपण एखाद्या घरात उपरे आहोत, नको आहोत हे मुलाला चटकन समजते. ही नाकारलेपणाची भावना त्याला मिटवून खुरटून टाकत होती. माझ्या चार शब्दांनी, अधूनमधून कुरवाळण्याने त्याला जणू संजीवनी मिळाली. त्याची प्रकृतीही सुधारली. माझे कुठलेही काम तो आनंदाने करायचा. किंबहुना मी काम सांगितले, तर ते त्याला फार आवडायचे. अधूनमधून एखादा खास पदार्थ मी त्याला द्यायची, वाढदिवसाला लहानशी भेट द्यायची, तेव्हा त्याचा आनंद वेगळाच आहे, हे मलाही जाणवायचे.

दोन वर्षांनी माझे लग्न ठरले. सुदैवाने त्याच गावात मी राहणार होते. फक्त लग्न दुसऱ्या गावी होते. शाळेतल्या मुलांनी मी जाण्यापूर्वी एक छोटासा समारंभ करून मला भेट दिली. मी जरी नोकरी सोडणार नव्हते तरी त्यांनी समारंभपूर्वक मला केळवण केले. वर्गातला मॉनिटर उभा राहिला आणि ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे त्याने वाचली. त्यात अर्थातच प्रीतमचे नाव नव्हते. प्रीतम उठून सावकाश माझ्याजवळ आला आणि त्याने लहानसे पुडके माझ्या हातात ठेवले. मी ते उघडले तर त्यात दोन हैदराबादी खड्यांच्या जुन्या बांगड्या होत्या. त्यांतले एक-दोन खडे पडलेले होते आणि सोबत एक स्वस्त, उग्र वासाची अर्धवट भरलेली अत्तराची बाटली होती. त्या जुन्या बांगड्या बघून सगळीजणं हसायला लागली. प्रीतम ओशाळवाणा झाला. मी मुलांना दटावत चटकन त्या बांगड्या हातात चढवल्या अन्अत्तराची बाटली उघडून मनगटावर अत्तर लावले, वास घेतला अन्हसणाऱ्या एक दोघांना वास घ्यायला सांगितले अन्म्हटले, ‘‘बघा, किती छान सुगंध आहे.’’

माझ्या बोलण्यावर त्यांना ‘हो’ म्हणावेच लागले.

प्रीतमचा चेहरा उजळला. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, ‘‘बाई, माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन्अत्तर मी तुम्हांला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वत:च्या वस्तू आहेत त्या.’’

मी चटकन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हटले, ‘‘प्रीतम, तुझी भेट, त्यामागच्या भावना मला समजल्या. मला आवडली तुझी भेट. दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नको.’’

त्याच्या माझ्यातला अतूट धागा असा अधिकाधिक चिवट होत गेला. मी कधी कधी त्याच्या वर्गाला शिकवत नव्हते, तरीही ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले.

तो चांगल्या रीतीने मॅट्रिक झाला अन्मग होस्टेलला राहून बारावी झाला. त्याला एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळाल्याचे त्याने मला पत्राने कळवले. दरवर्षी त्याचे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र येई. मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटले होते त्यामुळे उत्तर पाठवेनच असे नव्हते; पण तो अगदी काटेकोर होता.

ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला. ‘पासिंग आऊट परेड’ साठी त्याने मला पुण्याला यायला विशेष निमंत्रण दिले. जायचे यायचे तिकिटही पाठवले आणि मी गेले. स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता. इतका देखणा, भरदार दिसत होता, की मीच आता त्याच्या खांद्याखाली येत होते. त्या दिवशी आई-वडिलांना विशेष जागी बसवतात. त्याचे वडील येऊ शकले नव्हते. त्या जागी त्याने मला बसवले होते. माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या अन्माझे हात हातात घेत त्यावर त्याने डोके टेकवले. त्यावर पडलेले पाणी मला कळले. त्याला जेव्हा छातीवर बिल्ला लावला गेला तेव्हा मी जोराने टाळ्या वाजवल्या.

मला निरोप देताना तो म्हणाला, ‘‘बाई, तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती. गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो.’’

चार वर्षांनी त्याच्या लग्नाची पत्रिका तिकिटासह माझ्या हातात पडली. मध्यंतरी त्याचे वडील वारल्याचे त्याने कळवले होते. माझ्या सर्व अडचणी बाजूला सारून मी लग्नाला गेले. त्याच्या आयुष्यातला हा सर्वांत महत्त्वाचा प्रसंग मी हजर राहून पाहावा, अशी त्याची इच्छा मला जणू टेलिपथीने कळली.

त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी म्हणून घेतलेली साडी त्याने मला घ्यायला लावली अन्माझ्या पुढ्यात जोडीने वाकताना त्याने पत्नीला सांगितले, ‘‘या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता.’’ मी देऊ केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला, ‘‘त्या तुमच्याजवळ आहेत ही भावना मला पुरेशी आहे. तुमच्याजवळच त्या असू दे. केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, मी धावत येईन.’’