१९. मले बाजाराला जायाचं बाई!

(आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत. जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात. ते सर्व तिच्याजवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो.)

बाई ः ‘मले बाजाराला जायाचं न्हाई, मले बाजाराला जायाचं न्हाईऽऽ.’

 इतर ः का गं बाई, का गं बाई, का गं बाई?

बाई ः नगं बाई, नगं बाई, नगं बाई.

पहिला ः का बरं जायाचं न्हाई? कारण काय ते सांगशील की न्हाई?

बाई ः आवं, बाजाराला जायाचं, कशाकशाची खरेदी करायची?

दुसरा ः कशाकशाची? कशाकशाची?

बाई ः आवं मंडळी, डाळ, तांदूळ अन् भाजीपाला, साबण, कपडे, चपला, काय बाय लागतं आपल्या सौंसाराला.

तिसरा ः मग त्ये सम्दं घिऊन येकी, त्यात अवघड काय?

बाई ः आरं, आणू कशात? ठेवू कशात?

दुसरा ः आता तर समद्या वस्तू कॅरीबॅगमध्येदेतात की.

 बाई ः आवं, त्योच तर मोठा घोटाळा हाय!

इतर ः कसा काय? कसा काय? कसा काय?

पहिला ः कॅरीबॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी, अन् कॅरीबॅग फेकून द्यावी. म्हंजी झालं.

बाई ः त्या कॅरीबॅगा समद्या गटारीत अडकतात, समद्या नाल्या तुडुंब भरतात, अन् सांडपाणी येतं रस्त्यांत.

दुसरा ः काय सांगता काय बाई?

बाई ः मंग ध्यानात येतं का न्हाई? म्हणून म्हन्ते… ‘मले बाजाराला जायाचं न्हाई, मले बाजाराला जायाचं न्हाई.’

इतर ः का गं बाई, का गं बाई, का गं बाई?

बाई ः (रडत) अवं माजी हरणी… दुधाची म्हैस.

 तिसरा ः आता तिले काय झालं?

 बाई ः अवं माजी हरणी मला सोडून गेली.

दुसरा ः कुठं? जंगलात की अरण्यात?

बाई ः न्हाई वो, ती मरून गेली.

इतर ः कशापायी मेली तुजी हरणी, तिच्यासाठी तू का गाते रडगाणी, का न्हाई केलं तू औषधपाणी?

 बाई ः ते तर सांगतेय म्या, ध्यानात येतं का न्हाई? प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगा तिनं चाऱ्यागत चगळल्या. तिच्या पोटात गेल्या. म्हणून तिचं मरणच ओढवलं. तिचं बिचारं रेडकू रडरड रडलं, दुधावाचून त्या लेकराचं अडलं, माझं मन खूप तडफडलं. प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण, जनावरांचं ओढवतंय मरण. म्हणून म्हन्ते.

इतर ः काय म्हन्ते?

बाई ः ‘मले बाजाराला जायाचं न्हाई, मले बाजाराला जायाचं न्हाई.’

पहिला ः अवं सरकारनी काढलाय आदेश, प्लॅस्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष, ‘सजीवांना वाचवूया’ हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचली की न्हाय, आता काय तुमी अंगठाबहाद्दर नाय.

तिसरा ः सांग रे बाबा सांग. मले आठवत नाय. पेपरात आलंय तरी काय?

बाई ः त्या समिंदर किनाऱ्यावर, त्या समिंदर किनाऱ्यावर.

दुसरा ः काय झालं समिंदर किनाऱ्यावर?

बाई ः त्या समिंदर किनाऱ्यावर, मरून पडली बिचारी दोन हजार कासवं, त्येच्यासाठी डोल्यातून वाहतात आसवं.

तिसरा ः आरं आरं आरं! फार वाईट घडलं. प्लॅस्टिकच्या विळख्यातून जलचरसुदीक न्हाई वाचलं.

बाई ः ध्यान देऊन ऐका. यवढंच न्हाय.

पहिला ः आनखी आक्रीत घडलंय काय?

बाई ः प्लॅस्टिक वापरू नका. सरकारनं केलाय कायदा. सजीवांना वाचवायचा केलाय वायदा.

दुसरा ः खरंच की काय?

बाई ः आपण अन् पोरंबाळ खाणार काय! आपली काळी माय ओसाड होत हाय.

तिसरा ः कशी काय, कशी काय?

 बाई ः जमीन नांगरली, प्लॅस्टिकची जाळी वरती आली. शेतात पीक येईल कसं, कशी मिळतील खंडीभर कणसं. म्हणून म्हंते, ‘मले बाजाराला जायाचं न्हाई, मले बाजाराला जायाचं न्हाई.’

पहिला ः यापेक्षा म्या सांगतो तसं कर. समद्या लोकांना उपदेश कर.

 बाई ः त्यो वो काय ?

 तिसरा ः ‘वापरू पिशवी कापडाची अन् कागदाची, प्लॅस्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची.’

इतर ः आता तरी बाजाराला जाशील का न्हाई?

बाई ः व्हय. व्हय. व्हय. पर मी…. प्लॅस्टिक थैली हातात धरनार न्हाई! ‘मले बाजाराला जायाचं हाईऽ मले बाजाराला जायाचं बाईऽ’.

सर्वजणः चला, चला, चला…ऽ बाजाराला चला. कापडाची थैली…. घेऊन बाजाराला चला…

कागद-कपडाच वापरा, नको प्लॅस्टिकचा कचरा । होत नाही त्याचा निचरा, आर्ततेने सांगते वसुंधरा । कागद-कपडाच वापरा ॥