ओढाळ वासरू रानी आले फिरू,
कळपाचा घेरू सोडूनिया.
कानामध्ये वारे भरूनिया न्यारे,
फेर धरी फिरे रानोमाळ.
मोकाट मोकाट अफाट अफाट,
वाटेल ती वाट धावू लागे.
विसरूनी भान, भूक नि तहान,
पायांखाली रान घाली सारे.
थकूनिया खूप सरता हुरूप,
आठवे कळप तयालागी.
फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,
आणखीच भागे भटकत.
पडता अधारू लागले हबरू,
माय! तू लेकरू शोधू येई.
अनिल